-->
कोकण रेल्वे, दिल्ली मेट्रोचे शिल्पकार संशोधक व्यक्तिमत्त्व : ई. र्शीधरन

कोकण रेल्वे, दिल्ली मेट्रोचे शिल्पकार संशोधक व्यक्तिमत्त्व : ई. र्शीधरन

 कोकण रेल्वे, दिल्ली मेट्रोचे शिल्पकार संशोधक व्यक्तिमत्त्व : ई. र्शीधरन
 प्रसाद केरकर, मुंबई Published on 07 Jan-2012 PRATIMA
कोकण रेल्वे व दिल्ली मेट्रोचे शिल्पकार म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते त्या ई. र्शीधरन यांनी वयाच्या 80 व्या वर्षी निवृत्तीचे शेवटचे स्थानक गाठले. त्यांचा कामाचा झपाटा पाहता त्यांनी वयाची आठ दशके गाठली आहेत याची कुणाला पुसटशी कल्पनाही नव्हती. कष्टाळू, आव्हान पेलणारे, नि:स्वार्थी आणि करोडो रुपयांचे प्रकल्प हाताळूनही भ्रष्टाचार त्यांना कधी शिवलाही नाही, असे र्शीधरन यांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे अभियांत्रिकी क्षेत्रातील ऋषितुल्य असेच आहे. 
केरळातील पालघाट या लहान शहरात 1932 मध्ये त्यांचा एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म झाला. माजी निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन हे त्यांचे शालेय मित्र. या दोघांमध्ये शाळेत असताना मार्क्‍स मिळविण्याची जोरदार स्पर्धा असे, परंतु या स्पर्धेत र्शीधरन यांचीच सरशी होई. सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्ण केल्यावर ते 1954 मध्ये भारतीय रेल्वेत दाखल झाले. त्यापूर्वी त्यांनी काही काळ कोझिकोडे येथील शासकीय तंत्रनिकेतनात लेक्चरर म्हणून व नंतर काही काळ मुंबई पोटर्र् ट्रस्टमध्ये नोकरी केली. मात्र नंतर ते रेल्वेत दाखल झाल्यावर निवृत्त होईपर्यंत तेथेच होते. 1963 मध्ये त्यांनी एक मोठे आव्हान पेलले ते वादळात नष्ट झालेला रामेश्वरम ते तामिळनाडूला जोडणारा पम्बन पूल पुन्हा उभारण्याचे. हा पूल सहा महिन्यांत उभारण्याचे ठरविले होते; मात्र र्शीधरन यांनी या आव्हानाची पूर्तता केवळ 46 दिवसांत केली. उत्कृष्ट दर्जा सांभाळत, कमीतकमी वेळेत एखादा प्रकल्प उभारण्याचे आव्हान त्यांनी आयुष्यात नेहमीच पेलले. पम्बन पूल ही त्याची एक झलक होती. 1990 मध्ये ते रेल्वेतून निवृत्त झाल्यावर त्यांची कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती झाली. सुमारे एक हजार कि. मी. अंतर कापण्यासाठी 8000 पूल, 92 बोगदे पार करणारी कोकण रेल्वे उभारणे हे एक अभियांत्रिकी आव्हानच होते. सात वर्षांत त्यांनी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारला त्या वेळी जगातील विकसित देशांनीही त्यांच्या कार्याची दखल घेतली. बी.बी.सी.ने या प्रकल्पाच्या उभारणीवर एक खास लघुपट काढला होता. त्यांच्या या कामाची दखल दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि दिल्ली मेट्रो उभारण्याच्या प्रकल्पाचे प्रमुख केले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांना त्यांच्या कामाचे स्वातंत्र्य दिले आणि कोणताही राजकीय हस्तक्षेप होणार नाही याची ग्वाही दिली. 5 मार्च 1995 मध्ये त्यांनी वयाची पासष्टी गाठली असताना दिल्ली मेट्रोची जबाबदारी स्वीकारली. दिल्लीतील दाट वस्ती पाहता तेथे मेट्रो उभारणे हे एक मोठे आव्हान होते. मेट्रोच्या प्रत्यक्ष कामाला 1998 मध्ये सुरुवात झाली आणि त्यानंतर पहिल्या चार वर्षांत पहिला टप्पा कार्यान्वितही झाला. गेल्या 13 वर्षांत 196 कि. मी. लांबीचे जाळे उभारून मेट्रोने दिल्लीवासीयांना दिलासा दिला आहे. सुमारे वीस लाख दिल्लीवासीय जे सध्या दररोज मेट्रोने प्रवास करतात त्यांचे जीवनमानच पार बदलून गेले आहे. याचे सर्व र्शेय र्शीधरन यांना जाते. मेट्रोच्या कामाची पाहणी दर शनिवारी दहा-बारा किलोमीटर अंतर चालून जातीने स्वत: ते करत असत. वयाच्या 80 व्या वर्षीही एखाद्या तरुणाला लाजवतील असा त्यांचा कामाचा उरक असे. दोन वर्षांपूर्वी ईस्ट ऑफ कैलासशेजारी क्रेनवर चढवीत असताना कॉँक्रिटचे अजस्त्र धूड पडले आणि अपघात झाला. याची जबाबदारी त्यांनी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा दिला खरा; परंतु मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना तो स्वीकारणे परवडणारे नव्हते. करोडो रुपयांची कामे करूनही त्यांच्यावर कधी भ्रष्टाचार केल्याचा साधा आरोपही झाला नाही तसेच त्यांनी कुठल्या कंत्राटदाराला पाठीशी घातले, असे घडले नाही. एका निष्काम कर्मयोग्याप्रमाणे त्यांनी मोठय़ा निष्ठेने कोकण रेल्वे व दिल्ली मेट्रोचे काम केले. भारतीय अभियांत्रिकी क्षेत्राला एक नवे परिमाण मिळवून दिले. 
Prasadkerkar73@gmail.com

0 Response to "कोकण रेल्वे, दिल्ली मेट्रोचे शिल्पकार संशोधक व्यक्तिमत्त्व : ई. र्शीधरन"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel