-->
कमॉडिटी ट्रेडिंग शेतक-यांच्या हिताचे?

कमॉडिटी ट्रेडिंग शेतक-यांच्या हिताचे?

कमॉडिटी ट्रेडिंग शेतक-यांच्या हिताचे?

प्रसाद केरकर, मुंबई. Published on 02 Jan-2012
देशात गेल्या दोन दशकांत शेअर बाजारात गुंतवणूक करणार्‍यांची संख्या झपाट्याने वाढली. याच काळात आपल्याकडे मध्यमवर्गीयांची संख्याही मोठय़ा प्रमाणात वाढल्याने ‘समभाग संस्कृती’ला त्यांच्याकडून खतपाणी मिळण्यास मदत झाली. समभाग गुंतवणूक करणार्‍यांची संख्या वाढली असली तरीही आपल्याकडे एकूण लोकसंख्येच्या पाच टक्के एवढेच लोक समभागांमध्ये गुंतवणूक करतात. त्यामुळे आपल्याकडे ‘समभाग संस्कृती’ची पाळेमुळे खोलवर रुजावयास अजूनही भरपूर वाव आहे. मात्र, शेअर बाजारातील हेलकावे गुंतवणूकदारांनी दोन दशकांत अनुभवल्याने हा गुंतवणूकदार समभागांच्या जोडीला जसा सोने व मुदत ठेवींचा पर्याय स्वीकारू लागला आहे तसाच तो कमॉडिटीजच्या ट्रेडिंगकडेही वळला आहे. मात्र, अजूनही कमॉडिटीमध्ये व्यवहार करणार्‍यांची संख्या अत्यल्पच आहे. अर्थात जागतिक पातळीवर यात मोठय़ा प्रमाणावर शेअर व्यवहारांप्रमाणे व्यवहार होत असल्याने देशातील चाणाक्ष गुंतवणूकदारांमध्ये याबाबत उत्सुकता आहे. 
शंभर कोटींहून जास्त लोकसंख्या असलेल्या आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने कृषी क्षेत्रावर आधारित आहे. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात कृषी क्षेत्राचा वाटा 20 टक्के असला तरी हे क्षेत्र रोजगाराचे एक मोठे केंद्र आहे. देशातील एकूण 64 टक्के रोजगार आपल्याला कृषी क्षेत्र पुरवते. त्याचबरोबर देशाच्या निर्यातीत 18 टक्के वाटा या क्षेत्राचा आहे. तांदूळ, गहू, चहा, डाळी, नारळ या कृषी उत्पादनात आपण जगात तिसर्‍या क्रमांकावर आहोत. आपल्या देशात 70 टक्के जनता ही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. आपल्याकडे कृषी उत्पादनाच्या किमती हा एक संवेदनाक्षम मुद्दा झाला आहे. शेतकर्‍याला त्याच्या मालाची योग्य किंमत पाहिजे असते तर दुसरीकडे ग्राहकाला रास्त दरात या मालाची खरेदी करावयाची असते. शेतकर्‍याला आपल्या उत्पादनाची विक्री करण्यासाठी कमॉडिटीज बाजार हे एक देशव्यापी व्यासपीठ आता उपलब्ध झाले आहे. अर्थात यामध्ये मतभेदही आहेत. कमॉडिटीज बाजारातील सट्टेबाजीमुळे कृषी उत्पादनाच्या किमती वाढण्यास मदत होते. मात्र, प्रत्यक्षात शेतकर्‍याच्या हातात ही किंमत पडत नाही असे आग्रही मत काही जणांचे आहे. अर्थात हा मुद्दा वादाचा आहे. अनेकांच्या सांगण्यानुसार, शेतकर्‍यांनी याचा लाभ घेतल्यास त्यांना आपल्या मालाला चांगला दर मिळू शकतो. कारण एखादा शेतकरी आपला माल कमॉडिटी बाजारात फ्यूचर्स मार्केटमध्ये आगाऊ विकून आपल्या मालाची किंमत निश्चित करू शकतो. त्यामुळे कमॉडिटी बाजार हे केवळ सट्टेबाजीचे एक केंद्र आहे असे म्हणणे चुकीचे ठरेल. शेतकर्‍यासाठी हे निश्चितच फायद्याचे ठरू शकते. मात्र, त्यासाठी शेतकर्‍याने याचा चांगला अभ्यास करावयास हवा. त्याचबरोबर जे कृषी उत्पादन पिकवत नाहीत असे व्यापारीही यात खरेदी-विक्रीचे व्यवहार करून या शेअर बाजाराप्रमाणे सट्टेबाजी करून नफा (किंवा तोटाही) कमवू शकतात. 
Prasadkerkar73@gmail.com

0 Response to "कमॉडिटी ट्रेडिंग शेतक-यांच्या हिताचे?"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel