
आशा-निराशेचा खेळ
कोरोनाचे देशातील रुग्ण आता 50 लाखावर पोहोचले असून दररोज सरासरी त्यात 90 हजारांनी भर पडत आहे. ही सर्वात चिंतेची व निराशाजनक बाब आहे. मात्र त्या निराशेबरोबरच आशेचा किरण दाखविणारी एक बातमी प्रसिध्द झाली आहे व ती म्हणजे, पेट्रोल-डिझेलची मागणी आता झपाट्याने वाढत असून कोरोनापूर्व स्थितीच्या जवळ येऊन ठेपली आहे. त्यामुळे आपल्या अर्थकारणाचे चक्र आता वेग घेऊ लागले आहे असे दिसते. आपल्याकडे 40 लाखावरुन रुग्ण 50 लाखावर केवळ 11 दिवसात पोहोचले आहेत. त्यामुळे कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत आहे हे सिध्द होते. देशाच्या कानाकोपऱ्यात आता कोरोनाने आपले बस्तान मांडले आहे. दररोज 90 हजाराहून रुग्ण आढळत असताना समाधानाची बाब म्हणजे बरे होणारे रुग्ण देखील झपाट्यने वाढले आहेत. त्यामुळे कोरोनातून यशस्वीरित्या बाहेर पडलेल्यांचे प्रमाण आता 78.5 टक्क्यांवर आले आहे. मात्र कोरोनाने मरण पावलेल्यांची संख्या दररोज 1100 च्या आसपास आहे. हे प्रमाण मात्र काही कमी होत नाही हा चिंतेचा विषय आहे. गेले दहा दिवस सरासरी हजाराहून जास्त लोक कोरोनाचे बळी पडत आहेत. या संख्येवर मर्यादा येऊन ही संख्या शून्यावर येणे गरजेचे आहे. राज्यांचा विचार करता महाराष्ट्रात सर्वाधीक म्हणजे तीन लाख रुग्ण आहेत. राज्यातील रुग्णांचा आकडा घसरण्याची चिन्हे दिसत आहेत. मुंबई, पुण्यासारख्या महानगरात व मध्यम आकारातील शहरात गणपतीनंतर रुग्ण वाढले आहेत. त्याअगोदर रुग्णसंख्येवर नियंत्रण बसल्याचा आलेख तयार होत होता. मात्र गणपती उत्सवाने त्याला ब्रेक लागला. तामीळनाडून गेले दोन आठवडे रुग्णसंख्या घटते आहे. तर दिल्लीतही काही सकारात्मक चिन्हे दिसू लागली आहेत. केरळाने एकेकाळी कोरोनावर चांगलेच नियंत्रम मिळविले होते, मात्र आता केरळातही रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्याखालोखाल ओडीसा, पंजाब व राजस्थानात रुग्ण वाढत आहेत. एकूणच देशाची स्थिती पाहता कोरोनावर पूर्ण नियंत्रण मिळविण्यास अजून बराच काळ लागेल अशी चिन्हे दिसत आहेत. कोरोनासह आता आपल्याला काही काळ म्हणजे निदान लस येईपर्यंत तरी जगले पाहिजे अशी मानसिकता लोकांची झाली आहे. सरकारने लॉकडाऊन शिथील केल्यापासून आता बहुतांशी क्षेत्र खुली होत आहेत. गर्दी होणारी ठिकाणे मात्र उघडण्याचे अजून तरी सरकारने ठरविलेले नाही व त्यांचा हा निर्णय योग्यच आहे. परंतु लोकही आता आपपल्या परीने कामाला लागले आहेत. ज्यांना ऑनलाईन काम करणे शक्य होते त्यांनी केले मात्र सर्वच जण ऑनलाईन काम करु शकत नाहीत. कोरोनावरील संकटामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर ज्यांच्या नोकऱ्या टिकल्या आहेत त्यांच्या पगारात कपात झाली आहे. मात्र खर्च तेच राहिल्याने सर्वसामान्यांचे जीवन कठीण झाले आहे. लॉकडाऊन अंशत उठविल्याने हळूहळू जीवन पूर्ववत होण्यास मदत झाली आहे. कोरोनापूर्वीच्या काळात झालेल्या डिझेल विक्रीपेक्षा आता सप्टेंबर महिन्यात पहिल्या पंधरा दिवसात 19 टक्केच कमी खरेदी झाली आहे. म्हणजे डिझेलची खरेदी वाढल्याने वाहतूकीत सुधारणा झाल्याचे स्पष्ट दिसते. पेट्रोलची खरेदीही कोरोनापूर्व काळाच्या आसपास आली आहे. ऑगस्ट महिन्यात चार चाकी वाहानांचा खप 14 टक्क्यांनी व दुचाकी वाहानांचा खप दोन टक्क्यांनी वाढला आहे. पुढील महिन्यांपासून सणांचा हंगाम सुरु होत आहे. यावेळी दरवर्षीप्रमाणे उत्साह नसला तरीही थोड्या फार प्रमाणात खेरदीला वेग मिळेल. यातून अप्रत्यक्षरित्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. गेल्या सहा महिन्यात आपल्या अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले आहे. खरे तर नुकसान हे गेले तीन वर्षे सरकारने घेतलेल्या निर्णयातून होत आहे. अर्थव्यवस्था डबघाईला केवळ कोरोनामुळे नाही तर गेल्या पाच वर्षातील सरकारी धोरणांमुळे आली आहे. कोरोना हे आता केवळ निमित्त आहे. कोरोनापूर्वी बेकारीने 35 वर्षाचा निचांक गाठला होता तसेच सात वर्षापूर्वी विकासाचा असलेला सात टक्के दर आता चार टक्क्यांवर आला होता. सरकारच्या आर्थिक धोरणाचे हा परिपाक होता. आता तर कोरोनामुळे आपण उणे 23 टक्क्यांवर विकास दर आणून ठेवला आहे. लॉकडाऊनचे फायदे-तोटे आता सरकारला अभ्यासावे लागतील. तसेच आपल्या धोरणात बदल करुन अर्थव्यवस्थेला गती द्यावी लागेल. विकासाचा दर उणे 23 वर घसरला असला तरीही शेअर बाजार मात्र तेजीत आहे. सेन्सेक्स कोरोना पूर्वीच्या स्थितीत पोहोचत आहे. येत्या काही दिवसात सेन्सेक्स 40 हजारांवर पोहोचेल. अर्थव्यवस्था एवढी डबघाईला गेली असताना मात्र शेअर बाजार कसा तेजीत आहे असा अनेकांना प्रश्न पडतो आहे. पंरतु शेअर बाजारात अर्थव्यवस्थेचे प्रतिबिंत उमटते असे नव्हे. समभागांची हालचाल ही प्रामुख्याने कंपन्यांच्या कारभारावर अवलंबून असते. अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम त्या कंपन्यांच्या आर्थिक निकालांवर होत असतात. कंपन्यांचे आर्थिक निकाल चांगले असल्यास शेअर बाजार तेजी राहाणारच. आपल्या देशातील आघाडीच्या ब्ल्यू चिप कंपन्यांपैकी बहुतांशी कंपन्यांना लॉकडाऊनचा फटका बसलेला नाही. त्याचे उत्पादन, त्यांची कार्यक्षमता ही त्याच वेगाने सुरु होती. आय.टी., औषध, बँकिंग, जीनवावश्यक वस्तू या कंपन्या सुरुच होत्या. शेअर बाजार निर्देशांकात या कंपन्यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे शेअर बाजाराला फटका बसला तरी तो हंगामी होता. या तेजीचा विकास दराशी, अर्थव्यवस्थेशी काही संबंध नाही. अर्थव्यवस्थेला गती देण्याचे काम सरकारचे आहे. त्यात त्यांना पूर्णपणे अपयश आले आहे.
0 Response to "आशा-निराशेचा खेळ"
टिप्पणी पोस्ट करा