-->
अशी ही बनवाबनवी!

अशी ही बनवाबनवी!

बुधवार दि. 20 फेब्रुवारी 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
अशी ही बनवाबनवी!
युतीच्या रंगमंचावरील अशी ही बनवाबनवी या नाट्यावर काल अखेर पडदा पडला. शिवसेनेने आजवर सर्व केलेले आरोप विसरुन जात व भाजपानेही ते आरोप हसतहसत गिळत पुन्हा एकदा युतीचे बिगुल वाजविलेे. अर्थात ही बनवाबनवी जनतेची आहे, हे समजायला जनता दुधखुळी नाही. कारण कालपर्यंत एक बोलायचे आणि लगेच सत्तेचा गोळा दिसताच पलटी मारायची अशी भूमिका शिवसेनेची आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी मात्र अशी डफली वाजविण्याची भूमिका कधीच बजावली  नव्हती. त्यांचा स्पष्टवक्तेपणा जसा बोलण्यात होता तसाच तो वागण्यातही होता. मात्र बाळासाहेबांच्या नंतर लगेचच दुसरी पिढी बोललेला शब्द विसरुन दोन्ही बाजुने डफली वाजवायला शिकली आहे, हे मोठे दुर्दैव आहे. गेले तीन वर्षे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे युती तोडण्याची भाषा करीत होते. पंढरपुरात तर विठ्ठलाच्या साक्षीने त्यांनी युती गेली खड्यात अशी टोकाची भाषा केली होती. भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी तर त्यांना यायचे असेल तर या नाही तर टपकेेंगे अशी गुंडाची भाषा करुन शिवसेनेला धमकाविले होते. शिवसेनेला असा हग्या दम भरण्याचे धारिष्ट्य भाजपाच्या या गुजराती भाषीक अध्यक्षाने दाखविले होते. याचे कारण म्हणजे गुजराती माणसाला व्यवहार जास्त समजतो. त्यामुळे व्यवहाराची भाषा पाहता शिवसेना आपल्याशी युती करणारच, फार फार तर काय एखाद दोन जागांचे तुकडे जास्त फेकू हा अमित शहांचा अंदाज खरा ठरला आणि शेवटी त्यांनी शिवसेनेला युती करायला लावलीच. शिवसेना अध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी आजवर आपण केलेली सर्व कडवट टीका खड्यात ढकलली आणि युतीचे पांघरुण सफाईतरित्या आपल्या आंगावर ओढून घेतले आहे. मात्र या युतीला देशहिताचा मुलामा लावण्यास भाजपा व शिवसेना हे दोघेही विसरले नाहीत. आजवर शिवसेनेने जी टिका केली होती ती देखील देशाच्या हितासाठीच केली होती व आता युती ही देखील देशाच्या हितासाठीच केली आहे. वाह रे... शिवसेना अध्यक्ष... तुमच्याकडून तरी अशी अपेक्षा नव्हती. तुम्ही जे आजवर बोललात व तुमचे प्रवक्ते असलेले खासदार संजय राऊत हे जी टोकाची भाषा बोलत होते आणि आताची बदलेली भूमिका पाहता बिचारा सर्वसामान्य शिवसैनिक पूर्णपणे गोंधळलेला आहे. यावेळी युती होणार नाही अशी त्याची गोड समजूत होती. त्यादृष्टीने त्यांनी आपल्या नेत्याचे शब्ध प्रमाण मानून कामाला सुरुवात केली होती. परंतु आता हा शिवसैनिक यापुढे तुमच्यावर विश्‍वास ठेवणार नाही. उध्दवजी जे बोलतील त्याच्या नेमके उलट धरायचे. शेतकर्‍यांच्या मागण्या, नाणार प्रकल्प यासंबंधी आपल्या मागण्या मान्य केल्याचा बवान करण्यात आला आहे. यातील कोणतेच ठोस आश्‍वसन दिलेले नाही. नाणार प्रकल्पाच्या संदर्भात शिवसेनेच्याच उद्योगमंत्र्यांनी काढलेली अधिसूचना रद्द करण्यात आलेली नाही. जिकडे हा प्रकल्प पाहिजे असेल तिकडे हा नेण्यात येईल अशी मोघम भाषा करण्यात आली आहे. यापूर्वी एन्रॉन प्रकल्पही असाच अरबी समुद्रात बुडवून बाहेर काढणारे हेच शिवसेना-भाजपाच होते, याची आठवण यावेळी झाल्याशिवाय राहात नाही. एकदा का निवडणुका झाल्या आणि राज्याच्या दुर्दैवाने हेच जर सत्तेत आले तर हाच प्रकल्प उभारण्याची भाषा करतील आणि सत्ता गेली तर विरोध करायलाही मोकळे आहेतच. अयोध्येच्या राम मंदिराबाबतही अशीच गुळमुळीत भाषा वापरण्यात आली आहे. शिवसेना व भाजपा यांना राम मंदिर उभारावयाचे आहे, ही त्यांची उघड भूमिका आहे. आता काल नव्याने काय ठरले आहे? काहीच नाही. फक्त राममंदिर उभारण्याचे पुन्हा एकदा आश्‍वासन परस्परांनी दिले. यात नवीन ते काय केले? गेल्या तीन वर्षापासून शिवसेनेच्या मंत्र्यांचे राजीनामे तयार असल्याच्या घोषणा झाल्या. पण हे राजीनामे राज्यपालांना कधीच सादर झाले नाहीत. आता तर त्या राजीनामा पत्रावरील शाईही उडून गेली असावी. अशा प्रकारे शिवसेनेने लोकांची व सच्च्या शिवसैनिकांचीही बनवाबनवी केली आहे. आपण जनतेला फसवित आहोत याचे त्यांना भान नाही. गेल्यावेळी मोदी लाटेत आलेली सत्ता यावेळी ही टिकून राहिल असा विश्‍वास त्यांना वाटतो आहे. परंतु गेल्या पाच वर्षात त्यांनी जनतेची कोणतीही भरीव कामे केलेली नाहीत. त्यामुळे कामाच्या जोरावर त्यांना यावेळी मते मिळणार नाहीत. गेल्या पाच वर्षात जनतेची निव्वळ फसवणूक केली आहे. शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्या प्रश्‍नांची सोडवणूक झालेली नाही. नोटाबंदीमुळे तर सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. हे सर्व जनता विसरलेली नाही. ही जनता यांना पुन्हा कसे मतदान करील? शिवसेनेचे मुखपत्र असेलल्या सामना या दैनिकात मोदी सरकारचे वाभाडे काढणारे अनेक लेख प्रसिध्द झाले आहेत. ते लेख वाचून अनेक शिवसैनिकांनी भाजपाशी पंगा घ्यायला सुरुवात केली होती. आता त्या बिचार्‍या शिवसैनिकांना आपली तलवार म्यान करावी लागणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे भाजपाच्या विरोधात नेहमी गरळ ओकणारे खासदार संजय राऊत कोणती भूमिका घेणार हे सर्व पहाणे गंमतीचे आहे. अशा प्रकारे युती करुन जनतेची व शिवसैनिकांची तुम्ही बनवाबनवी केली खरी परंतु त्याचे पडसाद मतपेटीतून उमटल्याशिवाय राहाणार नाहीत हे नक्की आहे.
--------------------------------------------------------------

0 Response to "अशी ही बनवाबनवी!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel