-->
संपादकीय पान--अग्रलेख--२९ ऑक्टोबर २०१३च्या अंकासाठी--
-------------------------
धर्माचे आणि गरीबीचे राजकारण
-----------------------
सध्या धर्माच्या नावाने कुणाचीही माथी भडकाविणे तसेच गरीबीचा जप करुन राजकारण करणेही सोपे झाले आहे. भाजपाचे पंतप्रधानपदाचे भावी उमेदवार नरेंद्र मोदी व कॉँग्रेसचे तरुण नेते राहूल गांधी यांच्या सध्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सुरु असलेल्या जाहीर सभा पाहता असे आपल्याला म्हणता येईल. भारतीय जनता पक्षाने बाबरी मशीद पाडून देशातील सर्वधर्मसमभाव धोरणालाच तडा जाऊ दिला आणि धर्माच्या नावाखाली माथी भडकावून मते मिळविण्याचा प्रयोग यशस्वी केला. देशात जातीय दंगे घडवून आपल्याला सत्ता काबीज करता येऊ शकते हे सूत्र त्यांना गवसल्यामुळे त्यांनी आपल्याला हिंदूंची मते मिळणार असे गृहीत धरुन राजकारण करण्यास सुरुवात केली. मात्र हेे करीत असताना आपल्याला मुस्लिमांचीही मते गमवायची नाहीत व आपला चेहरा कसा सर्वधर्मसमभाव मानणारा आहे असे चित्र उभे करण्याचा प्रयत्न सुरु केला. यातून नरेंद्र मोदींच्या ठिकठिकाणी सुरु असलेल्या सभांमध्ये मुस्लिम ओळखता यावेत म्हणून त्यांना टोपी घालून येण्याचा आग्रह धरण्यात आला. तसेच बुरखाधारी स्त्रीयांचीही संख्या मोठ्या संख्येने कशी जास्त दिसेल अशी व्यूह्यात्मक रचना आखली गली. यातून टी.व्ही.वर सभा पाहाणार्‍यांच्या मनावर भाजपाचा सर्वधर्मसमभाव कसा बिंबेल असे चित्र रेखाटण्यात आले. मोदींच्या रविवारी झालेल्या पाटण्यातील सभेत बॉम्बस्फोट झाल्याने भाजपाला जे अपेक्षित राजकारण करायचे आहे ते साध्य झाल्याचे समाधान लाभलेही असेल. परंतु या स्फोटांमुळे समाजातील दरी रुंदावत जाणार आहे आणि हे राजकारण किती धोकादायक आहे हे भविष्यात समजेलच. बिहारमध्ये सात वर्षे भाजपा व जनता दल (युनायटेड) यांची असलेली सोयरिक मोदी पंतप्रधापदाचे उमेदवार म्हणून घोषीत झाल्यावर संपुष्टात आली. त्यानंतर मोदींच्या पाटण्यात झालेल्या पहिल्या सभेला विशेष महत्व होते. परंतु त्या सभेच्या परिसरात व रेल्वे स्टेशनच्या आवारात एकूण सात बॉम्ब स्फोट होऊन मोदींच्या सभेच्या अगोदरच तेथील वातावरणात तणाव निर्माण करण्यात आला. खरे तर मोदी जे धर्मांचे कार्ड खेळत आहेत त्यातून समाजात दुफळी होणार आहे. एकीकडे हिंदू हीच आपली व्होट बँक आहे हे स्पष्ट असल्याने त्यांचा चुचकारत असताना केवळ त्यांच्या जीवावर आपण दिल्लीचे तख्त जिंकू शकत नाही हे वास्तव असल्याने मुस्लिमांनाही आपलेसे केल्याशिवाय पर्याय नाही हे भाजपाला व मोदींना जाणवू लागले आहे. त्यासाठी मुस्लिमांतील गरीबांचा उध्दार करण्याची भाषा त्यांनी सुरु केली आहे. आजवर कॉँग्रेसने गरीबी हटावचे जे राजकारण केले तेच मोदी करु पहात आहेत. मोदींच्या तोंडात एकीकडे राम आहे तर दुसरीकडे छुरी देखील आहे. गुजरातमधील दंगलीत जनतेने ही छुरी जनतेने प्रत्यक्षात पाहिली आहे. अशा वेळी या पक्षावर विश्‍वास ठेवून चालणार नाही हे वास्तव जनतेला पटले आहे. एकीकडे भाजपाचे अशा प्रकारचे राजकारण सुरु असताना कॉँग्रेसने आपले गरीबी हटावचा गेले साठ वर्षांपासूनचा नारा काही सोडलेला नाही. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सर्वात प्रथम गरीबी हटावचा नारा देऊन लोकांची मते खेचली. परंतु त्यानंतर लोकांची गरीबी काही कमी झालेली नाही. उलट गरीब व श्रीमंतांतील उत्पन्नाची दरी नवीन आर्थिक धोरण राबविल्यास सुरुवात केल्यापासून दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. प्रत्येक निवडणुकांच्या वेळी कॉँग्रेस पक्ष मतदारांना काहीना काही तरी नवे अपेक्षांचे गाजर दाखवित असतो. यावेळी अन्न सुरक्षेचे गाजर दाखविण्यात आले आहे. स्वातंत्र्यानंतर गरीबांचा आधार असलेली रेशनवरील स्वस्त धान्य यंत्रणा गेल्या दहा वर्षात याच सरकारने पूर्णपणे मोडीत काढली आहे. तर आता अन्न सुरक्षेचे धडे नव्याने गिरविले जात आहेत. कॉँग्रेसने अशा प्रकारे गरीबांचे राजकारण करुन त्याच्या जीवावर मते मिळविली परंतु त्यांच्यासाठी काहीच केले नाही. केवळ त्यांना आश्‍वासने देऊऩ आपण मात्र सत्ता उपभोगली. यावेळी मोदीची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून भाजपाने निवड केल्याने मुस्लिम मते कॉँग्रेसला मिळतील असा अंदाज होता. परंतु राहूल गांधीनी मुझफरनगर मधील दंगलग्रस्तांच्या संपर्कात आय.एस.आय. आहे असे विधान करुन मुस्लिम समाजाची नाराजी ओढावून घेतली आहे. त्यामुळे कॉँग्रेसची ही मोठी व्होट बँक नाराज झाल्यास त्याचे पडसाद आगामी निवडणुकीत त्यांना भोगावे लागतील. मुस्लिम मतदार असो किंवा कोणत्याही धर्मातील गरीब असो देशातील या मोठ्या संख्येने असलेल्या लोकांना कॉँग्रेस व भाजपा आपल्या गरीबीचे राजकारण करीत आहेत याची स्पष्ट जाणीव झाली आहे. भाजपाने आपल्या धर्मांदाचा बुरखा कितीही लपविण्याचा प्रयत्न केला तरी तो दडविला जाऊ शकत नाही. तर कॉँग्रेसने आपल्याला गरीबांचा किती कळवळा आहे हे दाखविण्याचा प्रयत्न केला तरीही हे किती पोकळ आहे हे तर त्यांच्या प्रत्यक्ष कृतीतून सर्वांना उमगले आहे. अशा प्रकारे धर्मांचे आणि गरीबीचे राजकारण करणार्‍यांना यावेळी जनता धडा शिकविल्याशिवाय राहाणार नाही. स्वातंत्र्यानंतर देशातील जेमतेम बारा वर्षे वगळता कॉँग्रेसचीच सत्ता आहे. त्यामुळे या काळात कॉँग्रेसने किती विकास केला हे सर्वांना दिसतेच आहे. त्याचबरोबर सात वर्षे जी भाजपाची सत्तेची होती त्यातील त्यांची कामगिरीही जनतेला पुरती ठावूक आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्ष जनतेच्या भल्याचे काही करणार नाहीत. फक्त गरीबीचे आणि धर्मांचे राजकारण करणार, हे नक्की.!
--------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel