-->
संपादकीय पान सोमवार दि. २९ सप्टेंबर २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
-------------------------------------------
जयललिताअम्मा अखेर जेलमध्ये
-----------------------------------
एम. जी. रामचंद्रन या आपल्या सहअभिनेत्याचे बोट धरून राजकारणात उतरलेल्या एकेकाळच्या जयललिता यांनी तीनदा तमिळनाडूचे मुख्यमंत्रिपद भूषविले; पण मालमत्ता प्रकरणाने त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरूंग लावला आणि अखेरीस त्यांची रवानगी जेलमध्ये झाली. मुख्यमंत्रीपदी असताना जेलमध्ये रवानगी होण्याची ही देशातली पहिलीच घटना ठरावी. डिसेंबर १९९६ मध्ये जयललिता यांना दूरचित्रवाणी संच खरेदी प्रकरण भोवले. ४५ हजार संचांची बाजारमूल्यापेक्षा १४ हजार रुपये जादा देऊन खरेदी करून ८.५३ कोटींचा गैरव्यवहाराचा आरोप जयललिता आणि त्यांची मैत्रीण शशिकला यांच्यावर केला होता. त्याबद्दल त्यांना तुरुंगातही जावे लागले. तान्सी प्रकरणही जयललितांना भोवले होते. सरकारी जमीन मातीमोल भावाने खरेदी केल्याचा आरोप ज्या कंपनीवर करण्यात आला होता, त्यात त्यांची भागिदारी होती.  त्याबाबत त्यांना स्थानिक न्यायालयाने दोषी ठरवले होते; पण सर्वोच्च न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली होती. १९९३ - ९४ या कालावधीचे प्राप्तिकर विवरणपत्र सादर न केल्याने जयललिता आणि शशिकला यांच्यावर खटला दाखल केलेला होता. शशी एंटरप्रायजेसमध्ये जयललिता आणि शशिकला भागीदार होत्या, त्याचे १९९१-९२ आणि १९९२-९३ या वर्षाचे विवरणपत्र सादर न केल्यानेही कारवाई सुरू होती. त्यानंतर त्यांनी नरमाईची भूमिका घेतली होती. केवळ एक रुपया पगार घेणार्‍या जयललिता त्यांच्या कृतीने लोकप्रिय झाल्या; पण १९९५ मध्ये त्यांचा मानलेला मुलगा आणि त्यांची मैत्रीण शशिकला यांचा पुतण्या सुधाकरन याचा चेन्नईत झालेला विवाहसोहळा सर्वांचे डोळे विस्फारणारा राजेशाही थाटाचा आणि चित्रपटातील दृश्याला शोभेल असा होता. १९९६ मध्ये सत्तेवर आलेल्या करुणानिधींनी त्यांच्याविरुद्ध ज्ञात स्रोतापेक्षा अधिक मालमत्ता जमा केल्याचा आरोप करत कायद्याचा बडगा उगारला, त्याचा निकाल आज लागला आणि दोषी जयललितांना तुरुंगाची हवा खाण्याची वेळ आली. ही कारवाई होण्याआधी जयललितांच्या हैदराबाद आणि चेन्नईतील मालमत्तांवर छापे टाकण्यात आले. यात सक्त वसुली संचलनालय, भ्रष्टाचारविरोधी पथक, प्राप्तिकर खाते यांचा समावेश होता. छाप्यात ६६ कोटींची अतिरिक्त संपत्ती सापडली. यामध्ये ५८ कोटींच्या स्थावर मालमत्ता, ४०० बांगड्या जोडांसह ३० किलो सोने, ५०० किलो चांदी, १० हजार साड्या, चपलांचे ७५० जोड आणि शंभरावर घड्याळे यांचा समावेश होता. त्यामुळेच केवळ एक रुपया वेतन घेणारी व्यक्ती पाच वर्षांत एवढी मालमत्ता कशी गोळा करू शकते, असा प्रश्‍न उपस्थित केला गेला. आता जयललिता दोषी आढळल्याने तमिळनाडूच्या राजकारणात आता मोठी उलथापालथ होणार हे निश्‍चित. जयललिता यांचा जन्म २४ फेब्रुवारी १९४८ रोजी कर्नाटकातील मेलुकोटे येथे झाला. तमीळ चित्रपटात काम केलेल्या जयललिता यांनी एपिस्टेल या इंग्रजी चित्रपटातही १९६१ मध्ये काम केले होते. १९८० मध्ये आलेला नदियाई थेडी वंधा कडल हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला. १९८१ मध्ये अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम (अण्णा द्रमुक) पक्षात दाखल झालेल्या जयललिता १९८८ मध्ये राज्यसभा सदस्य झाल्या. २४ जून १९९१ रोजी तमिळनाडूच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री झाल्या. त्यांचा कार्यकाळ १२ मे १९९६ रोजी पूर्ण झाला. ही कारकीर्द अनेक अर्थांनी गाजली. २००१ मध्ये त्या पुन्हा मुख्यमंत्री झाल्या. जयललिता तिसर्‍यांदा एक जानेवारी २०१३ रोजी तमिळनाडूच्या मुख्यमंत्री झाल्या. महिलांवर अत्याचार, त्यांचे लैंगिक शोषण करणार्‍यांना कडक शासनाचे धोरण त्यांनी अवलंबले. पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकर्‍यांना दया दाखवण्यासाठीच्या हालचाली केल्याबद्दल त्या वादग्रस्त ठरल्या. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार असताना तमिळनाडूत आपण सर्वसमावेशक विकास केल्याचा दावा त्यांनी केला होता. तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यावरही त्यांनी अनेकदा टीका केली होती. जयललिता यांना आदराने आम्मा किंवा आम्मू म्हणतात. वाचनाचा छंद असलेल्या जयललितांचे ग्रंथालय सुसज्ज आहे.आता त्यांना जेलमध्ये त्यांचा हा छंद जोपासायला मोठा वाव मिळेल.
----------------------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel