-->
संपादकीय पान मंगळवार दि. २७ मे २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
-------------------------------------
अजूनही धक्क्‌यातून न सावरलेली कॉँग्रेस
------------------------------------
लोकसभा निवडणुकीचे निकाल लागून दहा दिवस उलटले असले तरी पराभवाच्या धक्यातून कॉँग्रेस अजून काही सावरलेली नाही. कॉँग्रेसचे पुढारी परस्परांवर पराभवाचे खापर फोडण्याची सध्या स्पर्धा खेळत आहेत असेच वाटावे. नेहरु-गांधी घराणे म्हणजे कॉँग्रेसचा जीव की प्राण. कॉँग्रेसला अशा या देवासमान असणार्‍या या घराण्यातील सध्याचे वारस सोनिया व राहूल यांच्यावर समोरुन टिका न करता मागच्या दरवाजाने यांचे कसे चुकले हे सांगितले जात आहे. त्यातच सोनिया गांधींपेक्षा राहूल गांधींवर जास्त राग कॉँग्रेसजनांचा दिसतोय. कारण आता त्यांना स्पष्ट समजले आहे की, राहूल गांधी हे मत खेचणारे मशिन राहिलेले नाही. सोनिया गांधी दोन वर्षापूर्वी आजारपणातून सावरल्यावर त्यांनी पक्षाची सूत्रे हळूहळू आपल्या चिंरजिवाकडे सोपविण्याचा निर्णय घेतला खरा परंतु त्यांचा हा निर्णय चुकला असे सध्याच्या निकालावरुन स्पष्ट जाणवते आहे. मात्र असे असले तरीही राहूल गांधींच्या सल्लागारांवर टीका करण्याच्या पलिकडे त्यांच्यावरही फारशी टीका झालेली नाही. इंदिरा गांधींच्यावेळी जशी कॉँग्रेस दुभंगली होती तसे काही पराभवानंतर होईल असे दिसत नाही. मोदी सरकार पुढील सहा महिन्यात नेमकी कोणती भूमिका घेते व त्याचे जनमानसात कसे पडसाद उमटणार त्यानुसार कॉँग्रेसजन आपली भूमिका घेतील असे दिसते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जर सर्वसमावेशक भूमिका न घेता एककल्ली हिंदुत्ववादी अजेंडा राबविल्यास कॉँग्रेसला पुन्हा लवकरच चांगले दिवस येऊ शकतात. त्यातून कॉँग्रेसची ताकद वाढेल अशी आशा कॉँग्रेसजनांना वाटते. मात्र सध्या तरी सर्वच कॉँग्रेस पक्ष निराशेच्या गर्तेत सापडला आहे. याच नैराश्येपोटी मिलिंद देवरांपासून टीकेचे सत्र सुरु झाले आहे. मात्र शनिवारी झालेल्या कॉँग्रेस संसदीय मंडळाच्या बैठकीत सोनिया गांधींनी पराभवाचे जे विश्लेषण केले आहे ते विचार करण्यासारखे आहे. लोकांचा आपल्यावर असलेला रोष अळखण्यात आपण कमी पडलो तसेच लोकांच्या आशा-अपेक्षांची पूर्तता करु शकलो नाही हे त्यांचे पराभवाचे विश्लेषण योग्यच आहे. अतिशय मोजक्या शब्दात सोनिया गांधींनी पराभवाचे केलेले वर्णन कॉँग्रेसजनांना विचार करण्यासाठी एक पाया ठरावा असेच आहे. मात्र या पराभवातून कॉँग्रेस धडा घेईल असे सध्यातरी दिसत नाही. कारण स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक काळ सत्तेची उब उपभोगल्यावर सत्ता ही केवळ आपल्यासाठीच आहे अशी समजून कॉँग्रेसची झाली होती. यातूनच लोकांच्या आशा-अपेक्षांचा विचार न करता सत्तेचा एकप्रकारे माज कॉँग्रेसला आला होता. यातूनच मतदारांना गृहीत धरण्याची त्यांची प्रवृत्ती बळावली होती. नरेंद्र मोदींची शक्ती वाढत चालली आहे हे गेले दोन वर्षे डोळ्यापुढे येत असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. तसे पाहता सत्तेतली शेवटची तीन वर्षे सरकार असून नसल्यासारखे होते. अण्णांच्या आंदोलनाकडेही अशाच प्रकारे कमी लेखून प्रत्येक प्रश्नाचे उत्तर काळ देईल असे ठरवून वागल्याने आज सत्ता गमाविण्याची पाळी सरकारवर आली आहे. मोदींनी तरुण पिढीला आपल्याकडे खेचून घेतले. त्यासाठी त्यांनी सोशल मिडियाचा अनिर्बँध वापर केला. मोदींच्या या प्रचारापुढे कॉँग्रेसने हाय खाल्ली. परंतु सत्ता असताना खरे तर कॉँग्रेस पक्ष अशा प्रकारे सोशल मिडियाचा वापर करु शकला असता. त्यासाठी आवश्यक असलेला पैसा उभारण्याची ताकदही कॉँग्रेसकडे होती. राहूल गांधींचे तरुण नेतृत्न पक्षाला कॅच करता आले नाही. मात्र मोदींसारखे ६४ वयाचे नेतृत्व तरुणांना आकर्षित करते, असे का झाले याचा कॉँग्रेसने विचार करण्याची गरज आहे. अर्थात असा विचार कॉँग्रेस करण्याची शक्यता कमीच आहे. पुन्हा एकदा सोनिया गांधी झंझावात निर्माण करुन आपल्याला सत्ता मिळवून देतील, राहूलचे नाणे चालले नाही तर प्रियांकाला पुढे आणा आणि शेवटी आम्हाला सत्तेत बसवा अशी त्यांची मागणी आहे. अशा तर्हेने कॉँग्रेसचे भवितव्य अंधारात आहे.
--------------------------------------
 


0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel