-->
स्वाईन फ्ल्यूचा धोका / कामगारांची असुरक्षितता

स्वाईन फ्ल्यूचा धोका / कामगारांची असुरक्षितता

बुधवार दि. 06 मार्च 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
स्वाईन फ्ल्यूचा धोका
गेल्या दोन महिन्यात राज्यात स्वाइन फ्लूची 518 जणांना लागण झाली असून 27 जणांचा मृत्यू झाला आहे. थंडी लांबल्याने जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांमध्ये स्वाईन फ्लूचा जोर वाढला आहे. गेल्या वर्षभरात स्वाइन फ्लूने राज्यात 462 जणांचा बळी घेतला आहे. सर्वाधिक मृत्यू नाशिक, पुणे, कोल्हापूर येथे झाले आहेत.
गेल्या वर्षभरात म्हणजेच 2018 मध्ये 2017 च्या तुलनेत स्वाईन फ्लूचा विळखा काही प्रमाणात कमी झाला असला तरी अजूनही हा आजार राज्यात थैमान घालत आहे. 2017 मध्ये 6144 रुग्णांना फ्लूची लागण झाली होती आणि यातील सुमारे 13 टक्के रुग्ण यामध्ये दगावले होते. या तुलनेत 2018 मध्ये रुग्णांची संख्या जवळपास 57 टक्क्यांनी कमी झाली असून 2,594 स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळलेत. त्या तुलनेत या मृत्यूची संख्या वाढली असून ती 12 वरून 18 टक्क्यांवर पोहोचली आहे. त्यामुळे एकीकडे रुग्णांची संख्या कमी झाली हे आश्‍वासक चित्र असले तरी एकूण रुग्णांच्या तुलनेत मृतांची संख्या वाढत आहे, ही चिंताजनक बाब आहे.
स्वाइन फ्लूचा विषाणू अतिसूक्ष्मजीव असून हवेत प्रसारित होताना त्याच्याभोवती एक आवरण गुंडाळून वावरतो. हे आवरण उन्हाच्या दाहाने वितळते. त्यामुळेच थंडीच्या दिवसांतील थंड वातावरणात हा विषाणू झपाटयाने पसरतो. जानेवारीनंतर ओसरणारी थंडी यावेळेस राज्यात फेब्रुवारीपर्यत तळ ठोकून होती. या काळात दिवसा वाढणारे तापमान आणि रात्रीचा गारवा या सततच्या वातावरण बदलामुळे स्वाइन फ्लूचा प्रसार गेल्या दोन महिन्यात वाढला आहे. स्वाइन फ्लूसाठी लस हा एक पर्याय आहे. यामध्ये गर्भवती महिला, मधुमेह, रक्तदाब असे रुग्ण आणि आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी या अतिजोखमीच्या तीन गटांना प्राधान्याने लसीकरण केले जाते. 2015 पासून एक लाखाहून अधिक लोकांना दरवर्षी हे लसीकरण केले आहे. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे हा आजार रुग्णांच्या खोकल्या आणि शिंकण्यावाटे उडणार्‍या थुंकीवाटे हवेत पसरतो. त्यामुळे याची लागण झालेल्या रुग्णांनी आजार बरा होईपर्यत गर्दीमध्ये वावर टाळणे, शिंकताना रुमालाचा वापर करणे, रुग्णाची सेवा शक्यतो कुटुंबातील एकाच व्यक्तीने करणे यासारख्या उपयांमधून संसर्ग रोखण्याची गरज आहे. 2017 मध्ये 1,208 रुग्णांना फ्लूची लागण झाली होती, तर 20 जणांचा मृत्यू झाला होता. 2018 मध्ये हे प्रमाण केवळ एक टक्का असून 23 रुग्णांना फ्लूची बाधा झाल्याचे आढळले असून एकही मृत्यूंची नोंद झालेली नाही. जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यात वाढलेल्या थंडीमुळे मुंबईतही फ्लूची लागण वाढली असून दोन महिन्यात 40 रुग्णांना लागण झाली आहे. स्वाईन फ्ल्यू हा तसा काही फारसा धोकादायक रोग नाही, परंतु आपल्याकडे त्याचा धोका वाढत चालला आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्याकडे सार्वजनिक आरोग्य व्यवस्था त्यासाठी सुसज्ज असणे आवश्यक आहे. परंतु तेस नसल्यामुळे अनेकदा गरीब रुग्णांना यावर चांगल्या रुग्णालयात उपचार घेणे परवडत नाही. त्यादृष्टीने यासाठी सर्व व्यवस्था सार्दनिक रुग्णालयात होणे गरजेचे आहे.
कामगारांची असुरक्षितता
कामगार कायद्यानुसार प्रत्येक कंपनीने कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षा अधिकारी आणि त्यासंबंधीची उपाययोजना करणे बंधनकारक आहे. कामगार सुरक्षेबाबत बड्या कंपन्यांमध्ये प्रबोधन होत असले, तरी असंघटित क्षेत्रात मात्र खर्चिक बाब असल्याने कामगार सुरक्षेला गौण मानले जात आहे. परिणामी, छोट्या-छोट्या युनिटमधील लाखो कंत्राटी कामगारांची सुरक्षा अधांतरी आहे, असे एका पहाणीत आढळले आहे. कामगार सुरक्षेसंदर्भातील धोरणांत सरकारने सुधारणा केली, मात्र सुरक्षाविषयक यंत्रणा राबविणे लघू आणि मध्यम उद्योजकांसाठी खर्चिक ठरत आहे. यावर उपाय म्हणून उद्योजक कंत्राटी कामगारांच्या माध्यमातून कामे उरकत आहेत. मात्र कंत्राटी कामगार कायद्यानुसार कंत्राटी कामगारांच्या सुरक्षेची जबाबदारी ही कंत्राटदाराऐवजी काम सुरू असणार्‍या संबंधित कंपनीच्या मालकाची असते.  बर्‍याचदा या तांत्रिक बाबी माहीत नसल्याने कामगार सुरक्षेबाबत गांभीर्याने घेतले जात नसल्याने अपघात झाल्यास कामगाराला भरपाईपासून मुकावे लागतेे. कामगार सुरक्षेबाबत कंपन्यांना स्वयंप्रमाणपत्राची हमी देण्याला (सेल्फ सर्टिफिकेशन) सरकारने मान्यता दिली आहे. मात्र ही पद्धत धोकादायक असून, कंपन्यांच्या कामगार सुरक्षेची खातरजमा कोण करणार, असा सवाल उपस्थित होतो. धोकादायक उद्योगांना दरवर्षी सुरक्षाविषयक लेखापरीक्षण करणे बंधनकारक आहे. कंपन्यांकडून चालढकल केली जाते, असे दिसते. उद्योगांमधील घनकचरा वर्गीकरण आणि शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट, सांडपाणी पुनर्प्रक्रिया, सुरक्षेसंदर्भात जनजागृती आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाची काटेकोर देखरेख असल्यास कामगार सुरक्षेचा दर्जा वाढवता येईल. कारखाना उत्पादनात कामगारांना दिले जाणारे सेफ्टी शू, सेफ्टी हेल्मेट, ग्लोव्हज यांसह इतर वैयक्तिक सुरक्षा उपकरणे मेक इन इंडिया मोहिमेपासून भारतात तयार होत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे सुरक्षा उपकरणांची आयात काही प्रमाणात रोखण्यास यश आले आहे. पूर्वी सुरक्षा उपकरणांची आणि वस्तूंची 100 टक्के आयात केली जात होती. आता त्याबाबतीत आपण स्वयंपूर्ण झालो असलो तरी अनेक असंघटीत कामगारांना या सर्वाचा फायदा होत नाही. त्यातून कामगारांची असुक्षितता वाढते.
------------------------------------------------------------------

0 Response to "स्वाईन फ्ल्यूचा धोका / कामगारांची असुरक्षितता"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel