-->
संपादकीय पान शनिवार दि. २७ सप्टेंबर २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------
सगळ्यांनाच स्वबळाची उबळ
----------------------------------
विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना स्वबळाची उबळ राज्यातील प्रमुख चारही राजकीय पक्षांना आली. त्यामुळे घटस्थापनेच्या मुहूर्तावर युतीतील आणि आघाडीतील पक्षांनी आपापल्या घटकपक्षांशी काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर राज्याची ब्लू प्रिंट अखेर सादर करणार्‍या मनसेनेही दंड थोपटल्याने आता बहुतांश ठिकाणी किमान पंचरंगी लढती होणार असल्याचे निश्‍चित झाले आहे. त्याच्याबरोबर डाव्या पक्षांच्या समितीने उभे केलेले उमेदवारही ठिकठिकाणी जोरदार लढत देतील. युतीची जवळपास तीन दशकांची व आघाडीची १५ वर्षांची मैत्री तुटल्याने राजकीय खळबळ उडाली आहे. एकीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस राज्यातील सरकारमधून बाहेर पडली तर, दुसरीकडे युती तुटल्यामुळे शिवसेनाही केंद्र सरकारमधून बाहेर पडणे आता भाग आहे. शिवसेनेने जागावाटप चर्चा केवळ मुख्यमंत्री पदाभोवती केंद्रित केली होती. कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील भ्रष्ट आघाडी सरकारला खाली खेचण्याचे मुख्य उद्दिष्ट त्यामुळे मागे पडणार असल्याने आमचा मार्ग आम्ही स्वीकारला, असे भाजप नेत्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दूरध्वनी करून आम्ही हा निर्णय कळवला असल्याचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी सांगितले.  २५ वर्षांची वैचारिक युती संपुष्टात आणताना त्रास होतो आहे. शिवसेनेबाबत प्रचारात एकही अपशब्द वापरला जाणार नाही, असे सावध उद्गार प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी काढले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या विषयावर कोणतीही प्रतिक्रिया देणार नसून शिवसेनेच्या पहिल्या प्रचारसभेतच ते वक्तव्य करतील असे सांगण्यात आले. शिवसेना खासदारांनी मात्र लोकसभा निवडणूक निकालानंतरच भाजपने हा निर्णय घेतला होता, येथपासून तर राष्ट्रवादीशी छुपी युती करण्याचा भाजपचा उद्देश आहे, असे आरोप केले आहेत. अर्थात या आरोपात तथ्य आहे. कारण गेल्या पंधरा दिवसात युती व आघाडीतील चर्चा पुढे जातच नव्हती व तुटण्याच्या स्थितीत राष्ट्रवादी, भाजपाने तिला आणून ठेवले होते. यातून युती-आघाडी तोडण्याचे सर्व काही पूर्व नियोज्त असावे, यात बरेच तथ्य आहे. संपूर्ण दिवसभर सुरू असलेल्या घडामोडीत महायुतीत असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर, शिवसंग्रामचे विनायक मेटे आणि रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले यांची पळवापळवी सुरू होती. स्व. गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे राजकारणात आलेले महादेव जानकर अचानक शिवसेनेच्या बाजूने बोलू लागल्यामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली होती. मात्र, सायंकाळी ते भाजपमध्ये परतले. युती संपुष्टात आल्याची घोषणा झाली तेव्हा जानकर हे घटक पक्षातले एकमेव नेते हजर होते. राजू शेट्‌टी यांनी युती संपुष्टात येणे दुर्दैवी आहे, आम्ही सर्व सहकार्‍यांशी चर्चा करून याबद्दलची भूमिका स्पष्ट करू असे सांगितले. रामदास आठवले यांच्याशी चर्चा करण्याची जबाबदारी विनोद तावडे यांनी स्वीकारली आहे. आठवले यांनी वारंवार मंत्रिमंडळात समावेश व्हावा अशी इच्छा बोलून दाखवली आहे. महाराष्ट्रातील दलित मतांची संख्या लक्षात घेता दोघेही आठवले यांना सोबत ठेवण्याचा प्रयत्न करतील हे उघड आहे. महायुतीचा घटस्फोट झाल्यानंतर दोन तासांतच राष्ट्रवादीने कॉंग्रेस सोबत काडीमोड घेतला. घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशीच आघाडी आणि महायुतीत घटस्फोट झाल्याने महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले. कॉंग्रेसने आघाडीसाठी कोणत्याही प्रकारचा सकारात्मक प्रतिसाद दिला नाही, असा आरोप करत राष्ट्रवादीने आगामी विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली. राष्ट्रवादी भवनामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि छगन भुजबळ यांनी एकत्रितपणे ही घोषणा केली. कॉंग्रेस सोडून इतर समविचारी पक्षांना सोबत घेऊन राष्ट्रवादी निवडणुका लढवेल, असे तटकरे यांनी स्पष्ट केले. तर, राष्ट्रवादी आघाडी सरकारमधून आजच बाहेर पडणार असल्याचे विधिमंडळ पक्षाचे गटनेते अजित पवार यांनी जाहीर केले. कॉंग्रेससोबत आघाडी तोडल्यानंतर अजित पवार थेट राजभवनवर गेले. राज्यपालांना त्यांनी आघाडी सरकारमधून राष्ट्रवादी बाहेर पडत असल्याचे पत्र दिले. त्यामुळे सध्या निवडणुका होण्याअगोदरच विद्यमान सरकार हे अल्पमतात आले आहे. सतत पंधरा वर्षे राज्यात कॉंग्रेससोबत धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळण्यासाठी राष्ट्रवादीने सोबत केली. अर्थात सत्तेची उब असल्यामुळेच ही आघाडी टिकली होती. सत्तेच्या गणिताच्या जुळणीसाठी ही आघाडी स्थापन झाली व सत्ता येत नाही हे स्पष्ट दिसू लागल्यावर ही आघाडी फुटली. राष्ट्रवादीच्या अधिक जागा असतानाही २००४ मधे राष्ट्रवादीने कॉंग्रेसकडे मुख्यमंत्रिपद दिले. मात्र, या वेळी लोकसभेत राष्ट्रवादीच्या दुप्पट जागा असतानाही कॉंग्रेसने विधानसभेच्या १४४ जागा आणि अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्यास प्रतिसाद दिला नाही. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली होती. पण, त्यानंतर दोन महिने उलटूनही कॉंग्रेसने प्रतिसाद दिला नाही. जागावाटपाची बोलणी अपूर्ण असतानाही कॉंग्रेसने उमेदवारांची पहिली यादी विश्‍वासात न घेता जाहीर केली. यामुळे राष्ट्रवादीने कॉंग्रेससोबतची आघाडी तोडण्याचा निर्णय घेतल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले. परंतु राष्ट्रवादीने यापूर्वीच २८८ जागांसाठी आपल्या पक्षातील उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या होत्या हे सांगण्यास पटेल विसरले. राज्य प्रशासनातील निर्णयक्षमता गतिमान होण्यासाठी आघाड्यांचे सरकार अडचणीचे ठरत असल्याचे दिसून येत होते. मात्र आजही आघाडी वा युती तोडताना संबंधित पक्षांचा फाजिल आत्मविश्‍वास जाणवित आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता कोणताच एक पक्ष सध्याच्या स्थितीत स्वबळावर निवडून येऊ शकत नाही. सगळ्यांनाच स्वबळाचा उमाळा आला आहे, यातून त्यांची ताकद त्यांना दिसेल.
-------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel