-->
अमित शहा का चिडले?

अमित शहा का चिडले?

संपादकीय पान मंगळवार दि. २० ऑक्टोबर २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
अमित शहा का चिडले?
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी वादग्रस्त विधाने करणार्‍या आपल्या काही नेत्यांना चांगलेच धारेवर धरले. दादरी आणि गोमांस प्रकरणी वादग्रस्त विधाने करीत संघर्ष ओढवून घेणार्‍या भाजपाच्या नेत्यांना त्यांनी आता पुरे झाले, बोलणे आवरा, या भाषेत निर्वाणीचा इशारा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशा विधानांबद्दल तीव्र नाराजी व खेद व्यक्त केल्यानंतर शहा यांनी तडकाफडकी व्हीप जारी करीत या नेत्यांना पाचारण केले होते. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, केंद्रीय मंत्री महेश शर्मा, खासदार साक्षी महाराज आणि आमदार संगीत सोम यांची कानउघाडणी करतानाच शहा यांनी अशा विधानांमुळे मोदी सरकारचा विकासाचा अजेंडा रुळावरून घसरेल, अशी भीती व्यक्त केली. दादरी येथील इकलाखची हत्या हे राज्य सरकारचे कायदा व सुव्यवस्था राखण्यातील अपयश असून, त्याच्याशी भाजपाला काहीही घेणेदेणे नव्हते, असे शहा यांनी या नेत्यांना सुनावताना म्हटले. भाजपच्या नेत्यांनी वादग्रस्त विधाने केल्यामुळे लोकांचे लक्ष समाजवादी पक्षावरून हटून भाजपकडे केंद्रित झाले. पक्षनेत्यांना समज देण्यासाठी मोदींनी काहीही केले नसल्याची टीका सुरू असतानाच मोदींनी आपला संताप कळविला. शहा संतापण्याचे मुख्य कारण म्हणजे दादरीच्या घटनेचे तीव्र पडसाद देशात उमटू लागले आहेत. एकीकडे साहित्यिकांनी आपले पुरस्कार परत करण्यास सुरुवात केली आहे. अर्थात भाजपा नेत्यांनी व सरकारी यंत्रणेने त्यांच्याकडे डोळेझाक करण्यास सुरुवात केली असली तरी सर्वसामान्यांच्या मनात त्याबाबत जे पडसाद उमटत आहेत, त्यात भाजपावर टीकेचा भडीमार सुरु झाला आहे. तर दुसरीकडे बिहारमधील निवडणुकीत भाजपाला दिवसेंदिवस कठीण परिस्थिती आहे. कारण नितीश कुमार व लालूप्रसाद यादव यांचे कडवे आव्हान भाजपाला पेलता येत नाही अशी स्थीती स्पष्ट दिसते आहे. अशा वेळी भाजपाचा पराभव डोळ्यापुढे दिसत असताना अमित शहा यांची चिडचिड सुरु झाली आहे. अमित शहा चिडण्यामागचे हेच कारण आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पांचजन्य या आपल्या मुखपत्रामधून दादरी येथे गोमांस खाल्याच्या अफवेवरून झालेल्या मोहम्मद इकलाख या मुस्लीम तरुणाच्या हत्येचे उघडउघड समर्थन केलेले आहे. गोहत्या करणे हे पाप आहे आणि असे पाप करणार्‍यांची हत्याच केली पाहिजे, असे वेदांमध्ये सांगण्यात आले असल्याचे नमूद करून  संघाने इकलाखची हत्या विनाकारण करण्यात आलेली नाही आणि वेदांतही गोहत्या करणार्‍यांना ठार मारणे अनिवार्य करण्यात आले आहे, असे या मुखपत्रात म्हटले आहे. यावरुन संघा आपला कडवटपणा काही सोडायला तयार नाही हे स्पष्ट झाले आहे. अर्थात आपण कधीपासून वेदाच्या नियमावर आपला देश चालवू लागले आहोत? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेली आपली घटना ही सर्वश्रेष्ठ आहे आणि त्यांनी तयार केलेल्या कायद्याच्या आधारावर लोकांना शिक्षा केल्या जातात. परंतु भाजपाला देशात हिंदुत्ववाद आणण्याची एवढी घाई झाली आहे की, आतापासूनच ते देशाची घटना गुंडाळून ठेवून वेदांतील नियामावर राज्य चालवू लागले आहेत. सध्या देश संघ टालवीत असून भाजपा हे केवळ त्यांच्या हातातील खुळखुळा ठरले आहे. त्यामुळेच तर राखीव जागा रद्द करण्याची सूचना सरसंघचालकांनी केली. अर्थात ही सूचना बिहार निवडणुकीच्या तोंडावर झाल्याने भाजपाची मोठी पंचाईत झाली. त्यानंतर आता दादरी घटनेचे समर्थन केले आहे. बरे ते समर्थन करताना वेदकालीन पुरावे दिले आहेत. अर्थात हा लेख लिहिलेल्या लेखकाचे ते वैयक्तिक मत आहे, हे संघाचे अधिकृत मत नाही अशी मखलाशी वरती करण्यात आली. म्हणजे संघाच्या मुखपत्रात छापून आलेले लेख हे अधिकृत संघाची भूमिका नाही. तर मग यात विरोधकांचेही लेख संघ का नाही स्वीकारीत? सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात एवढे विचार स्वातंत्र कधीपासून मिळू लागले आहे. संघात खरे तर आदेश निघतात आणि मग स्वयंसेवकाने कासलीही त्यावर विचारणा न करता त्यानुसार आचरण करावयाचे असते. परंतु संघ आता आपल्याला विचार न पटणार्‍या लेखकांचेही लेख कधी पासून छापून लेखनस्वातंत्र्याचे समर्थन करु लागला? आम्हाला असे वाटते की, हे संघाच्या विरोधी कृत्य ठरावे. नरेंद्र मोदींना हा देश संघाच्या विचारानुसार व वेदकालीन कायद्यानुसार चालविण्यासाठी जनतेने सत्ता दिलेली नाही. मोदींना केवल विकासाच्या मुद्दयावर रान उठविलेल्याने त्यांच्या हाती सत्ता दिली हे आता मोदी, शहा व संघही विसरत आहे. या सर्व प्रकारात गोंधळलेल्या शहांचा चिडचिडाट होणे काही चुकीचे नाही. एकीकडे संघाचा वरचश्मा सांभाळायचा, त्यांच्या कडव्या नेत्यांनाही झेलायचे आणि लोकांपुढे आपला संघाचा असली चेहराही दाखवायचा नाही व त्यात सर्वात महत्वाचे म्हणजे हे सर्व सांभाऴत निवडणुकही जिंकायची, हे सर्व जमत नसल्याने शहा चिडले आहेत.
----------------------------------------------------------------------------

0 Response to "अमित शहा का चिडले?"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel