-->
पाणी संघर्ष यात्रेची विजयश्री

पाणी संघर्ष यात्रेची विजयश्री

संपादकीय पान शुक्रवार दि. १९ फेब्रुवारी २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
पाणी संघर्ष यात्रेची विजयश्री
पुढील महायुध्द हे पाण्यासाठी होईल असे म्हणतात. एकादृष्टीने पाहता ही भविष्यवाणी काही नाकारता येणार नाही. कारण आजच त्याची सुरुवात झाली आहे. अर्ध्याहून जास्त महाराष्ट्र पाण्यावाचून तडफडतो आहे. काही ठिकाणी पावसाच्या अभावामुळे पाणी नाही तर जिकडे पाऊस चांगला आहे तिकडे पाण्याच्या नियोजनाच्या अभावामुळे लोकांचे हांडे रिकामे आहेत. पाण्यासाठी लोकांना हजारो मैलाची पायपीट करावी लागते आहे. राज्यकर्ते मात्र सर्वकाही आलबेल आहे अशा थाटात वावरत आहेत. त्यांना जागे करण्यासाठी देशातील जनतेला पाण्यासाठी संघर्ष यात्रा काढावी लागते आहे. स्वातंत्र्यानंतर सात दशके लोटली तरीही आपण जनतेला पिण्याचे पाणी पुरवू शकलेलो नाही ही शरमेची बाब आहे. कोकणाचे उदाहरण घ्यायचे झाल्यास कोकणात भरपूर पाऊस पडतो. समुद्रात वाहूनही जाते. जिकडे धरणे आहेत तिकडे पाण्याचे योग्य नियोजन नसल्यामुळे जनतेला पाणी मिळत नाही. अशा ठिकाणी जनतेला संघर्ष करावा लागतो आणि संघर्षाच्या मार्गातून आपल्या पदरात पाणी पाडून घ्यावे लागते. पेण तालुक्यातील विशेषत: खारेपाटातील भागात भेडसाविणार्‍या पाणी प्रश्‍नावर तेथील आमदार धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारोंच्या संख्येने जनतेने पायी चालत थेट मुख्यमंत्र्यांच्या घरी वर्षा या बंगल्यावर धडक दिली आणि सुस्त झालेल्या प्रशासनाला अखेर जाग आली. मुख्यमंत्र्यांनी आ. जयंत पाटील व आ. धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाशी या प्रश्‍नी चर्चा केली व ४० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्‍वासन दिले. येत्या आठ दिवसात या कामाच्या संदर्भात ई निविदा काढण्यात येणार आहेत. यापूर्वी देखील मुख्यमंत्रीपदी पृथ्वीराज पाटील असतानाही त्यांनी अशा प्रकारे निधी उपलब्ध करुन या भागाचा पाणी प्रश्‍न कायमचा मिटविण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात काहीच झाले नाही. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्‍वासनाची पूर्तता करुन घेण्यासाठी या संघर्ष यात्रेतील प्रत्येकाला सजग राहावे लागणार आहे. या संघर्ष यात्रेत सुमारे पाच हजारहून जास्त लोक चालत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आले होते. त्यात महिलांचा जास्त भरणा होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना या दबावाखाली चर्चा करुन या प्रश्‍नाची सोडवणूक करणे भाग पडले. मात्र श्रेय घेण्यासाठी रातोरात पक्ष बदलणारे लोकप्रतिनिधी तत्पर होते. मात्र जनतेला आपल्यापाठीमागे करोखरीच कोण आहे त्याची पूर्ण कल्पना आहे. असो. पेण तालुक्यातील सिंचनाकरिता बांधण्यात आलेले हेटवणे धरण मध्य प्रकल्प अंतर्गत ६ हजार ६०० हेक्टर जमीन ओलिताखाली येणे अपेक्षित होते. परंतु, आज धरण होऊन कित्येक वर्षे झाली तरी फक्त १५० हेक्टर जमीन सिंचनाखाली आहे. तसेच धरणाचा विचार करता या धरणामधून सिडकोच्या माध्यमातून नवीन मुंबईला पाणीपुरवठा केला जातो. या सर्व बाबींचा विचार करताना जेेमतेम २० टक्के पाणी वापरले जाते. उर्वरित ८० टक्के पाणी न वापरता धरणात शिल्लकच राहते. त्यामुळे हेटवणे धरणाचे पाणी वाशी, शिर्की, खारेपाट विभागाला पिण्यासाठी व सिंचनासाठी मिळावे म्हणून प्रदीर्घ काळ लढा सुरु होता. पेण तालुक्यात हेटवणे, आंबेघर, शहापाडासारखी ३-३ धरणे आहेत. त्यातील हेटवणे धरणातील ८० टक्के पाणी विना वापर शिल्लक असते. गेली १५ वर्षे पाणी असूनदेखील पेण तालुक्याच्या घशाला कोरड आहे. याचे कारण फक्त निधी. आ. धैर्यशील पाटील यांनी तीन वर्षांपूर्वी दि. ९ फेब्रुवारी २०१३ ला  सिंचनासाठी आणि पिण्यासाठी पाणी मिळावे या ईर्ष्येने पाच दिवस पायी संघर्षयात्रा काढून तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्वरित निधी उपलब्ध करून देतो, असे सांगितले होते. परंतु, निधी उपलब्ध न झाल्याने धरणात पाणी असूनदेखील आया-बहिणींची घागर रिकामीच राहिली आहे. सरकारने २००७ पासून एक रुपयासुद्धा या हेटवणे डाव्या-उजव्या कालव्यासाठी खर्च केलेले नाहीत. जे एक कोटी रुपये आले होते, ते धरणाच्या प्रकल्पाच्या खर्चासाठी आले होते. परंतु, हा निधी अपुरा आहे. कारण, अगोदरच १८ कोटी रुपये धरणाच्या खर्चाचे देय आहेत, तर एक कोटी रुपयांतून काहीच होणार नाही. अशा प्रकारे प्रशासनाला संघर्ष यात्रा काढून ताळ्यावर आणण्याची गरज होती. या सरकारला जागे करायचे असले तर संघर्ष हा करावाच लागणार आहे हे पुन्हा एकदा सिद्द झाले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच एमएमआरडीएतून पिण्याच्या पाण्यासाठी ४० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. संघर्ष यात्रेची अशा प्रकारे यशस्वी सांगता झाली आहे.
-----------------------------------------------------------------------------------------

0 Response to "पाणी संघर्ष यात्रेची विजयश्री"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel