मुंबई - शेअर बाजारातील मंदीच्या फे-यामुळे गेले सहा महिने आयपीओची बाजारपेठ पूर्णपणे ठप्प झाली असताना नवीन नर्षात एमसीएक्स या एक्स्चेंजने आपल्या समभागांची खुली समभाग विक्री करण्याचे धाडस दाखवले आहे. एमसीएक्सची खुली समभाग विक्री यशस्वी होण्याचे बाजारातून संकेत मिळत असल्याने भविष्यात आयपीओची बाजारपेठ पुन्हा फुलेल असा अंदाज व्यक्त होत आहे. नवीन वर्षात शेअर बाजाराने मंदी झटकून पुन्हा एकदा तेजीच्या दिशेने वाटचाल केली आहे. डिसेंबरच्या नीचांकानंतर आता ‘सेन्सेक्स’ने जवळपास 20 टक्क्यांची उसळी घेतली. बाजारात आलेल्या या हलक्याशा तेजीचा फायदा घेत कमोडिटी एक्स्चेंज एमसीएक्सने खुली समभाग विक्री करण्याचे ठरवले आहे. गेले सहा महिने बाजारातील आयपीओची बाजारपेठ जवळजवळ ठप्पच आहे. अशा स्थितीत अतिशय उत्कृष्ट कामगिरी असलेल्या एमसीएक्सने बाजारात येण्याचे धाडस दाखवले आहे. याबाबत एमसीएक्सचे उपाध्यक्ष जिगनेश शहा यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले की, ‘अशा प्रकारे एखाद्या एक्स्चेंजने देशातील खुल्या बाजारात समभाग विक्री करण्याची ही पहिलीच वेळ आहे. आजवरची आमची कामगिरी उत्कृष्ट आहे. या कंपनीत आठ वर्षांपूर्वी स्टेट बँक, कॉर्पोरेशन बँक व बँक ऑफ बडोदा यांनी दहा रुपये दर्शनी मूल्याने गुंतवणूक केली होती. आज त्यांच्या समभागांचे मूल्य प्रती समभाग सरासरी एक हजार रुपयांवर गेले आहे. अशा प्रकारे भविष्यातही गुंतवणूकदारांना चांगले लाभ देण्याचा आम्हाला विश्वास असल्यानेच आम्हाला गुंतवणूकदारांकडून उत्कृष्ट प्रतिसाद मिळेल असा विश्वास आहे.’ एमसीएक्सची समभाग विक्री यशस्वी झाली तर अनेक मोठ्या कंपन्या समभाग विक्रीसाठी रांगेत उभ्या आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील नवरत्न ओएनजीसी ही कंपनी तातडीने खुली समभाग विक्री करेल, असा अंदाज आहे. त्यापाठोपाठ अनेक सरकारी कंपन्याही खुली समभाग विक्री करतील असे सध्या चित्र आहे. त्यामुळे सध्या असलेली आयपीओच्या विक्रीची झालेली कोंडी एमसीएक्स फोडेल, अशी आशा बाजाराला वाटते.
दररोजची सरासरी उलाढाल 51,419 कोटी - नॅसडॅक, न्यूयॉर्क युरोनेक्स्ट, आयसीई, सीएमई, एसजीएक्स या विदेशातील नोंद असलेल्या एक्स्चेंच्या धर्तीवर आता एमसीएक्स हे भारतातील पहिले नोंद होणारे एक्स्चेंज असेल. 2003 मध्ये कमोडिटी एक्स्चेंज म्हणून स्थापन झालेल्या या कंपनीने या क्षेत्रात केवळ दोन वर्षांतच पहिला क्रमांक पटकावला. चांदीच्या व्यवहारात तर त्यांनी जगातील सर्वात मोठे एक्स्चेंज होण्याचा मान मिळवला, तर सोने व तांब्याच्या व्यवहाराच्या उलाढालीत दुसरा व कच्च्या तेलाच्या उलाढालीत तिसरा क्रमांक पटकावला. एमसीएक्समध्ये दररोजची सरासरी उलाढाल 51,419 कोटी रुपये होते. देशातील सर्वात जुन्या मुंबई शेअर बाजारानेदेखील आपले रूपांतर कंपनीत करून खुली समभाग विक्री करण्याची योजना आखली आहे. मात्र, त्यांच्यावर आता बाजी मारून एमसीएक्सने सर्वात प्रथम खुली समभाग विक्री करून आपले समभाग शेअर बाजारात नोंदवण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले आहे.
0 Response to "आयपीओच्या विक्रीची कोंडी एमसीएक्स फोडणार"
0 Response to "आयपीओच्या विक्रीची कोंडी एमसीएक्स फोडणार"
टिप्पणी पोस्ट करा