-->
संपादकीय पान--अग्रलेख--३०ऑक्टोबर २०१३च्या अंकासाठी--
---------------------------
संघाची लोकसंख्येवरील शाळा
-------------------
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोची येथील झालेल्या बैठकीत हिंदूंची लोकसंख्या वाढण्यासाठी प्रत्येकाने हम दो, हमारे तीन असे सूत्र अवलंबिवावे असे ठरविले आणि यावर उठलेल्या प्रतिक्रिया पाहता लगेच कोलांटी उडी देखील मारली. संघाने अशा प्रकारची बैठकीत कोणतीही चर्चा न झाल्याचे सांगितले. अर्थात न झालेल्या चर्चेची बातमी आलीच कशी? तसेच संघाची विचारसारणी लक्षात घेता ते अशा प्रकारे आवाहन हिंदुंना करणे शक्य आहे. नेहमी संघाची चर्चा ही बंद दरवाज्यामध्ये होते आणि कालांतराने त्याचे पडसाद उमटतात. परंतु आता संघाच्या बंद दरवाजांना आता काही तडे गेलेले असावेत. अन्यथा अशी बातमी उघड होणे कठीण आहे. हिंदूंपेक्षा मुस्लिमांची लोकसंख्या झपाट्याने वाढते आहे आणि याला जर आवर घालावयाचा असेल तर हिंदुंना प्रत्येकी तीन अपत्ये होण्याची गरज आहे. जर असे झाले नाही तर अजून काही वर्षांनी हिंदुची लोकसंख्या कमी होईल अशी संघाला भीती वाटते. संघाची ही लोकसंख्येवरील शाळा तमाम हिंदुंना कितपत पटेल याची शंकाच आहे. किंबहुना कुणालाच पटणार नाही. हिंदुंच्या रक्षणाचा ठेका घेतलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला खरे तर हिंदू धर्मच समजलेला नाही असे खेदाने म्हणावेसे वाटते. सहिष्णू असलेल्या हिंदू धर्माने आजवर आपल्या आजूबाजूला असणार्‍या इतरधर्मीयांना सहज आपलेसेे केले आहे यामागे हिंदु धर्माच्या असलेल्या सहिष्णुतेतील शिकवणीत आहे हेच मुळात विसरले जाते. आपल्या देशात सर्वधर्मसमभाव रुजला आहे तो याच भूमिकेतून आणि त्याला तडा लावण्याचे काम संघ करीत आला आहे. सर्वधर्मसमभाव ही संकल्पना चांगलीच रुजल्याने आपण एवढ्या मोठ्या असलेल्या आपल्या देशाला गेल्या ६५ वर्षात एकसंघ ठेवू शकलो आहे. पाकिस्तान हा देश धर्माच्या आधारावर स्थपन झाला परंतु त्यावर ते आपल्या देशाला एकसंघ ठेवू शकले नाहीत. पाकिस्तानची दोन शकले झाली आहेत. त्यामुळे एकाच धर्माच्या नावावर आपण एकसंघ राहू असे नाही. संघाने प्रत्येक हिंदु कुटुंबियांना तीन मुले पैदा करण्याचे आवाहन करुन हिंदू समाजाला एक प्रकारे शंभर वर्षे तरी मागे लोटण्याचा प्रयत्न केला आहे. अगदी साडेचारशे वर्षांपूर्वी समर्थ रामदासांनीही कुटुंब लहान राखल्यास त्याचे कसे फायदे होतील हे आपल्याला शिकविले आहे. त्यानंतर रघुनाथ धोंडो कर्वे कुटुंब नियोजन करण्याचे लाभ सर्वांना पटवून देत होते. त्याकाळी त्यांच्या या प्रचाराच्या विरोधात अनेकांनी त्यांना धारेवर धरले. परंतु त्यांनी आपले काही काम सोडले नाही. आपल्याकडे समाजसुधारणेत ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, गोपाळ गणेश आगरकर यांची उज्वल परंपरा आपल्याला लाभली आहे. या नेत्यांनी केशवपनला विरोध, सतीला विरोध, जातीपातींना विरोध, महिला शिक्षण यासाठी चळवळी उभारल्या आणि समाजाला एक नवी दिशा दिली. यासाठी त्यांना मोठा झगडा करावा लागला. या समाजसुधारकांनी भरपूर मुले पैदा करा असे कधीच सांगितले नाही. हिंदु समाज जसा शिकत गेला तशी त्याच्यात सुधारणा होत गेली. त्याला कुटुंब नियोजनाचे महत्व पटले. छोटे कुटुंब ठेवून आपली आपण प्रगती करु शकतो हे त्याला समजले. मागच्या दोन पिढ्यात प्रामुख्याने हा प्रसार जास्त प्रमाणात झाला. छोटे कुटुंब सुखी कुटुंब हा सरकारी प्रचार त्याला पटला. त्याचे फायदे त्याला समजले आणि अनेक हिंदु कुटुंबांत दोन नव्हे तर एकच मुलावर समाधान मानणारे अनेक जण आहेत. मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरात जिकडे विभक्त कुटुंब पध्दती आता चांगल्या प्रकारे रुळली असताना लहान कुटुंंब ठेवणे ही काळाची गरज ठरली आहे. स्त्री देखील नोकरी करण्यासाठी किंवा आपल्या पतीच्या मिळकतीला हातभार लावण्यासाठी घराबाहेर पडली त्यावेळी तिला सुटसुटीत कुटुंबाचे महत्व पटले. पूर्वी काळी स्त्रिया चूल आणि मूल यात अडकल्या होत्या. या चौकटीतून त्या ज्यावेळी बाहेर आल्या त्यावेळी त्यांना एक किंवा दोन मुले होण्याचे महत्व पटले. मुस्लिम कुटुंंबात शिक्षणाचे प्रमाण कमी असल्याने अनेक स्त्रिया अजूनही चूल आणि मूल यात अडकून पडल्या आहेत. अर्थात ही स्थिती काही सर्वच मुस्लिम कुटुंबात नाही. आता मुस्लिम स्त्रिया देखील शिक्षण घेऊ लागल्या आहेत. त्या नोकरीसाठी घराबाहेर पडतात. त्यामुळे त्यांना देखील सुटसुटीत कुटुंब असण्यामागचे महत्व समजले आहे. संघ आपल्याला व त्यांचे मुखंड असलेल्या नरेंद्र मोदींना तरुणांचे प्रतिनिधी असल्याचे समजतो. अर्थात सोशल मिडियाशी जवळीक असलेली तरुण पिढी संघाच्या या बुरसट विचारसारणीला प्रतिसाद देणार नाही. कारण या तरुणांना आपल्या करिअरमध्ये विशेष रस आहे. संघाचा आदेश निघल्यावर तीन मुले पैदा करणारी ही पिढी नाही हे संघाने लक्षात घ्यावे. संघ आपल्याला स्वत:ला एक सांस्कृतिक संघटना म्हणून घेतोे. परंतु त्यांचे हे अशा प्रकारचे आदेश म्हणजे असंस्कृतपणाचे लक्षण आहे आणि हिंदू तरुण पिढी त्याला बधणार नाही. महाराष्ट्राने नेहमीच पुरोगामी चळवळींना आपल्याकडे थारा दिला आहे आणि त्यातून आपला विकास साधला आहे. संघाची ही बुरसट विचारसारणी सध्याच्या पिढीला पटणार नाही. यातून संघाचे हे कालबाह्य विचार संपुष्टात येतील.
--------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel