-->
मालवणी माणसाचा सन्मान

मालवणी माणसाचा सन्मान

संपादकीय पान बुधवार दि. २१ ऑक्टोबर २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
मालवणी माणसाचा सन्मान
ज्येष्ठ नाटककार, रंगकर्मी गंगाराम गवाणकर नाट्य संमेलनाचे बिनविरोध अध्यक्ष झाले आणि याचा केवळ मालवणी माणसांनाच नव्हे तर संपूर्ण नाट्यसृष्टीला आपल्या घरातल्या एका माणसाची निवड झाल्याचा भास झाला आहे. कारणही तसेच आहे. गवाणकरांसारखा अजातशत्रू कलावंत सध्या नाट्यसृष्टीत शोधून सापडणार नाही. एक रंगकर्मी म्हणून ते जसे श्रेष्ठ आहेत तसेच ते एक माणूस म्हणून त्याहून ग्रेट आहेत. अगदी शून्यातून येऊन या माणसाने एवढी मोठी उंची गाठली परंतु त्यांचा त्यांना काडीचाही गर्व नाही, अशा या रंगकर्मीचा या निवडीने यथोचित गौरव झाला आहे. गवाणकरांनी मालवणी भाषा जगात पोहोचविली, त्यांनी लिहिलेल्या वस्त्रहरणचे पाच हजाराहून जास्त प्रयोग झाले. हे नाटक बिगर मराठी रसिकही मोठ्या श्रध्देने पाहतात व मालवणी भाषेचा आस्वाद घेतात. ही त्यांच्या लेखणीची जादू आहे. यातील त्यांनी रंगविलेली पात्रे म्हणजे मालवणी माणसाचे चित्रण आहे. मात्र ते त्यांनी अशा खुबीने रंगविले आहे की, ही पात्र प्रेक्षकांना आपल्या घरातील वाटतात. प्रत्येक संवादाचा आस्वाद घेता येतो. त्यांच्या या वस्त्रहरणाविषयी बरेच काही लिहिता येईल. खरे तर हे नाटक सुरुवातीला चालले नव्हते. त्यामुळे पहिले २५ प्रयोग करुन ते बंद करायचे असे ठरले होते. त्यानुसार शेवटच्या पुण्यात झालेल्या प्रयोगाला ज्येष्ठ साहित्यिक पु.ल.देशपांडे यांना आमंत्रित करण्यात आले होते. या प्रयोगाला पु.ल. एवढे हसले आणि त्यांनी असे नाटक होणे नाही अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. बस. झाले या नाटकाचा पुर्नजन्मच झाला आणि त्याचे प्रयोग हे तर पाच हजारांवर पोहोचले. या नाटकाच्या निमित्ताने गवाणकरांना मिळालेले यश हे केवळ लेखक किंवा नाटककार एवढयापुरते मर्यादित नाही तर लोकजीवनाशी पूर्णपणे समरस झालेला नाटककार अशी त्यांची प्रतिमा त्यातून तयार झाली. मालवणी बोली भाषेला यातून मानाचे स्थान त्यांनी मिळवून दिले. मालवणीची पताका सर्व खंडात पोहोचविली. माडबनमध्ये जन्मलेल्या गवाणकरांचे बालपण हे गरीबीतच गेले. पाचवीपर्यंत गावात शिक्षण घेतल्यावर पुढच्या शिक्षणासाठी आईंने त्यांना वडिलांकडे मुंबईला पाठविले. त्यांचे वडिल चहा विकून जेमतेम पोट भरत होते. लहान गंगारामही आपल्या वडिलांच्या कामात हात लावू लागला. त्यावेळी काही काळ या पिता-पुत्रांनी मसणवाटीतल्या एका इमारतीत राहून दिवसही काढले. अशा प्रकारे काम करीत शिक्षण त्यांनी पूर्ण केले. जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधून कलाशिक्षण घेतले. त्यानंतरे मुंबईच्या पोस्ट खात्यात १२६ रुपयांवर गवाणकर नोकरीला लागले. त्यानंतर त्यांचे लग्न झाले. जे. जे. आर्ट स्कूलमध्ये शिकत असताना त्यांचे गावाकडचे नाट्यवेड जागृत झाले. कोकणी माणसाला नाटकाचे वेड हे दशावतारामुळे आहे. त्या दशावतारी नाटकाच्या सवयीमुळेच कोकणचा माणूस नाटकप्रिय झालेला आहे. पोटासाठी नोकरी करीत असताना त्यांनी नाटक लिहिण्याचा आपला छंद काही सोडला नाही. मालवणी लोकांच्या छटा रंगविणारे व तेथील जीवनदर्शन घडविणारे वस्त्रहरण हे त्यांनी नाटक याच काळात लिहिले. त्यावेळी मच्छिंद कांबळी यांना या नाटकाचे लिखाण खूपच आवडले आणि त्यांनी हे नाटक रंगमंचावर आणण्याचे ठरविले. सध्या गवाणकरांच्या लिखाणाला ५० वर्षे पूर्ण होताना त्यांना अध्यक्षपदाचा मान मिळाला हा एक त्यांचा आणखी एक दुग्धशर्करा योग म्हणावा लागेल. गेल्या पाच दशकात त्यांची २० नाटके रंगमंचावर आली. यातील त्यांच्या वस्त्रहरण, वात्रट मेले, वन रुम किचन या तीन नाटकांचे प्रयोग हजारांत झाले. अशा प्रकारे एवढी लोकप्रिय नाटके लिहिणारा नाटककार दुसरा कुणीही नाही. वस्त्रहरणने तर पाच हजार नाटकांचा विक्रम केला आणि हा विक्रम नजिकच्या काळात कुणो मोडेल असे दिसत नाही. मालवणी भाषेतल्या गोडव्यामुळे ही भाषा वस्त्रहरणच्या माध्यमातून लोकप्रिय झाली. या नाटकामुळे केवळ मालवणी भाषाच नव्हे तर मालवणी खाद्य पदार्थ लोकप्रिय झाले. गवाणकर यांच्या हातून अशी अनेक नाटके लिहिली जाणार आहेत आणि ते रसिकांना अशाच प्रकारे खदखदून हसविणार आहेत. गवाणकरांनी या नाटकाच्या माध्यमातून विक्रम केला, मात्र त्यांना कधीच अहंकार शिवला नाही. यातून त्यांचे मोठेपण जगजाहीर होते. अशा या कोकणातल्या, तळकोकणातल्या मालवणी माणसाचा जो सन्मान अध्यक्षपदाच्या निवडीने झाला आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे तेवढे कमीच आहे.
-----------------------------------------------------------------

0 Response to "मालवणी माणसाचा सन्मान"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel