-->
दहशतवादाचा उद्रेक

दहशतवादाचा उद्रेक

संपादकीय पान मंगळवार दि. ०५ जुलै २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
दहशतवादाचा उद्रेक
सौदी अरेबियामधील जिद्दाह हे शहर आत्मघातकी हल्ल्याने सोमवारी सकाळी हादरले. अमेरिकेच्या दुतावासाजवळ हा हल्ला मानवी बॉम्बरने केला. त्यात अनेक लोक जखमी झाले आहेत. हल्ला झालेल्या भागात अनेक देशांचे दुतावास आहेत. तसेच शहरातील सर्वात मोठे हॉस्पिटल आहे. हल्लेखोराने रुग्ण असल्याचे सांगून अमेरिकेच्या दुतावासात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. प्रवेशद्वारवर तैनात सुरक्षा रक्षकांनी त्याला चौकशीसाठी थांबवले असता त्याने कारमध्ये स्वत:ला उडवून स्फोट घडवून आणला. सुसाइड बॉम्बर कारने एका मशिदीत जात होता. ही मशिद अमेरिकेच्या दुतावासाजवळ आहे. सुरक्षा रक्षकांनी त्याला रोखताच त्याने काममध्येच स्वत: ला उडवून घेतले. २००४ मध्ये जेद्दाह शहरात अतिरेक्यानी हल्ला केला होता. त्यात ९ जणांचा मृत्यू झाला होता. आता ही दुसरी घटना आहे. त्यापूर्वी दोनच दिवस अगोदर बांगलादेशची राजधानी ढाका येथील आर्टिझन बेकरी या स्पॅनिश हॉटेलवर शुक्रवारी रात्री दहशतवाद्यांनी हल्ला चढवून तरुषी जैन या भारतीय युवतीसह वीस विदेशी नागरिकांना गोळ्या घालून ठार केले. हे हत्याकांड घडविण्यामागे आपणच सूत्रधार असल्याचा दावा इसिस या दहशतवादी संघटनेने केला असला तरी बांगलादेश सरकारला मात्र त्या गोष्टीवर विश्वास नाही. बांगलादेशमध्ये जमात-ए-इस्लामी या कट्टरपंथी संघटनेने हातपाय पसरलेले आहेत. तिच्या हस्तकांमार्फत त्या देशामध्ये दहशतवादी कारवाया केल्या जातात, असा पूर्वानुभव आहे. त्याआधारेच शुक्रवारी झालेल्या हल्ल्‌यामागे जमात-ए-इस्लामी, जमातुल मुजाहिदिनी बांगलादेश या संघटना व पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआयचा हात असल्याचा दावा बांगलादेशचे गृहमंत्री असदुझ्झमान खान यांनी केला. बांगलादेशमध्ये अल कायदा व इसिस या संघटनांचे अस्तित्व बिलकूलच नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. १९७१ साली पाकिस्तानातून फूटून बाहेर पडून स्वतंत्र राष्ट्र म्हणून बांगला देशाची निर्मिती झाली. तेव्हापासून पाकिस्तानशी बांगला देशाशी वैर आहे. दोन मुस्लिम राष्ट्रे असूनही त्यांचे जमत नाही. मात्र बांगला देशात अतिरेक्यांचे हल्ले सुरु झाल्याने त्याचा सर्वात मोठा धोका भारतास निर्माण झाला आहे. बांगला देशात स्वातंत्र्यानंतर आजपर्यंतचा विचार करता कट्टरपंथीयांचीच तिकडे सत्ता आहे. त्यामुळे अनेक मुलतत्ववादी संघटनांसाठी ही बूमी उपलब्ध झाली होती. आता बांगला देशातील झालेला हा अतिरेक्यांचा हल्ला संपूर्ण आशियाई खंडासाठी धोकादायक ठरणारा आहे. इथे इसिस नाही असे जरी सांगण्यात येत असले तरीही अतिरेकी कारवाया सुरु झाल्या आहेत हे सर्वात धोकादायक आहे. आजवर शांत असलेला हा भाग अशांत होण्यास आता हातभार लागला आहे. अतिरेकायंनी आता युरोपातील काही देशात हल्ले केल्याने त्यांचा तेथील प्रवेशही सुकर झाल्याचे स्पष्ट दिसते. फ्रान्स येथे झालेला हल्लानुकताच इस्तांबूल येथील अतिरेक्यांचा हल्ला या युरोपसाठी जशा धोकादायक बाबी आहेत तसेच बांगला देशातील बॉम्बस्फोट हा देखील आपल्यादृष्टीने चींतेची बाब ठरावी. बांगला देश हा गरीब देश आहे. तेथील मुस्स्लिम तरुणांना बेरोजगारीमुळे रोजगार नाही. असे तरुण इसिस असो किंवा कोणतीही अतिरेकी संघटना त्यांच्या जाळ्यात सहजरित्या अडकले जाऊ शकतात. धर्माच्या नावावर तरुणाची माथी भडकाविण्याचे काम अशा देशात सहजरित्या होऊ शकते. यापासून आपण आता धडा घेण्याची आवश्यकता आहे.

0 Response to "दहशतवादाचा उद्रेक"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel