-->
फ्रान्सच्या निकालाचा अर्थ

फ्रान्सच्या निकालाचा अर्थ

मंगळवार दि. 09 मे 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
फ्रान्सच्या निकालाचा अर्थ
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत कट्टर उजव्या विचारसरणीच्या उमेदवार मरीन ली पेन यांना नकारत फ्रान्सच्या जनतेने इमॅन्युएल मॅक्रोन यांना आपले नवे राष्ट्राध्यक्ष निवडले आहे. 39 वर्षीय मॅक्रोन फ्रान्सच्या इतिहासातील सर्वात युवा राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. इमेन्युएल यांच्या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. मतपत्रिकांच्या माध्यमातून झालेल्या या मतदानात मॅक्रोन यांना तब्बल 65.5 टक्के मते मिळाली आहेत. विद्यमान राष्ट्राध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिल्यानंतर त्यांच्या पक्षाचे उमेदवार पहिल्या फेरीतच बाद झाले. युरोपातील जर्मनीनंतरची दुसरी मोठी अर्थव्यवस्था असलेल्या फ्रान्समध्ये मॅक्रोन विजयी व्हावेत, अशी युरोपातील बहुतांश लोकांची इच्छा होती. आपल्या देशातील पॉडेचेरी ही ऐकेकाळी फ्रान्सची वसाहत होती. तेथे 4600 मतदार आहेत. कराईकल, चेन्नईमध्येही मतदानकेंद्र उभारण्यात आले होते. तेथील बहुतांशी लोकांनी मॅक्रोन यांनाच पाठिंबा व्यक्त केला होता. राष्ट्राध्यक्ष पदासाठी सर्वात महत्वाकांक्षी राहिलेल्या व आपण विजयी होणार असा आव आणलेल्या उजव्या विचारसरणीच्या मरीन ली पेन यांचा मॅक्रोन यांनी मोठ्या फरकाने पराभव केला. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत तेथील जनतेने उजव्या विचारसरणीला दिलेला कौल आपल्याला सुद्धा मिळेल अशी महत्वाकांक्षा ली पेन यांनी बाळगली होती. त्यांनी निवडणुकीच्या प्रचारात चक्क देशभरातील मशीदी बंद पाडण्याचे आश्‍वासन दिले होते. केवळ मुस्लिमच नव्हे, तर ज्यू समुदायाकडून सुद्धा ली पेन यांना विरोध होता. एवढेच नाही, त्यांच्या वडिलांनी सुद्धा आपली मुलगी राष्ट्राध्यक्षपदाच्या लायकीची नाही असे वक्तव्य केले. फ्रान्सच्या जनतेने दिलेल्या या कौलाला विशेष महत्व आहे. कारण सध्या युरोप एका महत्वाच्या वळणावर येऊन ठेपला आहे. फ्रान्समध्ये बेकारी वाढत चालली आहे, निर्वासीतांच्या मुद्यावर राष्ट्रीय पातळीवर मतभेद व्यक्त होऊ लागले आहेत. तसेच एकूणच मुस्लिमविरोधी वातावरण अतिरेक्यांच्या हल्यामुळे निर्माण झाले आहे. अशा वेळी फ्रान्समधील जनता कोणत्या बाजूने निकाल देणार याकडे सर्व जगाचे लक्ष लागले होते. ब्रिटनने युरोपियन समुदायातून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केल्यामुळे ब्रिटन आता खुल्या वातावरणात न राहाता आपल्याला युरोपापासून वेगळे पाडण्याचा बाजूने आहे. त्याचबरोबर हंगेरी, नेदरलँड, स्वीडन,ग्रीस, डेन्मार्क या देशात उजव्या विचारसारणीची सरकार स्थापन झाली आहेत. आजवर तेथे मध्यममार्गी असलेली व डाव्या बाजूला काही प्रमाणात झुकलेली सरकारे होती. मात्र आता या पाच देशातील चित्र पालटल्याने फ्रान्समध्येही उजव्या विचारांचे सरकार स्थापन होईल असा अनेकांचा होरा होता. मात्र फ्रान्सच्या जनतेने हे धुडकावून लावले आहे. त्यापाठोपाठ पुढील वर्षी जर्मनीतील सत्ताधार्‍यांची कसोटी लागणार आहे. मात्र आता फ्रान्समध्ये उजवे सत्तेत न आल्यामुळे आजवर युरोपात सुरु झालेली उजव्याची सरसी आता रोखली गेली आहे. फ्रान्सच्या पुढे आता अतिरेक्यांचे आव्हान, निर्वासितांचा प्रश्‍न, देशातील बेकारी हे प्रश्‍न आहेत. त्याचा मुकाबला हे तरुण राष्ट्राध्याक्ष कसे करतात हे पहाणे महत्वाचे ठरेल.

0 Response to "फ्रान्सच्या निकालाचा अर्थ"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel