-->
उच्चशिक्षित, मुरलेला राजकारणी

उच्चशिक्षित, मुरलेला राजकारणी

 उच्चशिक्षित, मुरलेला राजकारणी
Published on 18 Feb-2012 PRATIMA
केंद्रीय कायदामंत्री सलमान खुर्शिद यांनी उत्तर प्रदेशातील निवडणुकांदरम्यान केलेल्या भाषणानंतर मोठे काहूर उभे राहिले होते. त्यांच्या या भाषणाची गंभीर दखल घेऊन निवडणूक आयोगानेही राष्ट्रपतींकडे तक्रार केली आणि विरोधकांना आयतेच कोलीत मिळाले. नेहमीप्रमाणे भाजपने खुर्शिद यांच्या राजीनाम्याची मागणी केली. एकूणच खुर्शिद यांच्या वादग्रस्त विधानाने निवडणुकीचे राजकारण ढवळून निघाले. खुर्शिद यांनी आपली बाजू स्पष्ट केलेली असली तरी राजीनामा देण्याची आवश्यकता नाही असे ठामपणे नमूद केले आहे. मात्र त्यांनी शेवटी निवडणूक आयोगाकडे माफीनामा देऊन या वादळावर पडदा टाकला. ख रे तर कायद्याचे पदवीधर व केंद्रातील मंत्रिपदाचा प्रदीर्घ अनुभव पाठीशी असलेले एक ज्येष्ठ मंत्री काही वादग्रस्त ठरेल असे विधान करण्याची शक्यता फारच कठीण वाटते; परंतु सध्या उत्तर प्रदेशातील राजकारण एवढे शिगेला पोहोचले आहे की खुर्शिद यांना अल्पसंख्याकांना आकर्षित करण्यासाठी अशा प्रकारे विधान करण्याचा मोह टाळता आला नसावा. 
उत्तर प्रदेशातील अलिगड येथे 1 जानेवारी 1953 रोजी जन्मलेल्या सलमान खुर्शिद यांच्या घरी राजकारण गेले तीन पिढय़ा आहे. देशाचे तिसरे राष्ट्रपती डॉ. झाकीर हुसेन हे त्यांचे आजोबा. त्यांचे वडील खुर्शिद आलम खान हे केंद्रात काही काळ परराष्ट्रमंत्री होते. त्यामुळे खुर्शिद यांच्या घरातील राजकारणात असलेली ही तिसरी पिढी. सलमान यांनी बिहारमधील पाटणाच्या सेंट झेव्हियर हायस्कूलमधून इंग्रजीत बी. ए. केले. त्यानंतर दिल्लीतील सेंट स्टीफन कॉलेजमधून एम. ए. केल्यावर ऑक्स्फर्ड विद्यापीठातून त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले. 1980 मध्ये सलमान यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली ती पंतप्रधानांच्या कार्यालयातून. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांची नियुक्ती पंतप्रधानांच्या कार्यालयातील विशेष अधिकारी या पदी केली. नंतर काही काळाने ते उपव्यापारमंत्री व त्यानंतर परराष्ट्र राज्यमंत्रीपदी नियुक्त झाले. या पदावर ते 1991 ते 96 या काळात होते. 2009 मध्ये ते पुन्हा एकदा लोकसभेवर फारुखबाद मतदारसंघातून निवडून गेले. कंपनी व्यवहार व अल्पसंख्याक खात्याचे मंत्रिपद त्यांच्याकडे आले. 2011 मध्ये झालेल्या मंत्रिमंडळातील खातेबदलात त्यांच्या वाट्याला कायदा व न्याय खाते आले. 2002 मध्ये सरकारने ‘सिमी’ या अतिरेकी संघटनेवर बंदी घातल्यावर त्याला आव्हान देण्यासाठी त्यांनी ‘सिमी’च्या वतीने वकिली घेतली होती. त्यांच्या या निर्णयाने त्या वेळी बरेच मोहोळ उठले होते; परंतु त्यांनी आपल्या या वकिली घेण्याच्या निर्णयाचे सर्मथन केले आणि आपण कोणतेही पक्षविरोधी कृत्य करीत नसल्याचे ठामपणे सांगितले. 
अर्थात त्यांच्या या धोरणामुळे त्यांनी अनेकांची नाराजी ओढवून घेतली. उत्तर प्रदेशातून ते नेहमीच निवडून येत असले तरी त्यांची राज्याच्या राजकारणावर म्हणावी तेवढी पकड नाही. तसेच गेली वीस वर्षे राज्यात कॉँग्रेसची सत्ता नसल्याने तसेच सुरुवातीपासूनच ते दिल्लीच्या राजकारणात रमल्याने त्यांचे उत्तर प्रदेशाकडे विशेष लक्ष नव्हते. 2009 मध्ये ते इंडिया इस्लामिक कल्चरल सेंटरच्या अध्यक्षपदाची निवडणूक हरले. त्यामुळे त्यांना मुस्लिम समाजात काही स्थान राहिले नाही अशी टीकाही झाली. 2010 मध्ये केंद्राने तयार केलेल्या ‘एनिमी प्रॉपर्टी विधेयका’ची आखणी करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. एक पक्के कॉँग्रेसमन म्हणून परिचित असलेले सलमान खुर्शिद हे दिल्लीच्या राजकारणात गेल्या तीस वर्षांत चांगलेच मुरलेले आहेत. आता त्यांच्यावर आलेले हे नवीन वादळ त्यांनी अखेर माफीनामा देऊन मिटवून टाकले. 
prasadkerkar73@gmail.com 

0 Response to "उच्चशिक्षित, मुरलेला राजकारणी"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel