-->
संपादकीय पान मंगळवार दि. २३ सप्टेंबर २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------
आघाडी-युतीतील ताणाताणी
---------------------------------
विधानसभेची निवडणूक २२ दिवसांवर येऊन ठेपली असतानाच शिवसेना-भाजपतील तणाव युती तुटण्याच्या शक्यतेपर्यंत ताणला गेला आहे. त्याचबरोबर कॉँग्रेस व राष्ट्रवादीतील आघाडीतही आता ताणाताणी विकोपाला पोहोचली आहे. भाजपा-शिवसेना महायुती टिकावी असा दोघांकडूनही जप सुरू असला तरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोगलांशी लढा देणार्‍या शिवरायांच्या वाघनखांची आठवण करून दिली, तर भाजपनेही त्यावर कुठलीही प्रतिक्रिया न देता १३० उमेदवारांची यादी श्रेष्ठींकडे सोपवली आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांनी दिलेला ११९ जागांचा प्रस्ताव भाजपने धुडकावून लावल्याचेच स्पष्ट होते. दरम्यान, गेले बरेच महिने अज्ञातवासात असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा या नाट्यात प्रवेश झाला. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याशी दूरध्वनीवरून केलेल्या चर्चेनंतर अडवाणींनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना सकारात्मक चर्चा करण्याच्या सूचना दिल्या. संसदीय मंडळाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील युती कायम ठेवण्याचे निर्देश दिले. जागावाटपावरून तिढा सुरू असतानाच उद्धव ठाकरेंनी युती तुटली तरी चालेल मात्र भाजपाला जादा जागा न देण्याची आपली भूमिका काही सोडली नाही. भाजपपुढे ११९ जागांचा आपला अखेरचा प्रस्ताव असून, यानंतर युती राहो अगर तुटो आम्ही निवडणूक लढण्यास तयार आहोत, असा इशाराच उद्धव यांनी रंगशारदामधील पदाधिकारी मेळाव्यात दिला. भाजप नेते एकनाथ खडसे आणि विनोद तावडे यांनी शिवसेनेचा नवा प्रस्ताव मान्य नसल्याचे स्पष्ट केले. माध्यमांतून चर्चा करण्याऐवजी प्रत्यक्ष भेटून चर्चा करू, असे ते म्हणाले. आजवर कधीही न जिंकलेल्या जागांच्या अदलाबदलीचा हेका भाजपने कायम ठेवला.
उद्धव ठाकरेंनी कधी नव्हे एवढा आक्रमकपणा यावेळी दाखविला आहे. त्यामुळे युती तोडण्याचेच संकेत मिळत आहेत. यासाठी इतिहासातील दाखले दिले जात आहेत. बाळासाहेबांच्या काळात मोदी हटावचा नारा सुरू असताना शिवसेनाप्रमुखांनी पाठिंबा दिला होता, याची आठवण करुन देण्यात आली. मुंडे, महाजनांच्या काळात वाद झाले, पण कोणी ऐवढे ताणले नव्हते. शिवसेनेन देशात तुम्ही हवं तर राज्य करा, राज्यात आम्हाला त्रास देऊ नका असा निर्वाणीचा इशारा दिल्याने युतीत पॅतअप होण्याची शक्यता कमी दिसत आहे. शिवसेना आपल्यासाठी १५१ जागा व  भाजपासाठी ११९ तसेच मित्रपक्षांसाठी १८ जागा देण्याचा दिलेला प्रस्ताव भाजपाला अमान्य आहे. भाजपच्या मागणीनुसार, शिवसेनेला १४० जागा व  भाजपाला १३० जागा आणि मित्रपक्षांना १८ सोडण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे.
मोदी लाटेच्या बळावरच शिवसेनेला लोकसभा निवडणुकीत यश मिळाले आहे. परंतु शिवसेना या विजयांचे श्रेय मोदी लाटेला द्यायला तयार नाही. आणि यातच युती तुटण्याची मेख आहे. कारण भाजपा विजयाचे श्रेय उद्धव ठाकरेंना देईल कसे? दोघांच्या या वादात महायुती फुटण्याची चिन्हे आहेत. गेल्या विधानसभेत भाजपने ११९ जागा लढवत ४६ जागांवर विजय मिळवला तर सेनेला १६९ जागांपैकी ४५ जागा मिळाल्या. त्यामुळे २००९चे हे चित्र पाहता भाजपाची जिंकण्याची टक्केवारी ही साठ टक्के आहे तर सेनेची ४० टक्क्याांपेक्षाही कमी आहे. शिवसेनेने कधीच न जिंकलेल्या ५९ जागांपैकी ३४ जागा भाजपला हव्या आहेत. यातील ११ प. महाराष्ट्र, ४ मराठवाडा व ६ जागा खान्देशातील आहेत. आपल्या १९ जागा सोडण्याची भाजपची तयारी आहे. तस झाल्यास शिवसेनेकडे ४४ जागा उरतील. काही जागी अनुकूल वातावरणाचा भाजपचा दावा आहे. भाजपला अपेक्षित जागांवर  अनेक जागांवर भाजपमध्ये प्रवेश करू इच्छिणारे सक्षम उमेदवार आहेत. तर खान्देशातल्या शिवसेनेने कधीही न जिंकलेल्या कळवण, दिंडोरी, इगतपुरी,नंदूरबार, शहादा आणि पाचोरा सारख्या मतदारसंघात अनुकूल वातावरण असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. मराठवाड्यातही शिवसेनेकडे असलेल्या जागांवर इतर पक्षातील अनेक भाजपमध्ये आले आहेत. त्यांना तिकीट मिळवून देण्यासाठी भाजपचा जागांच्या अदलाबदलीचा अट्टहास आहे. उद्धव यांच्या नव्या पर्यायानुसार मित्रपक्षाला मिळणा-या सर्व जागा शिवसेनेच्या कोट्यातून आहेत. उद्या काही मित्रांनी साथ सोडली तर या जागांवर शिवसेना पुन्हा हक्क सांगेल. त्यामुळे शिवसेनेवर अधिकाधिक दबाव टाकत ११९पेक्षा किमान ४ ते ५ जागा वाढवून घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. महायुतीत हा ताणतणाव असताना तिकडे कॉँग्रेस व राष्ट्रवादीमध्येही परस्परांवर दबाव वाढवून परस्परांच्या जागा वाढवून घेण्याची रस्सीखेच सुरु आहे. सुरुवातीला सोनिया गांधी परदेशी गेलेल्या असल्यामुळे चर्चेत खो घातला गेला. त्यानंतर चर्चा सुरु झाल्यावर जागा वाटपांवरुन तिढा निर्माण झाला. अर्थात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे नेहमीप्रमाणे दोन दगडांवर पाय ठेवून आहेत. युती जर झाली नाही तर भाजपासोबत निवडणुकीनंतर आघाडी करुन कोणत्याही परिस्थितीत सत्तेत बसण्याचा प्र.त्न करतील अशी चर्चा आहे. त्यामुळे युतीच्या भविष्यावर आघाडीचे भवितव्य अवलंबून आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. भाजपा-शिवसेना असो किंवा कॉँग्रेस-राष्ट्रवादी असोत निवडणुकीच्या अगोदरच हे पक्ष एवढी भांडणे करीत आहेत तर मग पुढे सत्तेत आल्यावर परस्परांचे काय करतील आणि आशा स्थितीत जनतेच्या प्रश्‍नाचे काय, असा सवाल लोकांना पडणे स्वाभाविक आहे. त्यामुळे राज्यातील जनता या युती-आघाडींना विटली आहे. हे तारही पक्ष आपले प्रश्‍न सोडविण्यास समर्थ नाहीत हे राज्यातील जनतेला पटले आहे. अशा वेळी या दोघांच्या व्यतिरिक्त एक समर्थ पर्याय हा डावे पक्षच देऊ शकतात.
----------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel