-->
संपादकीय पान बुधवार दि. २३ मार्च २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
-------------------------------------
पत्रकार मीर हमीद यांच्यावरील हल्लेखोर कोण?
-----------------------------------
पाकिस्तानचे पत्रकार हमीद मीर यांच्यावर कराची विमानतळावरून गेल्या शनिवारी दुपारी जिओ चॅनलच्या कार्यालयाकडे जात असताना चार अज्ञात मारेकर्‍यांंनी त्यांच्या मोटारीवर हल्ला  केला. यात ते सुदैवाने बचावले. पाकमध्ये अतिरेक्यांच्या हल्ल्‌यात १९९० मध्ये ५० हून अधिक पत्रकारांचे बळी गेले आहेत. हमीद मीर यांनी पाकिस्तानात चाललेल्या दहशतवादी कारवाया आणि आयएसआयने पाकिस्तानी लष्करात केलेल्या भ्रष्टाचाराची प्रकरणे उजेडात आणली होती. तालिबानी संघटनेच्या कारवायासंदर्भात त्यांनी वार्तांकने केलेली होती. ओसामा बिन लादेनची मुलाखत घेण्याची संधी ज्या मोजक्या पत्रकारांना मिळाली होती त्यात हमीद मीर यांचा समावेश आहे.
जिओ टीव्हीफमधील मीर यांच्या कारकिर्दीला दक्षिण विभागाचे संपादक म्हणून २००२ मध्ये सुरवात झाली. या वाहिनीवर नोव्हेंबर २००२ पासून ते कॅपिटल टॉकफ हा कार्यक्रम सादर करीत आहेत. हा कार्यक्रम पाकिस्तानात लोकप्रिय झाला आहे. पाकिस्तानचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान हिलाल-ई-इम्तियाजफ देऊन मीर यांना त्यांच्या पत्रकारितेतील कारकिर्दीचा गौरव करण्यात आला आहे. कोंडालिसा राईस, टोनी ब्लेअर आणि लालकृष्ण अडवानी यांसारख्या नेत्यांच्या मुलाखती त्यांनी घेतल्या आहेत. त्यांच्यावर मुशर्रफ सरकारने २००७ मध्ये बंदी घातल्यानंतर रस्त्यावर उतरून त्यांनी जनतेसमोर आपले म्हणणे मांडले. जनतेकडूनही त्यांना मोठा पाठिंबा मिळाला. मीर यांच्या रोड शोला वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राने पहिल्या पानावर प्रसिद्धी दिली होती. डर स्पीगेल या प्रसिद्ध जर्मन नियतकालिकाने त्यांना पाकिस्तानमधील सर्वाधिक लोकप्रिय पत्रकार म्हणून घोषित केले होते. पाकिस्तानमध्ये १९९० पासून पन्नास पत्रकारांची हत्या झाली असून, या हत्या प्रकरणांचा गुंता अद्याप तपास यंत्रणांना उलगडता आला नाही. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेवर कशा प्रकारे घाला घालून मुस्कटदाबी करण्याचे काम सुरू आहे, याचाच प्रत्यय यातून येतो. दहशतवाद्यांनी कितीही धमकावले, तरी त्यांना भीक न घालण्याची धमक मीर यांनी दाखविली आहे.
तालिबानी शक्तींनी केलेल्या हल्ल्‌याचे लागोपाठ दुसर्‍यांदा लक्ष्य ठरलेले हमीद मीर पाकिस्तानातील सर्वांत लोकप्रिय पत्रकार आहेत. पाकिस्तानमधील जिओ टीव्हीफ या वृत्तवाहिनीत काम करणारे मीर यांच्यावर हल्ला होण्याला कारणीभूत आहे तो त्यांचा निर्भीड बाणा. अमेरिकेवरील ९/११च्या हल्ल्‌यानंतर पहिल्यांदा क्रूरकर्मा दहशतवादी ओसामा बिन लादेन याची मुलाखत घेतली ती मीर यांनीच. यासोबत उर्दू, हिंदी, बंगाली आणि इंग्रजी वृत्तपत्रांसाठी स्तंभलेखनही करतात.
सिरियापाठोपाठ पाकिस्तानही पत्रकारांसाठी असुरक्षित देश मानला जातो. अमेरिकेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्‌यानंतर माध्यमातील विविध प्रतिनिधींना अल् कायदा या अतिरेकी संघटनेने लक्ष्य केले. वॉल स्ट्रीट जर्नल या आघाडीच्या वृतपत्राचा पत्रकार डॅनियल पर्लची तालिबानींनी केलेली क्रूर हत्या त्याचीच परिणती होती. दहशतवादी संघटनेच्या कारवाया, संरक्षणविषयक बातम्या देणार्‌या पत्रकारांना नेहमीच आपला जीव धोक्यात घालून काम करावे लागते. कधी कधी तर परराष्ट्रात गेलेल्या पत्रकारांना हस्तक ठरवून जेरबंद केल्याच्या घटना आहेत. हमीद मीर यांना २०१२ मध्येदेखील जिवे मारण्याचा प्रयत्न झाला होता. गेल्या जानेवारी महिन्यात कराची येथे प्रसारमाध्यमांत काम करणार्‌या तिघांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले होते, तर तीन आठवड्यांपूर्वी लाहोर  येथे एका वृत्तनिवेदकावर करण्यात आलेल्या हल्ल्‌यातून तो सुदैवाने बचावला होता. हमीद मीर यांच्यावरील हल्ल्‌याचा पाकिस्तान व अमेरिकेने निषेध केलेला असला तरी हे मगरीचे नक्राश्रू आहेत. पाकिस्तानातील पत्रकारांना निर्भय व मुक्त वातावरणात काम करता यावे यासाठी तेथील सरकारने कधीच ठोस पावले उचलली नव्हती व भविष्यात तसे होण्याची शक्यताही धूसर आहे.
------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel