-->
कॉम्रेड, तुमचे विचार अमर आहेत!

कॉम्रेड, तुमचे विचार अमर आहेत!

संपादकीय पान शनिवार दि. २० फेब्रुवारी २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
कॉम्रेड, तुमचे विचार अमर आहेत!
ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते व मार्क्सवादी विचारवंत कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येला आता एक वर्ष पूर्ण झाले आहे. कॉम्रेड पानसरे यांनी जनतेच्या प्रश्‍नावर लढाया केल्या व वयाच्या ८५व्या वर्षी त्यांना मृत्यू देखील संघर्षमय आला. देशातील एक डाव्या चळवळीचे पितामह म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. अशा या पितामहला प्रतिगामी शक्तींनी गोळ्या झाडून संपविले. विचाराचा मुकाबला विचाराने केला पाहिजे हे तत्वज्ञान आपण विसरलो आहोत, असेच या घटनेनंतर वाटू  लागले आहे. पानसरे यांना गोळ्या झाडून त्यांचा विचार आपण संपवू शकतो असा अतिरेकी विचार सनातन्याने केला आणि त्यांना संपविले. पानसरेंना संपविले असले तरी त्यांचे विचार काही संपलेले नाहीत. गेल्या वर्षात सरकारला त्यांच्या मारेकर्‍यांना जेरबंद करण्यात काही यश आलेले नाही ही सर्वात खेदजनक बाब आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था कोणत्या थराला गेली आहे ते यावरुन दिसते. सुरुवातीला डॉ. नरेंद्र दाभोळकर त्यानंतर कॉ. पानसेर व नंतर लगेचच कलबुर्गी यांना गोळ्या झेलाव्या लागल्या. या तीनही हत्या राजकीय आहेत. ही केवळ गुन्हेगारी नाही तर त्यांचे विचार संपविण्यासाठी झालेली राजकीय हत्या आहे. अर्थातच असे करण्याचे बळ या खुन्यांना का मिळाले? त्यांच्यामागे कोणत्या शक्ती आहेत? या गुन्हेगारांच्या का मुसक्या आवळल्या जात नाहीत? या खुन्यांना राजकीय शक्तींनी पाठीशी घातले आहे काय? याची उत्तरे पोलिसांकडे नाहीत असे म्हणणे चुकीचे ठरेल. परंतु गेल्या वर्षात तपासाच्या दृष्टीने फारसे फासे काही हललेले नाहीत ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. स्वातंत्र्यपूर्व काळापासून कम्युनिस्ट नेत्यांची चळवळीत झोकून देणारी जी एक त्यागी वृत्ती जोपासणारी पिढी होती त्यात कॉम्रेड पानसरे हे बिनिचे शिलेदार होते. त्यांनी तरुणपणात आपल्या खांद्यावर जो लाल बावटा घेतला तो शेवटपर्यंत. देशातील कामगार, शेतकरी, शेतमजूर या कष्टकर्‍यांवर होणार्‍या अन्यायासाठी ते सातत्याने झडगले. हे लढे लढवित असताना समाजात ज्या अपप्रवृत्ती आहेत प्रामुख्याने अंधश्रध्दा, महिलांवरील अन्याय या विरोधात सतत्याने उभे राहिले. अन्यायाविरोधी उभा ठाकणारा एक लोकनेता म्हणून त्यांचा परिचय जनतेला होता. कॉम्रेड पानसरे यांनी खर्‍या अर्थाने आयुष्यात कष्टकर्‍यांचे राजकारण केले. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्र कौन्सिलचे नऊ वर्षे सरचिटणीस म्हणून कार्यरत होते. कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे ते अनेक वर्षे सदस्य होते. वयाच्या ७५ व्या वर्षानंतरही ते पक्षाच्या महाराष्ट्र राज्य सचिव मंडळाचे सन्माननीय सदस्य झालेे. कामगार, कष्टकर्‍यांचे राज्य स्थापन केल्याशिवाय देशात खर्‍या अर्थाने साम्यवाद येणार नाही यावर त्यांचा दृढ विश्‍वास होता. बुद्धिप्रामाण्य आणि पुरोगामी विचार यांच्याशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही. उक्ती आणि कृतीत कधी अंंतर पडू दिले नाही. कम्युनिस्ट पक्षसंघटना आणि मार्क्सवादी विचार हा कॉ. पानसरेंच्या जीवनाचा गाभा. कामगार संघटना आणि विविध जनसंघटना हा पक्षवाढीचा स्रोत आहे हे लक्षात घेऊन कॉ. पानसरे यांनी कोल्हापूर व परिसरात जवळ जवळ १७ कामगार संघटना उभ्या करून उत्तम प्रकारे चालवल्या. जनसंघटनांमध्ये किसान सभा व विद्यार्थी संघटना यावर त्यांचे जास्त लक्ष होतेे. कामगार, किसान विद्यार्थी संघटनांमधील चांगले कार्यकर्ते हेरून त्यांना मार्क्सवादाचे धडे देणे, त्यांचे संघटन कौशल्य वाढवून त्यांना डाव्या चळवळीतले सक्षम नेते बनवणे यासाठी पानसरेंची सतत धडपड चालू असायची. कॉलेज संपवून वकिली करू लागल्यावर पारीख पुलावरच्या भाजीवाल्यांच्या लढ्यापासून ते केंद्र सरकारने केलेल्या भारत-अमेरिका अणुकरार विरोधी लढ्यापर्यंतच्या कोल्हापुरातल्या प्रत्येक लढ्यात कॉ. पानसरेंचा सहभाग होता. आणि अन्याय अत्याचारविरोधी, शोषणविरोधी श्रमिकांचा बुलंद आवाज म्हणजे कॉ. गोविंद पानसरे असेच समीकरण झाले होते. ज्या कोल्हापुरात शाहू महाराज कर्मकांडाविरुद्ध लढले, तिथेच हजारो किलो धान्य, मोठ्या प्रमाणावर तेलतुपासारखे खाद्यपदार्थ जाळून होणार्‍या यज्ञाच्या विरोधात जनजागरण करण्यात आले. बिंदू चौकात मोठी जाहीर सभा घेण्यात आली. त्यात खुद्द छत्रपतींनी भाग घेतला. ज्ञानविरोधी धरण्यात हजारो लोक सामील आणि यज्ञाच्या बाजूने थोडेसेच हिंदूत्ववादी असेच दृश्य असे. महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांनी धरणे आंदोलनाला भेट देऊन मार्गदर्शन केले. जिल्ह्यातले सर्व पुरोगामी या धरण्यात आले. शेवटी जनतेनेच यज्ञावर बहिष्कार टाकला. यज्ञाचा बोजवारा उडाला. कोल्हापूरचा पुरोगामी चेहरा टिकवून ठेवण्यात कॉ. पानसरेंचा मोठा वाटा होता. कॉ. पनसरेंनी जी पुरोगामी चळवळ बांधली व तिचा विस्तार केला, हेच प्रतिगाम्यांच्या डोळ्यात सलत होते. यातूनच त्यांची हत्या झाली. परंतु त्यांचे विचार काही संपलेले नाहीत, ते विचार अजरामर राहाणार आहेत.
---------------------------------------------------------------------

0 Response to "कॉम्रेड, तुमचे विचार अमर आहेत!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel