
धर्मांधतेचा विषाणू
22 एप्रिल २०२० अग्रलेख
सध्या देशात सर्वांचाचा कोरोना विषाणूशी लढा सुरु आहे. अर्थात हा विषाणू अज्ञात आहे व आपल्याला उघड्या डोळ्याने दिसू शकत नाही. अर्थात हा विषाणू कोणत्याही जाती, धर्माच्या लोकांना सोडत नाही, ठराविक धर्मातील लोकांवर हल्ला करतो असेही त्याचे नाही. तो सर्वांना हल्ला करताना समान मानतो. त्यामुळे अशा या न दिसणाऱ्या शत्रुशी आपल्याला लढावे लागत आहे. त्याचबरोबर सध्या या लढाईतही आपल्याला व उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला धर्मांधतेचा विषाणू त्रास देऊ लागला आहे. सध्याच्या कठीण काळातही उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला अडचणीत आणावयाचे व आपले राजकारण पुढे रेटायचे. सध्याचे हे सरकार पाडावयास अनेक विषाणू टपून बसले आहेत. सत्ता गेल्यामुळे हे विषाणू खूपच अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे ठाकरेंचे हे सरकार काहीही करुन पाडायचेच असा त्यांचा निर्धार होता. परंतु कोरोनाची लढाई सुरु झाली आणि सर्वांचे लक्षच फिरले. त्यापूर्वी त्या विषाणूने कॉँग्रेसचे मध्यप्रदेशातील सरकार पाडून हायसे वाटून घेतले होते. परंतु त्यांचे सर्वांचे लक्ष्य आता ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकारकडे लागले असतानाच कोरोनाचा धोका वाढला आणि त्यांचा नाईलाज झाला. आपण सर्वच जण कोरोनाच्या लढ्यास सहभागी झालो आहोत असे भासवत कुठे एखादी सरकारविरोधी संधी मिळते का त्याचे हे विषाणू वाट बघत आहेत. पालघर येथे नुकतीच झालेली घटना म्हणजे त्या विषाणूंना हिंदूधर्मीयांवरील हल्ला वाटला आणि सध्याचे सरकार कसे हिंदूविरोधी आहे असा प्रचार करण्यास प्रारंभ केला. या घटना जाणून घेताना आपण यामागचे राजकारणही पाहणे गरजेचे ठरणार आहे. पालघर येथील तीन जणांची जमावाने ठेचून हत्या केल्याचे हे प्रकरण आहे. मृतांमध्ये दोन साधू होते, त्यामुळे या प्रकरणाला धार्मिक रंग देऊन राज्य सरकाराला बदनाम करण्याचे कारस्थान रचले गेले. सोशल मिडियातून हे प्रकरण अल्पावधीत धार्मिक असल्याने रंगविण्यास सुरुवात झाली. यामागे कोणत्या शक्ती आहेत हे सांगावयास फार मोठे काही राजकीय तज्ञ असण्याची आवश्यकता नाही. 16 एप्रिल रोजी रात्री ही घटना कासा पोलिस ठाणे हद्दीत ही घटना घडली. तेथून काही मीटर अंतरावर दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाची सीमा सुरु होते. संबंधीत साधू व त्यांच्यासोबतची काही मंडळी या सीमेवरुन जात असताना तेथील पोलिसांनी मध्यरात्री त्यांना अडविले व परत पाठविले. परत जात असताना या दुर्गम ठिकाणी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. हा हल्ला त्या भागात पसरलेल्या अफवेतून गैरसमजुतीने झाला आहे. या भागापासून पालघर सुमारे 100 किमी अंतरावर आहे. महाराष्ट्र पोलिसांनी या घटना स्थळी धाव घेतली व दिवसभरात या गुन्ह्याशी संबंधीत सुमारे 100 लोकांना जेरबंद केले. त्यात 9 अल्पवयीन मुले असून त्यांची रवानगी रिमांड होम करण्यात आली आहे. या घटनेचा संबंध धार्मिकतेशी लावून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. भाजपा प्रणित सोशल मिडियातील अनेकांना यामुळे भरते आले व विषारी प्रचार सुरु झाला. हे प्रकरण वरुन दिसते एवढे सोपे नाही. कारण ज्या गडचिंचले ग्रामपंचायतीत हे प्रकरण झाले ती पंचायत भाजपाच्या ताब्यात दहा वर्षे आहे. तेथील सरपंच हा भाजपाचाच आहे. दोघा साधुंची झालेली हत्या हा निंदनिय प्रकार म्हटला पाहिजे. या झालेल्या प्रकारचा तीव्र शब्दात निषेध झाला पाहिजे. माणुसकीला काळीमा लावणारी ही घटना आहे. नेमके याच गावात मुळे पळविणारी टोळी कार्यरत असल्याची अफवा गेली काही दिवस होती. त्यातच हे साधू येथे रात्री सापडल्याने व त्यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने त्यांच्यावर हल्ला केला गेला. त्यावेळी खबर आल्याने तेथे आलेल्या पोलिसांवरही जमावाने हल्ला केला. पोलिसांना झालेली मारहाण ही कॅमेरॅत कैद झाली आहे. यामुळे गुन्हेगारांना पकडणे पोलिसांना शक्य झाले आहे. त्याचबरोबर यात सहभागी झालेल्या दोन पोलिसांना राज्य सरकारने तातडीने निलंबित केले आहे. तसेच हे प्रकरण सी.बी.आय.च्या ताब्यात दिले आहे. मात्र वस्तुस्थिती दाखविण्याएवजी येथे धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न चॅनेल्सनी केला. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे सध्या कोरोनाच्या लढाईत गुंतलेले असतानाही त्यांनी वेळीच यात हस्तक्षेप करुन आरोपींना गजाआड करण्यास सांगितले व जनतेशी संवाद साधून खरे स्वरुप उघड केले. त्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्र्यांशी बोलून खरे काय घडले आहे त्याची कल्पना दिली. उध्दव ठाकरे यांनी सध्याच्या तणावाच्या काळात एक नवा तणाव व वाद उफाळून येऊ नये यासाठी विशेष प्रयत्न केले. पालघर जवळची ही घटना म्हणजे ठाकरे सरकारला बदनाम करण्याची नामी संधी आली आहे असे समजून अनेक हिंदुत्ववादी संघटना पुढे सरसावल्या व त्यांनी या घटनेचा निषेध करुन लगेचच हिंदुंवर कसे हल्ले होत आहेत असे रंगविण्यास सुरु केले. अर्थात सत्ता गेल्यामुळे अस्वस्थ झालेले अनेक धर्मांध विषाणू गेल्या काही दिवसात सक्रिय झाले आहेत. वांद्रे येथे रेल्वे स्टेशनवर चॅनेल्सची बातमी पाहून झालेली गर्दी ही निश्चितच संशयास्पद होती. सध्या भाजपाचे राज्यातील नेते सत्ता नसल्याने अस्वस्थ आहेत. केंद्रातील सरकार आपले असल्याने त्याच्या मदतीने आपण राज्यातील सरकार मध्यप्रदेशाच्या धर्तीवर पाडू शकतो असा त्यांना विश्वास वाटतो. त्यासाठी ते पडद्याआड अनेक नाटके करीत आहेत. यातूनच त्यांनी साधूंच्या झालेल्या हत्या प्रकरणाला धार्मिक रंग दिला, परंतु ठाकरे यांनी जनतेपुढे वस्तुस्थिती सांगून हा डाव उधळला.
0 Response to "धर्मांधतेचा विषाणू"
टिप्पणी पोस्ट करा