-->
संपादकीय पान मंगळवार दि. २२ मार्च २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------
भ्रष्टाचारी भस्मासूर गाढा
--------------------
जिल्ह्याचे पालकमंत्री, जलसंपदामंत्री व राष्ट्रवादी कॉँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार सुनिल तटकरे यांनी गैरमार्गाने कशा प्रकारे २५ हजार कोटी रुपयांची माया जमविली याचे सविस्तर विवेचन करणारी श्‍वेतपत्रिका आम्ही आजच्या अंकात सोबत एका खास पुरवणीव्दारे दिली आहे. या श्‍वेतपत्रिकेतून तटकरे यांनी सरकारी पैशावर कशा प्रकारे डल्ला मारला व हा पैसा कंपन्यात गुंतवून आपण त्यातले नाही, आपण प्रमाणिक आहोत असे दाखविण्याची धडपड सुरु केली आहे. मात्र या श्‍वेतपत्रिकेव्दारे तटकरे यांचे बिंग फुटले आहे. जो पैसा विकास कामांसाठी खर्च केला गेला पाहिजे होता तो पैसे तटकरे यांनी आपल्या खिशात घातल्याचे यावरुन सिध्द झाले आहे. किरीट सोमय्या व काही सामाजिक संस्थांनी लाचलुचपत विभाग, पोलीस, राज्य सरकार यांच्याकडे तटकरे यांच्या गैरव्यवहाराची चौकशी करावी अशी वारंवार मागणी करुनही त्याला सरकारी यंत्रणांनी पाठिशी घातल्याने अखेर न्यायालयात पी.आय.एल. दाखल करण्यात आला. तटकरे व त्यांच्या कुटुंबियांच्या विरोधात प्रथमदर्शनी पुरावा असल्याने पी.आय.एल. उच्च न्यायालयाने दाखल करुन घेतली. तटकरे हे त्यांची चौकशी करणार्‍या विविध सरकारी खात्यंावर दबाव आणून हे सर्व प्रकरण दडपून टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. तटकरे यांनी भ्रष्ट मार्गाने कमविलेला पैसा बेनामीत नोकरांच्या नावावर किंवा आपल्या नातेवाईकांच्या नावावर फिरवून आपण नामानिराळे राहाण्याचा प्रयत्न करीत आहेत. कारण त्यांना ज्यावेळी टी.व्ही. चॅनेल्सनी या गैरव्यवहाराबाबत छेडले असता ते म्हणाले होेते, माझा मुलगा व्यवसाय पाहतो. त्याच्या किती कंपन्या आहेत याची मला काही कल्पना नाही. मात्र ही त्यांची सर्व बनवाबनवी आहे. सुरुवातीला विविध छोटी कामे घेऊन काम करणारे हे तटकरे के काळाच्या ओघात करोडो रुपयांचे मालक झाले. त्यांची ही प्रगती मंत्रिपद आल्यापासून झालेली आहे. या श्‍वतपत्रिकेत दिलेल्या आकडेवारीनुसार, तटकरे यांच्या सर्व कंपन्यांचे बाजारमूल्य हे २५ हजार कोटी रुपाहून जास्त भरेल. त्यावरुन या भ्रष्टाचाराचे स्वरुप किती गंभीर आहे त्याची कल्पना येते. एकीकडे आपण समाजसेवा करीत आहोत असे दाखवायचे आणि दुसरीकडे मात्र सरकारी पैसा आपल्या खिशात घालावयाचा असे धंदे तटकरेंनी केले आहेत. त्याचे सज्जड पुरावे आम्ही सोबतच्या पुरवणीत सादर केले आहेत. सुनील तटकरे यांनी कोणत्याही कायद्याची पत्रास न ठेवता आपल्या कुटुंबियांच्या व त्यांनी स्थापन केलेल्या शेकडो कंपन्यातून तीन हजार एकरच्या वर जमीन बळकावली आहे. तटकरे यांच्या कंपन्यांच्या नावावर शेतजमीनीचे व्यवहार खरेदी खताव्दारे आधी नोंदविले जातात व त्यानंतर कालांतरीने लागणार्‍या परवान्या घेतल्या जातात. नोंदणी कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयावर तटकरेंचा दबाव असल्यानेच या परवानग्या मिळतात हे स्पष्ट आहे. त्यांनी एकाच जमीन अधिग्रहणाच्या परवानगीसमोर कित्येक जमीनींची खरेदी केल्याचे प्रकरण उघड झाले आहे. ही सर्व प्रकरणे सोबतच्या पुरवणीत सादर करण्यात आली आहेत. ही सर्व प्रकरणे वाचल्यावर तटकरे हे शेतकरी नव्हे तर भू माफिया आहेत हे स्पष्ट झाले आहे. तटकरे हे नेहमीच विकासाच्या गप्पा करतात, त्यामुळेच दिल्ली-मुंबई कॉरिडॉरसंबंधी त्यांनी सुरुवातीपासून मौन बाळगले. परंतु कॉरिडॉरव्दारे होणारा हा विकास विकास नसून शेतकर्‍यांचे जीवन भकास करणारे आहे. त्यामुळे याला सुरुवातीपासून जर विरोध तटकरेंनी केला असता तर आपण समजू शकलो असतो. परंतु तटकरे आता मते मागायला आल्यावर या प्रकल्पाला विरोध असल्याचे सांगतात. कारण यातून जे हजारो शेतकरी बेघर होणार आहेत त्यांना तोंड काय तटकरे दाखविणार? मते मागणे ही तर पुढची बाब आहे. या कॉरिडॉरचा विळखा माणगाव, तळा, रोहा याच तालुक्यांबरोबर संपूर्ण रायगड जिल्ह्यांना बसणार आहे. एक पालकमंत्री म्हणून याबाबत कोणती भूमिका तटकरेसाहेबांनी घेतली याचे स्पष्टीकरण त्यांनी देण्याची वेळ आता आली आहे. अशा प्रकारे पालकमंत्री म्हणून तटकरे यांची कामगिरी निराशाजनक असताना जलसंपदा मंत्री म्हणूनही त्यांची कामगिरी शून्य आहे. जिल्ह्यातील अनेक जलसंधारणाचे प्रकल्प मार्गी लागलेले नाहीत. अनेक धरणांवर खर्च झालेला आहे मात्र तो खर्च कागदावर केला आहे. प्रत्यक्षात खर्च होऊनही कोणताच जलसंधारणाचा प्रकल्प पूर्ण झालेला नाही. यावरुन त्यांची कार्यक्षमता दिसते. या श्‍वेतपत्रिकेत राज्यातले वर्षानुवर्षे अर्धवट राहिलेल्या प्रकल्पांची एक यादी सादर करण्यात आली आहे. यातील प्रत्येक प्रकल्पाचे विस्तृत विवेचन करुन जलसंपदा मंत्र्यांच्या कार्याचे विल्शेषण करण्यात आले आहे. सूर्या प्रकल्प, टाळंबा प्रकल्प, भातसा प्रकल्प, तिलारी प्रकल्प, तापी खोरे, पुणंद प्रकल्प, निम्म तापी, भीमा उजनी प्रकल्प, नीरा देवघर प्रकल्प, टेंभू उपसा प्रकल्प, सीना माढा उपसा प्रकल्प, निम्म वर्धा प्रकल्प, उर्ध्व वर्धा प्रकल्प, खडकवासला प्रकल्प यांच्याबरोबरीने विदर्भातील ३३७ पप्रकल्पांची यादीच सादर करण्यात आली आहे. यात हे प्रकल्प कधी सुरु झाले, त्यासाठी किती खर्च अपेक्षित होता, प्रत्यक्षात खर्च कितीने वाढले, असे होऊनही ते प्रकल्प पूर्णही झाले नाहीत अशी सर्व उदाहरणे देण्यात आली आहेत. यातील पश्‍चिम महाराष्ट्रातील १९ मोठ्या प्रकल्पांचा नियोजित खर्च तिप्पट झाल्याचे दाखविले आहे. हे केवळ जाणीवपूर्वक करण्यात आले आहे. यातूनच करोडो रुपयाचा मलिदा तटकरे यांनी आपल्या खिशात घातला आहे. याचे सर्व योग्य वस्तुनिष्ठ वर्णन उदाहरणे देऊन या श्‍वेतपत्रिकेत मांडण्यात आले आहे. लोकांच्या जनजागृतीसाठी आम्ही यातील काही भाग प्रकाशित केला आहे. वाचक याचे स्वागत करतील याची आम्हाला खात्री आहे.
----------------------------------      

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel