-->
मुजोरी उतरवा

मुजोरी उतरवा

गुरुवार दि. 28 डिसेंबर 2017 च्या अंकासाठी अग्रलेख 
------------------------------------------------
मुजोरी उतरवा
हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानमध्ये मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नीला भेट देऊन मानवतेचे ढोंग करणार्‍या पाकिस्तानचा खरा चेहरा समोर आला आहे. याचे पडसाद संसदेत उमटणे स्वाभाविक होते. विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. आजवर कॉग्रेसच्या राजवटीत पाकिस्तानबाबत नरमाईचे धोरण घेणार्‍या तत्कालीन सरकारवर भाजपा नेहमी टिका करीत असे. आता मात्र सत्ते आल्यावर त्यांनी अध्याप पाकतिस्तानला धडा शिकविण्यासाठी फारसे काही मोठे धाडसी पाऊल टाकलेले नाही. कुलभूषण जाधव यांची सोमवारी त्यांच्या आई आणि पत्नीशी भेट झाली. केवळ 40 मिनिटांच्या या भेटीसाठी पाकिस्तानने कुलभूषण यांची आई आणि पत्नी दोघींचाही मानसिक छळ केल्याच्या धक्कादायक घटना समोर येत आहेत. एकूणच ही भेट म्हणजे पाकिस्तानच्या ढोंगी प्रवृत्तीचे दर्शन घडविणारे होते. कुलभूषण यांना भेटण्यापूर्वी कुलभूषण यांच्या आई आणि पत्नीला मंगळसूत्र, टिकली आणि बांगड्या काढून टाकण्याचे आदेश पाकिस्तानी अधिकार्‍यांनी दिले होते. भेटीदरम्यान कुलभूषण जाधव आणि त्यांच्या पत्नी व आई यांना मराठी बोलण्यावर बंदी घातली होती. या भेटीनंतर दोघीही लगेचच भारतात परतल्या होत्या. या दोघींनी मंगळवारी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली. या भेटीनंतर परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने यासंदर्भात धक्कादायक माहिती उघड केली. पाकिस्तानच्या वर्तणुकीची आणखी एक संतापजनक बाब म्हणजे, प्रत्यक्ष भेटीपूर्वी कुलभूषण यांच्या आई आणि पत्नीला कपडे बदलण्यासही स्थानिक अधिकार्‍यांनी भाग पाडले. त्यांच्या आईची पादत्राणेही पाकिस्तानने काढून घेतली आणि परतताना ही पादत्राणे दिली नाहीत. या भेटीचा पाकिस्तानने प्रचंड गवगवा केला आहे. आपण आन्तरराष्ट्रीय न्यायलयाच्या आदेशाचे कसे पालन केले हे दाखविण्याचा हा केविलवाणा प्रयत्न होता. मात्र ही वस्तुस्थिती बाहेर आल्यावर पाकिस्तानची बदनामीच होत आहे. कुलभूषण यांचा एक व्हिडिओही या भेटीपूर्वी पाकिस्तानने प्रसिद्ध केला आहे. भारताने या व्हिडिओतून दिसणार्‍या कुलभूषण यांच्या परिस्थितीवरही प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. कुलभूषण यांच्यावर प्रचंड दडपण असल्याचे यातून स्पष्टपणे जाणवत आहे. या व्हिडिओत त्यांनी पढवलेली उत्तरे दिली आहेत. या भेटीदरम्यान पाकिस्तानने कुलभूषण आणि त्यांच्या कुटुंबियांच्या भावनांची कदर करण्याइतकीही माणुसकी दाखविली नाही. कुलभूषण यांच्या आईला मराठीत बोलण्यासही पाकिस्तानने मनाई केली. इतकेच नव्हे, तर कुलभूषण यांच्याशी संवाद साधत असताना वारंवार त्यात अडथळे आणण्यात आले. विशेष म्हणजे, कुलभूषण यांच्या कुटुंबियांबरोबर असलेले भारताचे उपउच्चायुक्त जे.पी. सिंग यांनाही हे संभाषण ऐकू दिले नाही. एकूण तीन कॅमेरे लावून पाकिस्तानने ही संपूर्ण भेट रेकॉर्ड केली आहे. या भेटीसाठी ठरलेल्या गोष्टी पाकिस्तानने अजिबात पाळल्या नाहीत. या भेटीसाठीचे वातावरण प्रचंड निराशाजनक आणि दडपण आणणारे होते. तरीही कुलभूषण यांच्या कुटुंबियांनी ही परिस्थिती खूपच परिपक्वपणे हाताळली. याचा भारताने कडक शब्दात निषेध व्यक्त केला असला तरीही पाकिस्तानची मुजोरी काही संपलेली नाही असेच दिसते. कारण आपल्या छुप्या भारतविरोधी कारवाया पुन्हा पाकिस्तनाने सक्रिय केल्या आहेत. याला उत्तर देताना गेल्या वर्षीच्या सर्जिकल स्ट्राइकच्या धर्तीवर कारवाई करत, भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून पाकिस्तानच्या तीन सैनिकांना कंठस्नान घातले व त्यांची एक सीमाचौकीही उद्ध्वस्त केली. या कारवाईत पाकिस्तानचा आणखी एक सैनिक जखमी झाला. गेल्या शनिवारी काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत, सीमेपलीकडून निष्कारण केलेल्या गोळीबारात भारतीय लष्कराचे मेजर प्रफुल्ल अंबादास मोहरकर यांच्यासह चार सैनिकांना हौतात्म्य आले होते. पाकिस्तानच्या या दुष्कृत्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने त्यांच्या हद्दीत घुसून ही जबाबी कारवाई केली. लष्कराच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याच्या सांगण्यानुसार, पूंछ ब्रिगेडच्या 25व्या डिव्हिजनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या पलीकडे 200-300 मीटर आत घुसून पाकव्याप्त काश्मीरच्या रावलकोट भागातील रुख चक्री येथे हा हल्ला केला. तेथे असलेली पाकिस्तानी लष्कराच्या 59 बलूच रेजिमेंटची एक सीमाचौकी उद्ध्वस्त केली. सोमवारी सायंकाळी सुरू झालेल्या या कारवाईसाठी 4-5 तरबेज घटक कमांडो पाठविण्यात आले. कामगिरी फत्ते करून ते सुखरूप परत आले. या हल्ल्यात आपले तीन सैनिक ठार झाल्याचे पाकिस्तानेही मान्य केले. कदाचित याहून अधिक शत्रूसैनिक ठार झाले असावेत, अशी शक्यता गुप्तहेर सूत्रांनी वर्तविली. नूर मोहम्मद 2003 मध्ये दिल्लीतील एका प्रकरणात दोषी ठरला होता आणि श्रीनगरच्या तुरुंगात शिक्षा भोगत होता. 2015 मध्ये तो पॅरोलवर सुटला होता. त्यानंतर, तो दक्षिण काश्मीरच्या त्रालमध्ये राहत होता. या भागात जैश-ए-मोहम्मदचा तो महत्त्वाचा सदस्य बनला. जुलै 2017 मध्ये झालेल्या अरिपाल चकमकीत जैश-ए-मोहम्मदचे तीन अतिरेकी मारले गेले. त्यानंतर, नूर भूमिगत झाला. विविध ठिकाणी झालेल्या हल्ल्यात तो पाहिजे होता. श्रीनगरच्या विमानतळाजवळील बीएसएफच्या शिबिरावरील हल्ल्याचा तो मुख्य सूत्रधार होता. अशा प्रकारे पाकिस्तानच्या छुप्या कारवाया भारताने नेहमीच उधळून लावल्या आहेत. परंतु पाकिस्तानला आता थेट धडा शिवकिण्याची वेळ आली आहे. आज जनतेला हीच अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आहे. नरेंद्र मोदींनी विरोधात असताना याविषयी जी जनतेला आश्‍वासने दिली होती त्याची पूर्तता करण्याची वेळ आता आली आहे. आजवर गेल्या तीन वर्षात भारताने बराच संयम दाखविला आहे. सर्जिकल स्ट्राईक केले ही वस्तुस्थिती असली तरीही त्यत नवीन असे काहीच नाही. मनमोहनसिंग सरकारनेही अशा प्रकारचे स्ट्राईक केलेच होते. आता मात्र थेट उत्तर देण्याची वेळ आली आहे, यातूनच पाकची मुजोरी उतरु शकेल.
---------------------------------------------------------------------

Related Posts

0 Response to "मुजोरी उतरवा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel