-->
गुंतवणुकीसाठी चॅनेल्सचे ‘सर्फिंग’

गुंतवणुकीसाठी चॅनेल्सचे ‘सर्फिंग’

गुंतवणुकीसाठी चॅनेल्सचे ‘सर्फिंग’

Article for Canvas

देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह रिलायन्सने राघव बहल यांनी प्रवर्तित केलेल्या ‘नेटवर्क 18’ या माध्यम समूहात पहिल्या टप्प्यात सुमारे 1700 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा करून चॅनेल उद्योगात प्रवेश केला आहे. रिलायन्सची पुढील काही वर्षात या कंपनीतील गुंतवणूक सुमारे तीन हजार कोटी रुपयांहून जास्त असेल. सध्या ही गुंतवणूक कर्जाच्या स्वरूपात असली तरीही त्याचे भांडवलात रूपांतर होण्यास फारसा वेळ लागणार नाही. पूर्वी 90च्या दशकात रिलायन्स समूहाने ‘ऑब्जर्व्हर’ हे आर्थिक विषयाला वाहिलेले दैनिक सुरू करून माध्यम उद्योगात प्रवेश केला होता. परंतु यात काही विशेष यश न मिळाल्याने त्यांनी या उद्योगातील आपला गाशा गुंडाळला होता. आता रिलायन्सने पुन्हा एकदा माध्यम उद्योगात प्रवेश करताना वृत्तपत्रात न करता बदलत्या काळाला अनुसरून चॅनेल उद्योगात केला आहे. 
रिलायन्सने थेट एखादे चॅनेल विकत घेण्यापेक्षा सध्या अस्तित्वात असलेल्या कंपनीला वित्तसाहाय्य पुरवून त्यांचे सध्याचे व्यवस्थापन कायम ठेवण्याचे धोरण आखले आहे. यातून एक स्पष्ट जाणवते की, रिलायन्सने आपल्याकडे पैसा आहे म्हणून या उद्योगात पाऊल टाकण्यापेक्षाही चॅनेल चालविणे हा ‘स्लीक जॉब’ आहे आणि यातील व्यवस्थापकांना त्यांचे कौशल्य वापरू देण्याचे स्वातंत्र्य देण्याचे सध्यातरी धोरण स्वीकारले आहे. नजीकच्या काळात  काही वर्षांनी नेटवर्क 18 समूहावर रिलायन्स ताबा मिळवून संपूर्ण व्यवस्थापन आपल्याकडे घेऊही शकते. परंतु या जर तरच्या गोष्टी झाल्या. सध्यातरी रिलायन्सने ‘सायलेन्ट इन्व्हेस्टर’ च्या भूमिकेत माध्यम उद्योगात प्रवेश केला आहे. नेटवर्क 18 हा समूह आपल्याकडे आलेल्या पैशातून दक्षिणेतील माध्यमसम्राट रामोजीराव यांच्या मालकीची ईनाडू टीव्हीची विविध 11 भाषांतील चॅनेल्स ताब्यात घेणार आहे. म्हणजे सर्व मिळून नेटवर्क 18च्या ताब्यात करमणुकीची व वृत्तविषयक एकूण 25 चॅनेल्स असतील. अशा प्रकारे देशातील एवढ्या मोठ्या संख्येने चॅनेल्सचा ‘बुटिक’ असलेला हा एक मोठा माध्यमसमूह असेल. त्याखालोखाल जागतिक माध्यमसम्राट रुपर्ट मरडॉक यांच्या स्टार समूहाचा क्रमांक लागेल. म्हणजे पुढच्या दशकात चॅनेल्समधील स्पर्धा ही मरडॉक व अंबांनी यांच्यातच असेल. खरे तर त्याची पायाभरणी रिलायन्सच्या नेटवर्क 18च्या गुंतवणुकीत आहे.  त्याचबरोबर रिलायन्सला पुढच्या दशकातील  अनेक उद्योगांचा पाया असलेल्या ब्रॉडब्रँड सेवेत विशेष रस आहे. भविष्यात रिलायन्स जी ब्रॉडबँड थ्रीजी सेवा सुरू करणार आहे त्यासाठी टॅबलॅडवर ही सर्व चॅनेल्स उपलब्ध होतील. त्यामुळे रिलायन्सच्या दृष्टीने भविष्यातील उद्योगविस्तारासाठी आताच केलेली ही गुंतवणूक ठरावी.
रिलायन्सची नेटवर्क 18 मधील गुंतवणूक ही देशातील चॅनेल उद्योगातील एक महत्त्वाची जशी घटना ठरावी तसेच भविष्यातही या क्षेत्रात अनेक बातम्या येऊ घातल्या आहेत. गेल्याच आठवड्यात एन.डी.टी.व्ही. या कंपनीतील 17 टक्के भांडवल खुल्या बाजारातून ओस्वाल ग्रीन टेक या रसायन व खत उद्योगातल्या कंपनीने खरेदी केले. मुकेश यांचे धाकटे बंधू अनिल यांनी यु.टीव्ही या ब्ल्यूबर्ग वृत्तवाहिनीतील आपले भांडवल वाढवून 66 टक्क्यांवर नेले आहे. येत्या वर्षात माध्यम उद्योगात प्रामुख्याने चॅनेल्समध्ये मोठ्या प्रमाणावर विलीनीकरण वा ताब्यात घेण्याच्या घटना घडतील. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे सध्या देशात असलेल्या एकूण 700 चॅनेल्सपैकी काही मोजकीच चॅनेल्स नफा कमवित आहेत. वृत्तवाहिन्या या नेहमीच तोट्यात असतात असा जगभरचा अनुभव आहे. यावर उपाय म्हणून माध्यम कंपन्या नफा कमवून देणा-या करमणूक चॅनेल्स आपल्या ताफ्यात ठेवतात. भविष्यात येऊ घातलेल्या मंदीच्या पार्श्वभूमीवर तोट्यात असलेल्या चॅनेल्सना आपला दैनंदिन कारभार हाकणे कठीण जाणार आहे. यावर उपाय म्हणून त्यांना आपला गाशा तरी गुंडाळावा लागेल किंवा अन्य कुठल्यातरी मोठ्या चॅनेलच्या पंखाखाली यावे लागेल. अन्यथा कुणीतरी गुंतवणूकदार शोधावा लागेल. एकूणच काय तोट्यामुळे अनेक चॅनेल्सचा जीव घुसमटू लागला आहे.

चॅनेल्सची अशी स्थिती होण्याचे मुख्य कारण म्हणजे   आपल्याकडील बहुतांशी चॅनेल्सना प्रामुख्याने जाहिरातींच्या महसुलावर अवलंबून राहावे लागते. ग्राहकांकडून मिळणारा महसूल हा अत्यल्पच असतो. मोठ्या शहरात जाहिरातींचा महसूल सरासरी 12 टक्क्यानेच वाढतो आहे. मात्र रिजनल चॅनेल्सचा व्याप वाढत चालला आहे. गेल्या वर्षी त्यांचा जाहिरातीचा महसूलही सुमारे 20 टक्क्यांनी वाढला. नेटवर्क 18 चा डोळा ईनाडू टीव्हीवर यासाठीच आहे. कारण त्यांच्या ताफ्यात रिजनल चॅनेल नाही. आता त्यांना ईटीव्हीवरील ताब्यामुळे रिजनल चॅनेल्सच्या बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करता येईल. एकूणच आपल्याकडील चॅनेल्स उद्योगात आमूलाग्र बदल येऊ घातले आहेत. गुंतवणूकदार शोधण्यासाठी चॅनेल्सना ‘सर्फिंग’ करावे लागणार आहे. यात माध्यम उद्योगाची चांगलीच घुसळण होईल असे दिसते.

0 Response to "गुंतवणुकीसाठी चॅनेल्सचे ‘सर्फिंग’"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel