-->
विश्‍वासार्हतेला तडा

विश्‍वासार्हतेला तडा

रविवार दि. 06 नोव्हेंबर 2016 च्या मोहोरसाठी लेख --
-------------------------------------------
विश्‍वासार्हतेला तडा
--------------------------------------
एन्ट्रो- सायरस मिस्त्री यांना केवळ चारच वर्षाचा कालावधी देण्यात आला. खरे तर चार वर्षाचा कालावधी एखाद्याचे नेतृत्व हेरण्यासाठी कमीच आहे. त्यामुळे मिस्त्री यांना फारसे काही बदल करणे शक्य झाले नाही. त्यांनी तोट्यातील प्रकल्पांची फेरउजळणी करुन त्यांच्याविषयी निर्णय घेण्यास सुरुवात केली होती. अर्थात त्यांना जागतिक पातळीवरील मंदीचाही फटका बसला. अशा प्रकारे अनेक बाबी मिस्त्री यांच्या बाजूने नव्हत्या. असे असले तरीही त्यांनी समूहातील ज्या कंपन्या तोट्यात आहेत त्यांचा कारभार गुंडाळण्यास सुरुवात केली होती. परंतु टाटा समूहातील धुरीणींना ते पसंत नव्हते. याचा परिणाम असा झाला की, यातून अनेक जण दुखावले गेले व त्यांच्या इगोला धक्का बसला. यातूनच मिस्त्री यांना जावे लागले. अर्थात काळाच्या ओघात यातून वास्तव बाहेर येईलच. मात्र या समूहाच्या विश्‍वासार्हतेला लागलेला तडा मात्र कधीच फुसला जाणार नाही ही दुदैवाची बाब आहे.
-----------------------------------------------------
मीठापासून ते मोटारीपर्यंत जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात उत्पादन असणार्‍या टाटा समूहातील सध्याच्या घडामोडी पाहता या समूहाच्या आजवरच्या शंभरहून जास्त वर्षाच्या विश्‍वासार्हतेच्या परंपरेला तडा गेला आहे, हे मात्र नक्की. जगात सुमारे 110 अब्ज डॉलरची उलाढाल असलेल्या टाटा उद्योग समूहातील अध्यक्ष सायरस मिस्त्री यांची त्यांच्या पदावरुन अचानक हकालपट्टी झाल्याने टाटा समूहातील कॉर्पोरेट वॉर आता उफाळून आले आहे. सायरस यांची या पदावर निवड होऊन जेमतेम चार वर्षे पूर्ण होत होती आणि त्यांच्यावर ही गदा आली आहे. अनपेक्षित अशीच ही घटना म्हटली पाहिजे. टाटा समूहातील टाटा आडनाव नसलेले ते अलिकडच्या काळातील पहिलेच अध्यक्ष असल्याने त्यांच्याबाबतीत बरीच चर्चा सुरु होती. मात्र व्यावसायिकदृष्ट्या हा उद्योगसमूह चालविला जात असल्याने तसेच मिस्त्री यांच्या वडिलांच्या शापूरजी पालोनजी समूहाचे टाटा सन्समध्ये 18 टक्क्यांच्या वर समभाग असल्याने सायरस आता चांगलेच स्थिरावले असे चित्र दिसत असतानाच ही घटना घडली आहे. टाटा सन्सची मुहूर्तमेढ जमशेदजी टाटा यांनी 1868 साली रोवली. समूहात सध्या 100हून अधिक कंपन्या आहेत. पैकी 30हून उपकंपन्या या विविध भांडवली बाजारात नोंद आहेत. समूहात 6.60 लाखांहून अधिक मनुष्यबळ आहे. टाटा आडनाव नसलेले सायरस मिस्त्री दुसरे, तर 150 वर्षांंतील सहावे अध्यक्ष होते. वयाच्या पन्नाशीच्या आत टाटा समूहाचे अध्यक्षपद आल्याने खर्‍या अर्थाने या समूहास तरुण अध्यक्ष त्यांच्या रुपाने लाभला होता. परंतु अध्यक्षपदाची पाच वर्षे पूर्ण होण्यापूर्वी मिस्त्री यांना थेट समूहातूनच बाहेर जावे लागले. टाटा नाव नसलेले मिस्त्री हे या समूहाचे दुसरे अध्यक्ष होते. यापूर्वी नौरोजी साकलतवाला हे अध्यक्ष होते. मिस्त्री यांच्याप्रमाणेच साकलतवाला यांनाही अध्यक्ष म्हणून कमी कालावधी मिळाला. 1938 मध्ये निधन झालेले साकतवाला हे टाटा समूहाचे सहा वर्षे अध्यक्ष होते. मीठाच्या उत्पादनापासून माहिती तंत्रज्ञान असे वैविध्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या टाटा समूहातील विशेषत: टाटा स्टील, टाटा मोटर्स, टीसीएस कंपन्यांना जागतिक स्तरावर अधिक फटका बसत असल्याचे दिसत होते. ब्रेक्झिटमुळे टीसीएस तर चीनमुळे टाटा मोटर्स (जग्वार लँड रोव्हर) ला मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. कोरस ही कंपनी खरेदी करत जगातील पाचवी पोलाद उद्योगातील मोठी कंपनी बनणार्‍या टाटा स्टीलच्या युरोपातील व्यवसाय विक्रीलाही सध्या कोणी खरेदीदार नाही. टाटाांनी आपला ब्रिटनमधील पोलाद प्रकल्प विकण्याची केलेली घोषणा ही टाटा सन्सच्या संचालकांना मान्य नव्हती अशी चर्चा होती. जपानी दूरसंचार कंपनी डोकोमाने टाटा सन्सकडून 1.20 अब्ज डॉलरचा दंड वसूल करण्यासाठी आंतरराष्ट्रीय नियामकांची दरवाजे ठोठावली आहेत. टाटा सन्समधून रतन टाटा हे 29 डिसेंबर 2012 मध्ये वयाच्या 75 व्या वर्षी निवृत्त होताना त्यांच्या जवळच्या नात्यातील कुटुंबातील असलेल्या 48 वर्षीय सायरस मिस्त्री यांची उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. वर्षभराने पाच सदस्यांच्या निवड प्रक्रियेद्वारे मिस्त्री यांच्या नावावर अध्यक्ष म्हणून शिक्कामोर्तब करण्यात आले. स्थावर मालमत्ता, अभियांत्रिकी आदी क्षेत्रातील शापूरजी पालनजी समूहाशी संबंधित मिस्त्री हे 2006 पासून टाटा सन्सच्या संचालक मंडळात होते. टाटा सन्सच्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्यांच्या विरोधात सहा विरुध्द चार असे मतदान झाले. यातील दोन जण अनुपस्थित होते तर चार जणांनी त्यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. रतन टाटा अध्यक्ष असताना टाटा समूहाचा त्यांनी झपाट्याने विस्तार केला. यासाठी त्यांनी काही तोट्यातील कंपन्या विकल्या तर काही नव्या कंपन्या ताब्यात घेऊन विस्तार केला. रतन टाटांनी आपल्या कारकिर्दीत टेटली (2000), कोरस (2007), जग्वार लँड रोव्हर (2008) आदी जागतिक कंपन्या आपल्या ताब्यात घेतल्या होत्या. 1991 मध्ये उलाढाल अवघी 10,000 कोटी रुपयांची असलेला टाटा समूह यामुळे रतन टाटा निवृत्त होताना  2011-2012 पर्यंत तब्बल 100 अब्ज डॉलरचा बनला होता. मिस्त्री यांच्या कारकिर्दीत मात्र समूहाला आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक आर्थिक फटका सहन करावा लागला. अर्थात त्यासाठी त्यांना जागतिक पातळीवरील परिस्थितीही अनुकूल लाभली नाही. गेले काही वर्षे विकसीत देशात असलेल्या मंदीमुळे टाटांच्या कंपन्यांना बराच फटका सहन करावा लागला होता. टाटा केमिकल्स, टाटा मोटर्ससारख्या निवडक कंपन्यांनी उत्पादनाच्या धर्तीवर काहीसा विस्तार केला. इंडिकासारखे यश न मिळवू शकलेल्या टाटा मोटर्सने मिस्त्री यांच्या कालावधी दरम्यान वर्षांला दोन वाहने सादर करण्याचे आश्‍वासन दिले होते. टाटा समूहाचे जवळपास दोन दशके  21 वर्षे अध्यक्षपद भूषविल्यानंतर रतन टाटा यांनी त्यांचा रस माहिती तंत्रज्ञान, ई-कॉमर्स कंपन्यांमध्ये दाखविला. रतन टाटा यांच्या काळात समूह भरभराटीस आला हे वास्तव कुणी नाकारु शकणार नाही. मात्र सायरस मिस्त्री यांना केवळ चारच वर्षाचा कालावधी देण्यात आला. खरे तर चार वर्षाचा कालावधी एखाद्याचे नेतृत्व हेरण्यासाठी कमीच आहे. त्यामुळे मिस्त्री यांना फारसे काही बदल करणे शक्य झाले नाही. त्यांनी तोट्यातील प्रकल्पांची फेरउजळणी करुन त्यांच्याविषयी निर्णय घेण्यास सुरुवात केली होती. अर्थात त्यांना जागतिक पातळीवरील मंदीचाही फटका बसला. अशा प्रकारे अनेक बाबी मिस्त्री यांच्या बाजूने नव्हत्या. असे असले तरीही त्यांनी समूहातील ज्या कंपन्या तोट्यात आहेत त्यांचा कारभार गुंडाळण्यास सुरुवात केली होती. परंतु टाटा समूहातील धुरीणींना ते पसंत नव्हते. याचा परिणाम असा झाला की, यातून अनेक जण दुखावले गेले व त्यांच्या इगोला धक्का बसला. यातूनच मिस्त्री यांना जावे लागले. अर्थात काळाच्या ओघात यातून वास्तव बाहेर येईलच. मात्र या समूहाच्या विश्‍वासार्हतेला लागलेला तडा मात्र कधीच फुसला जाणार नाही ही दुदैवाची बाब आहे.
------------------------------------------------------------------

0 Response to "विश्‍वासार्हतेला तडा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel