-->
उदय ‘सेसा-स्टरलाइट’चा

उदय ‘सेसा-स्टरलाइट’चा

उदय ‘सेसा-स्टरलाइट’चा
Published on 01 Mar-2012 EDIT PAGE ARTICLE
प्रसाद केरकर
पाटण्यातून मुंबईत आलेल्या एका तरुणाने कष्टाची कामे करीत उद्योजक बनून आज 70 अब्ज डॉलरची उलाढाल असलेला वेदांत उद्योगसमूह उभारला. या तरुणाचे नाव अनिल अगरवाल. सुरुवातीला भंगार विकण्याच्या धंद्यापासून सुरुवात केलेल्या अगरवाल यांनी आज अंबानींच्या साम्राज्याला धडक देण्याची तयारी ठेवली आहे. सेसा-स्टरलाइटची निर्मिती ही त्याचाच एक भाग. अगरवाल यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी देशातील आर्थिक उदारीकरणाच्या अगोदरचाही काळ पाहिला आहे व गेल्या वीस वर्षांतली आपली मुक्त अर्थव्यवस्थेच्या दिशेने होणारी वाटचाल अनुभवली आहे. या दोन्ही टप्प्यांत त्यांनी आपल्या समूहाची वाढ झपाट्याने करून घेतली. त्यांच्या समूहाचा कारभार आता चार खंडांत पोहोचला आणि एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी म्हणून त्यांची वाटचाल सुरू आहे. 
नव्याने स्थापन झालेली सेसा-स्टरलाइट ही कंपनी नॅचरल रिसोर्सेस क्षेत्रातली जगातली सातवी मोठी कंपनी ठरणार आहे. एवढेच नव्हे तर देशातील कॉर्पोरेट्स्मधील सर्वात जास्त नफा कमावणारी दुसर्‍या क्रमांकाची कंपनी म्हणून तिची आता गणना होईल. सर्वात जास्त नफा कमावणारी कंपनी म्हणून अजून तरी रिलायन्सचे स्थान निर्विवाद आहे. मात्र भविष्यात रिलायन्सचे हे स्थान डळमळीत करण्याची सर्व तयारी सेसा-स्टरलाइटने केली आहे. सेसा-स्टरलाइटच्या निर्मितीचे मात्र शेअर बाजाराने तेवढय़ा उत्साहात स्वागत केलेले नाही. त्यामुळेच ही घोषणा होण्याची अपेक्षा असल्यापासून म्हणजे गेला आठवडाभर या दोन्ही कंपन्यांचे समभाग सतत घसरत होते. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे लवकरच संपूर्ण वेदांत समूहातील कंपन्यांची फेररचना केली जाणार असून या समूहातील वेदांत अँल्युमिनियम व मद्रास अँल्युमिनियम या कंपन्यांही सेसा-स्टरलाइटमध्ये विलीन केल्या जाणार आहेत. या दोन अँल्युमिनियम कंपन्यांच्या डोक्यावर कर्जाचा मोठा डोंगर आहे. विलीनीकरणानंतर सुमारे सहा अब्ज डॉलरचे कर्ज सेसा-स्टरलाइटच्या डोक्यावर येणार हे स्पष्ट आहे. कंपनीचे अध्यक्ष अनिल अगरवाल यांच्या दाव्यानुसार, कर्जाच्या बोज्याला आम्ही घाबरत नाही. आमची कर्ज फेडण्याची जरूर क्षमता आहे आणि हे कर्ज सरासरी सहा टक्क्यांच्या व्याजदराचे आहे. त्यामुळे याचा बोजा फार पडणार नाही. परंतु त्यांच्या या निवेदनानंतरही बाजाराचे फारसे समाधान झालेले नाही. मात्र वेदांत समूह भविष्याबद्दल जबरदस्त आशावादी आहे. येत्या तीन वर्षांत समूह आपली उलाढाल व नफा दुपटीने वाढवणार आहे. आजवर गेल्या वीस वर्षांत स्टरलाइटने केलेली वाटचाल पाहिल्यास त्यांचे हे उद्दिष्ट सफल होण्यात काही अडचण येईल असे दिसत नाही. 
स्टरलाइट व त्यांच्या समूहातील अन्य कंपन्यांनीही समभागधारकांना नेहमीच घसघशीत लाभ दिले आहेत. अगरवाल यांच्या नेतृत्वाखालील वेदांत समूहाने अन्य कंपन्या ताब्यात घेऊन आपला देशात व जगात विस्तार केला आहे आणि यात ते नेहमीच यशस्वी ठरले. कोळसा खाणी, अँल्युमिनियम, तांबे, तेल व नैसर्गिक वायू या उद्योगात त्यांनी नेहमीच कंपन्या ताब्यात घेऊन आपला विस्तार केला. मद्रास अँल्युमिनियम ही कंपनी 1995 मध्ये, ऑस्ट्रेलियातील तांब्याची खाण 2000 मध्ये ताब्यात घेऊन त्यांनी टेकओव्हरच्या क्षेत्रात पाऊल टाकले. भारत अँल्युमिनियम, हिंदुस्थान झिंक या दोन सरकारी कंपन्या त्यांनी निगरुंतवणुकीच्या प्रक्रियेत आपल्या खिशात टाकल्या. त्यापाठोपाठ त्यांनी 2004 मध्ये झांबियातील तांब्याची खाण आपल्या ताब्यात घेतली. त्यानंतर एक अब्ज डॉलर खर्च करून गोव्यातील सेसा गोवा ही कंपनी आपल्या समूहाचा भाग केली. सेसा गोवा त्यांनी ताब्यात घेतल्यावर देशातील अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. वेदांत समूह एवढय़ावरच थांबला नाही तर त्यांनी 2010 मध्ये आयर्लंड, नामिबिया व दक्षिण आफ्रिकेतील खाणी आपल्या ताब्यात घेतल्या. त्यापाठोपाठ त्यांनी कॅरन इंडिया ही कंपनी तब्बल 8.6 अब्ज डॉलरला खरेदी करून अनेकांना धक्का दिला. ही कंपनी ताब्यात आल्याने वेदांत समूहाने तेल व नैसर्गिक वायू उद्योगात प्रवेश केला. सरकारनेही या व्यवहाराला मान्यता द्यायला तब्बल 16 महिने घेतले होते. त्यांनी या उद्योगात प्रवेश केल्याने थेट रिलायन्स समूहापुढे आव्हान उभे केले. आता त्यांनी आपल्या समूहातील दोन मोठय़ा कंपन्यांचे विलीनीकरण करून एक महाकाय कंपनी स्थापन केली आहे. या नव्याने स्थापन झालेल्या कंपनीची ‘आर्थिक भूक’ मोठी आहे. यातून ही कंपनी अनेक कंपन्या ताब्यात घेण्याची भविष्यात योजना आखणार आहे. यात ते निश्चितच यशस्वी होतील. 

0 Response to "उदय ‘सेसा-स्टरलाइट’चा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel