
तेजीचा वारु
25 जानेवारी 2021 साठी अग्रलेख
तेजीचा वारु
देशातील शेअर बाजारात सध्या तुफान तेजी आली आहे.
मुंबई शेअर बाजार निर्देशांक आता 50 हजारांवर गेला आहे. देशाची अर्थव्यवस्था
रसातळाला गेली असताना तसेच कोरोनाच्या वाढीचा वेग मंदावला असला तरीही धोका
पूर्णपणे संपला नसतानाही शेअर बाजारात तेजी कशी काय आली असा प्रश्न
सर्वसामान्यांना पडल्याशिवाय राहाणार नाही. परंतु कोरोनानंतर देशातील शेअर बाजारात
विदेशी वित्तसंस्था, स्थानिक वित्तसंस्था, दलाल तसेच सर्वसामान्य गुंतवणूकदारही
मोठ्या प्रमाणात समभागांची खरेदी करीत होते. त्याचा परिणाम म्हणून शेअर बाजारात
तुफानी तेजी आली आहे. दहा महिन्यांपूर्वी हाच शेअर बाजार कोरोनाचे संकट सुरु
झाल्यावर व लॉकडाऊनमुळे पूर्णपणे मंदीत गेला होता. त्यावेळी बाजाराच्या
निर्देशांकाची घसरण ही 40 टक्क्याहून जास्त झाली होती. मात्र आता कोरोना पूर्णपणे
संपलेला नसतानाही बाजाराने अनपेक्षीतरित्या तेजीचा विक्रम केला आहे. अर्थात आपली
अर्थव्यवस्था सुधारत असल्यामुळे नाही तर हा केवळ सट्टेबाजीचा गेम आहे. या तेजीमुळे
मोदी सरकारने आपली अर्थव्यवस्था सुधारली असल्याचे सर्टिफिकेट आपल्याला घेऊन जर
आपलीच पाठ थोपटून घेतली तर ते मूर्खाच्या नंदवनात आहेत असेच म्हणावे लागेल. शेअर
बाजारातील ही तेजी अजून किमान दोन वर्षे चालेल असा अंदाज शेअर दलाल मोठ्या
हिंमतीने व्यक्त करीत आहेत. त्यांचे जर खरे ठरले तर येत्या दोन वर्षात
निर्देशांकात अजून 25 हजार अंशांची भर पडल्यास आश्चर्य वाटावयास नको. सध्याच्या
तेजीला पोषक असे काही महत्वाचे घटक सध्या आपल्याला दिसत आहेत. यातील प्रामुख्याने
पहिला घटक म्हणजे ऑक्टोबर महिन्यापासून आपल्या देशात विदेशी फंडानी व
वित्तसंस्थांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. या काळात विदेशी
वित्तसंस्थांनी 2.4 लाख कोटी रुपयाची शेअर बाजारात गुंतवणूक केली त्याशिवाय विदेशी
फंडांनी केलेली गुंतवणूक वेगळी. त्याचबरोबर दुसरा महत्वाचा घटक म्हणजे, आपल्याकडील
लहान व मोठ्या गुंतवणूकदारांनी कोरोना काळातही आपल्या म्युच्युअल फंडातील दरमहा
करावयाच्या गुंतवणूक थांबविल्या नाहीत. त्यामुळे म्युच्युअल फंडांची गुंतवणऊक
सातत्याने वाढत गेली. त्यामुळे समभागांचे खरेदीदार जास्त झाले. एवढेच नव्हे तर
देशातील डीमॅट खाती लॉकडाऊनच्या काळात म्हणजे वर्षभरात विक्रमी पातळीवर वाढली
आहेत. याच काळात नव्याने दोन लाख कोटीहून जास्त डीमॅट खाती उघडली गेली. त्यामुळे
सर्वसामान्य गुंतवणूकदारही मोठी प्रमाणात गुंवणूक करु लागला असे दिसते. अर्थात
त्यांची गुंतवणूकीतील तेजीतील वाटा अल्प असला तरीही सध्याच्या तेजीला त्यांचाही
हातभार लागला आहे. देशात आघाडीच्या 30 समभागांच्या सरासरीवर काढल्या जाणाऱ्या या
सेन्सेक्सची ही उसळी लक्षणीयच ठरली आहे. 1 एप्रिल 1979 रोजी मुंबई शेअर बाजाराने
सेन्सेक्स या निर्देशांकाला जन्म दिला. तेव्हापासून गेल्या 41 वर्षातील या
सेन्सेक्सची उसळी आज 50 हजारांवर पोहोचली आहे. या कालावधीतील सेन्सेक्सच्या
वाटचालीचा आढावा घेतल्यास आजवर या सेन्सेक्सने
पहिल्या दहा हजाराचा टप्पा पार करण्यास फार वेळ घेतला, मात्र शेवटच्या दहा हजाराचा
टप्पा गाठण्यास सर्वात कमी कालावधी घेतला. 79 साली सुरु झालेल्या हा सेन्सेक्सला प्रथम
हजारात येण्यासाठी 90 साल पहावे लागले. त्यावेळी हर्षद मेहताच्या तेजीने त्याला
सर्वात प्रथम तीन आकड्यावर पोहोचविले होते. त्यानंतर फेब्रुवारी 2006 साली म्हणजे तब्बल
16 वर्षांनी सेन्सेक्स दहा हजारांवर गेला. त्यानंतर लगेचच दुसऱ्या वर्षी म्हणजे
ऑक्टोबर 2007 साली सेन्सेक्स 20 हजारांवर पोहोचला. तर 30 हजारांचा टप्पा गाठायला
त्याला 2015 साल पहावे लागले. मार्च 2019 साली म्हणजे कोरोना सुरु होण्याअगोदर
बरोबर एक वर्ष अगोदर सेन्सेक्स 40 हजारांवर गेला होता. मात्र त्यानंतर पुढील दहा
हजारांचा टप्पा गाठावयास जेमतेम दोन वर्षेच लागली. मात्र या काळात निर्देशांक 40
टक्क्यांनी घसरुन पुन्हा वर आला तो 50 हजारांना स्पर्श करुनच त्याने विश्रांती
घेतली. कोरोनाच्या काळात अशी स्थिती होती की शेअर बाजारातील गुंतवणूक अनेकांना
नकोशी वाटत होती. काही अपरिपक्व गुंतवणूकदारांनी त्या काळात घाबरुन शेअर्स विकले.
परंतु जो परिपक्व गुंतवणूकदार होता त्याने काही निवडक समभाग मोठ्या प्रमाणात खरेदी
केले. कारण त्याचा बाजारावर विश्वास होता की, आपल्याला यातून पुढील काळात पैसा
मिळणार आहे. त्याचा हा अंदाज खराच ठरला. सध्याच्या तेजीत त्याने पैसे कमावले आहेत.
जागतिक गुंतवणूक गुरु वॉरेन बफेट यांनी देखील दुसऱ्या जागतिक युध्दाच्या काळात
अशाच प्रकारे नाममात्र किंमतीत अनेक कंपन्यांचे समभाग खरेदी केले होते. त्यातूनच
त्यांनी भविष्यात गडगंज पैसा केला. त्यामुळे शेअर बाजारात समभाग खरेदी व विक्री
याची योग्य वेळ साधली तरच तुही यशस्वी ठरु शकता हे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. शेअर
बाजारातील तेजी ही भविष्यातील देशाच्या अर्थकारणाची दिशा ठरवून निश्चित केली जाते.
आज आपल्याकडे सेन्सेक्स त्याच भरवशावर झपाट्याने वाढला आहे. परंतु येथून पुढची
वाटचाल ही वाटते तेवढी सोपी असणार नाही. शेअर बाजारात सट्टा होत असला तरीही देशाची
अर्थकारणच जर बिघडले तर या सट्याला जोर येत नाही. आपल्याकडे सध्याच्या तेजीला
भविष्यात अर्थव्यवस्था सुधारेल ही आशेची किनार आहे. परंतु डॉलर मजबूत होणे, विकास
दर घटणे, कोरोनाचा संसर्ग लसीनंतर वाढल्यास सध्याच्या तेजीला जरुर अटकाव होऊ शकतो.
0 Response to "तेजीचा वारु"
टिप्पणी पोस्ट करा