-->
संपादकीय पान-अग्रलेख 5oct 2013
------------------------
चैतन्यशक्तीचे स्वागत करताना...
----------------------
आजपासून देवीची स्थापना करुन नवरात्रींचा प्रारंभ होत आहे. चैतन्यशक्तीचे प्रतिक असलेल्या देवीचे आपण मोठ्या धुधडाक्यात स्वागत करतो. तसे पाहता या नवरात्रीपासून विविध सणांना प्रारंभही होतो. दसरा, दिवाळी त्यानंतर नाताळ अशी सणांची मालिकाच असते. देवी हे साक्षात नवचंडीचे रुप आणि ती खरी चैतन्यदेवता. स्त्री शक्तीचे शक्तीशाली रुप आपल्याला या देवीच्या रुपाने दिसते. जगाच्या अभ्युदयासाठी, विश्‍वकल्याणासाठी, समर्थ राष्टासाठी व संपन्नतेसाठी आपण देवीची पुजा करतो. ही पुजा आपण मोठ्या भक्तीभावाने जरुर करतो. मात्र या पुजेमागच्या अर्थाचे आपण कितापत पालन करतो? या सणाच्या निमित्ताने आपण देवीची पुजा करतो खरे पण आपण आपल्या घरातील, आजू-बाजूस राहाणार्‍या महिलांना मान-सन्मान देतो का हा प्रश्‍न उपस्थित होतो. हा जर आपण मान सन्मान आपण दिला असता तर गेल्या वर्षात जे महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडल्या त्या एैकावयास आल्या नसत्या. त्यामुळे आपण देवीला पुजत असताना महिला शक्तीचा आदर केला पाहिजे. तरच देवी आपल्यावर प्रसन्न होईल. सध्याच्या आधुनिक युगात महिला या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. आज प्रत्येक क्षेत्र महिलांनी काबीज केले आहे. अगदी काबाडकष्ट करणार्‍या स्त्रीयांपासून ते देशाचे पंतप्रधानपद असो किंवा अंतराळातील भरारी असो प्रत्येक क्षेत्रात महिलांनी भरारी घेऊन आम्ही पुरुषांपेक्षा काही कमी नाही हे दाखवून दिले आहे. आपल्याकडे सावित्रीबाई फुले, बहिणाबाई या समाजसुधारकांनी स्त्रीयांना आपल्या हक्क्यांची जाणीव करुन दिली. आपल्याकडे सव्वाशे वर्षांपूर्वी केशवपन, सती जाणे यासारख्या अघोरी प्रथा होत्या. त्याविरुध्द समाजसुधारकांनी लढा देऊन स्त्रीयांना खर्‍या अर्थाने स्वातंत्र्य दिले. त्यानंतर आपला देश १९४७ साली स्वातंत्र्य झाला. स्वातंत्र्य लढ्यातही आपल्याकडे स्त्रीयांचा वाटा मोठा होता. पुढे स्वातंत्र्यानंतर घटनेने स्त्री-पुरुषांना समान हक्क दिले. परंतु हे हक्क आपण खर्‍या अर्थाने उपभोगीत आहोत का? असा प्रश्‍न उपस्थित होतो. कारण आजही आपल्या समाजात महिलांना दुय्यम स्थान दिले जाते. महिलांसाठी राखीव जागा ठेवताना तीव्र विरोध केला जातो. सर्व पक्षीय नेते या विरोधात एकत्र येताना दिसतात. हे कशाचे लक्षण आहे? यामागचे मुख्य कारण म्हणजे आजही आपल्यावर पुरुषप्रधान संस्कृतीचा जबरदस्त पगडा आहे. हा पगडा जोपर्यंत संपुष्टात येत नाही तोपर्यंत स्त्री खर्‍या अर्थाने स्वतंत्र होणार नाही. आज महानगरांमध्ये स्त्रीया पुरुषांच्या बरोबरीने काम करताना दिसतात. मात्र असे असले तरीही याच शहरांमधून स्त्री गर्भाची हत्या मोठ्या प्रमाणात होताना दिसते. यासाठी सरकारला गर्भलिंग चाचणीवर बंदी घालण्याचे पाऊल उचलावे लागते. सरकारवर अशी पाळी येताच कामा नये. जर आपण स्त्री-पुरुष समान मानले तरी प्रत्येकाला मुलगा हवा असे का वाटते? याचे मूळ आपल्या समाजव्यवस्थेत आहे. आपल्याला घटनेने समानता जरुर दिली परंतु मनाने आपण बुरसटलेल्या विचारांचेच राहिलो. त्यामुळेच पुरुष स्त्रीयांना आपल्यापेक्षा पुढे जाताना पाहू शकत नाही. ही मानसिकता बदलण्याची वेळ आता आली आहे. मात्र अशाही प्रतिकूल परिस्थितीत स्त्रीयांची घैडदौड सुरुच आहे. ग्रामीण भागात स्त्रीयांच्या साक्षरतेचे प्रमाण सुधारले आहे. मुलींना शाळेत जाण्यासाठी सायकल दिल्यावर तेथील मुलींची शाळेतील गळती थांबल्याचे बिहारमध्ये आढळले आहे. मुलगी ही आपल्यावरचे ओझे नाही हे आता पालकांनाही पटू लागले आहे. तिला चांगले शिकवले, सज्ञान केले तर ती मुलगी आपली म्हातारपणची काठी होऊ शकते. उलट वंशाचा दिवा म्हणून आपण ज्याच्याकडे पाहतो तोच मुलगा आपल्याला म्हातारपणात विचारत नाही अशा घटना अनेक ठिकाणी घडल्यामुळे मुलींकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलत चालला आहे. कोणताही बदल हा झपाट्याने होत नाही त्यासाठी किमान पिढ्या जाव्या लागतात असे म्हणतात. महिलांच्या संदर्भातही असेच आहे. स्त्रीयांना कायद्याने मिळालेली समानता प्रत्यक्षात उतरण्यासाठी अजून काही काळ जावा लागेल असे दिसते. परंतु यासाठी समाजप्रबोधन करावे लागेल. अनेक क्षेत्रात स्त्रीया आघाडीवर आल्या म्हणजे देशातील सर्व स्त्रीयांचा उध्दार झाला असे नव्हे. त्यासाठी प्रत्येक मुलीला शिक्षण मिळाले पाहिजे. शिक्षणातूनच तिची प्रगती होणार आहे. गेल्या काही वर्षात स्त्रीयांवरील अत्याचार प्रामुख्याने बलात्कारासारख्या घटना वाढल्या आहेत. दिल्लीतील घटनेनंतर झालेला जनक्षोभ हा त्याचा एक उद्रेक होता. यातूनच सरकारला कायद्यात बदल करावा लागला. अशा प्रकारच्या कायद्यामुळे लोकांमध्ये जरब जरुर बसेल परंतु अत्याचार पूर्णत: थांबत नाहीत. सौदी अरेबियासारख्या देशात अनेक गुन्ह्यांसाठी कडक शिक्षा आहेत परंतु त्यामुळे काही गुन्हे कमी झालेले नाहीत. त्यामुळे समाजाचे परिवर्तन हे महत्वाचे आहे. महिलांना समानतेच्या पातळीवर वागविणे, त्यांना कमी न लेखणे व पुरुषी मानसिकता बदलण्याची गरज आहे. आजपासून आपण देवींची पुजा करणार आहोत. अशा वेळी स्त्रीशक्तीचा गौरव करण्यासाठी प्रत्येकाने पाऊल उचलले पाहिजे. घरच्या देवीचा जर आपण सन्मान केला तरच आपल्यावर मूर्तीतली देवी प्रसन्न होणार आहे हे विसरता कामा नये.
---------------------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel