-->
अतिरेक्यांविरोधी एकत्र हाक

अतिरेक्यांविरोधी एकत्र हाक

सोमवार दि. 26 फेब्रुवारी 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
अतिरेक्यांविरोधी एकत्र हाक
अखेर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडू यांनी आपल्या भारत भेटीत पंतप्रधानांची गळा भेट घेऊन अतिरेकिविरोधी एकत्र लढा देण्याचे मान्य केले. उभय देशांची ही एकत्रित हाक अतिरेक्यांना एक मोठी चपराक ठरणारी आहे. कारण कॅनडात भारतविरोधी मोठ्या कारवाया या सातत्याने खलिस्थानच्या होत असतात व त्याविरोधात भारताने वेळोवेळी कॅनडाला आवाहन करुनही त्यांनी त्याला योग्य प्रतिसाद दिला नव्हता. परंतु आता दोन्ही देशांच्या प्रमुखांनी अतिरेकी विरोधात आणाभाका घेतल्याने कॅनडातील भारतविरोधी कारवाया कमी होतील अशी अपेक्षा करावयास काहीच हरकत नाही, असे दिसते. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडू सहकुटुंब सहपरिवार भारत भेटीवर आले होते व त्यांनी आपल्या भेटीत साबरमती आश्रमात सूतकताई करण्यापासून ते क्रिकेट खेळण्यापर्यंत आणि अमृतसरच्या सुवर्णमंदिरात पोळ्या लाटण्यापासून ते ताजमहालला भेट देण्यापर्यंत सर्व करुन भारताचे आपण मित्र आहोत हे दाखविण्याचे महत्वाचे काम केले. नेहमी कोणत्याही देशाचे प्रमुख आले की, त्यांना पहिली गळाभेट देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी कॅनडाच्या पंतप्रधानांना तब्बल तीन दिवस भेटलेच नव्हते. मात्र शेवटच्या दिवशी त्यांनी गळाभेट घेतली व एकप्रकारे आपल्या देशाची नाराजी व्यक्त केली. भारताला कॅनडाच्या पंतप्रधानांना भेटून त्यांचे जोरदार स्वागत करावे असे मनापासून वाटत नाही. त्यामुळे तसे पाहता कॅनडाच्या या पंतप्रधानांचे थेडेच स्वागत झाले. याची दखल कॅनडातील अनेक वृत्तपत्रांनी घेतल्याची चर्चाही झाली. परंतु भारतात येऊन येथे आपले कसे चांगले संबंध आहेत व आपण भारताचे मित्र आहोत हे जस्टिन यांना कॅनडावासियांना दाखवायचे होते. कारण कॅनडात सुमारे 14 लाखाहून जास्त भारतीय वंशाचे लोक आहेत व त्यात पंजाबी मोठ्या संख्येने आहेत. या मूळ भारतीयांची मते त्यांना देशांतर्गत निवडणुकीत पाहिजे आहेत हे देखील छुपा उद्देश होता. परंतु भारताने त्यांच्या या भारत भेटीला फारसे महत्व दिले नाही याचे महत्वाचे कारण म्हणजे कॅनडातील खलिस्थानवाद्यांना तेथील सरकारने दिलेला आश्रय. तसेच वेळोवेळी भारताने या अतिरेक्यांना स्थान देऊ नये असे सांगूनही फारसे लक्ष त्यांनी दिलेले नाही. 1980च्या दशकात भारतात खलिस्तानी चळवळीने उग्र रूप धारण केले, तेव्हा त्या चळवळीची सूत्रे कॅनडातूनच हलवली जात होती. त्यातच दिल्ली येथील ट्रुडू यांच्या सन्मानार्थ आयोजित मेजवानीस कुख्यात खलिस्तानी दहशतवादी जसपाल अटवाल यास निमंत्रण दिले गेल्याचे वृत्त आले आणि कॅनडाच्या पंतप्रधानांच्या पत्नीसमवेत अटवालचे छायाचित्र प्रसिद्ध झाल्यामुळे खळबळ उडाली.
मात्र, अखेरीस कॅनडा, भारतातीलच काय, जगभरातील कोणत्याही फुटीरतावाद्यांना पाठिंबा देणार नाही, असे स्पष्ट आश्‍वासन देणे ट्रुडू यांना भाग पडले. त्यामुळे ट्रुडू यांच्या भारतातील दौर्‍याचा शेवट तरी गोड झाला असेच मानावे लागेल. शेवटी अतिरेक्यांच्या विरोधात उभय देशांनी परस्परांना सहकार्य करण्यावर सहमती झाली.
भारताच्या एकात्मतेवर कॅनडाचा विश्‍वास आहे आणि त्यामुळेच भारतातील कोणत्याही फुटीरतावादी चळवळीस कॅनडा कधीही पाठिंबा देणार नाही, अशी ठाम भूमिका ट्रुडू यांनी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्यासमवेतच्या चर्चेत घेतली. अमरिंदरसिंग यांनी या चर्चेत खलिस्तानी दहशतवाद्यांचा बीमोड करण्यासाठी कॅनडाकडून सहकार्य मिळावे, अशी रास्त भूमिका घेतली होती. 80च्या दशकात खलिस्थानी अतिरेक्यांचा बिमोड केल्यावरअ आता पुन्हा हे अतिरेकी आपले डोके वर काढीत आहेत व भारताला प्रामुख्याने पंजाबमध्ये त्याचा फार त्रास सहन करावा लागत आहे. कॅनडातील खलिस्तानी फुटीरतावाद्यांकडून पंजाबात दहशतवादी कारवायांसाठी मोठी आर्थिक रसद व शस्त्रास्त्रे पुरवली जात असल्याचा मुद्दाही कॅप्टनसाहेबांनी या वेळी उपस्थित केला होता. त्यासंबंधात कॅनडाच्या पंतप्रधानांनी सकारात्मक सहकार्याचे आश्‍वासन दिल्यामुळे खलिस्तानवाद्यांना चपराक बसली आहे. त्यामुळे अन्य काही नाही तरी ट्रुडू यांच्या भारत भेटीचे हे मोठेच फलित मानावे लागेल. कॅनडा आणि भारत यांचे संबंध फार पूर्वीपासूनचे असून कॅनडाच्या तीन पंतप्रधानांनी 2001 ते 10 या काळात भारताला भेट देऊन, परस्परसहकार्याचे आणि सामंजस्याचे अनेक करार केले होते. तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनीही जी-20 परिषदेच्या निमित्ताने 2010 मध्ये कॅनडा दौरा केला होता, तर मोदी यांनीही दोन वर्षांपूर्वी कॅनडाचा दौरा करून तेथील व्यापार-उद्योग समूहातील बड्या प्रमुखांना दोन्ही देशांदरम्यानचा व्यापार वाढवण्याचे आवाहन केले होते. या पार्श्‍वभूमीवर ट्रुडू यांच्या भेटीचे महत्त्व होते. कॅनडाच्या पंतप्रधानांनी मुंबईत उद्योगजगतातील अग्रणी, तसेच बॉलिवूड स्टार यांची घेतलेली भेटही सकारात्मक ठरू शकते. मोदी यांच्या कॅनडा दौर्‍यात इस्रो आणि कॅनडियन स्पेस एजन्सी यांच्यात सहकार्याचा करार झाला होता. ट्रुडू यांच्या दिल्लीतील भेटीगाठीनंतर आता या सहकार्यासही वेग येऊ शकतो. कॅनडाने भारताला अणू उर्जेच्या वापरासाठी युरेनियम पुरविण्याची तयारी दाखविली आहे. त्याशिवाय उभय देशात चांगले सहकार्य झाल्यास व्यापार-उद्योगाचे अनेक दरवाजे खुले होऊ शकतात. भारतात अनेक कॅनेडीयन उद्योजक गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत, त्याला चालना मिळू शकते. उर्जा, शिक्षण, विज्ञान व तंत्रज्ञान या क्षेत्रात उभय देशांनी सहकार्य करार केले आहेत. मात्र कॅनडाने अतिरेक्यांच्या मुद्यावर भारताला सहकार्य केल्यास या सहकार्य करारांची चांगल्या तर्‍हेने अंमलबजावणी होऊ शकते. अर्थात हे कॅनडाच्या हातात आहे.
------------------------------------------------------------------------

0 Response to "अतिरेक्यांविरोधी एकत्र हाक"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel