-->
सावित्री जिंदाल : देशातील सर्वात र्शीमंत महिला

सावित्री जिंदाल : देशातील सर्वात र्शीमंत महिला

 सावित्री जिंदाल : देशातील सर्वात र्शीमंत महिला

प्रसाद केरकर, मुंबई
देशातील सर्वात र्शीमंत महिला सावित्री जिंदाल यांचा समावेश आता फोर्ब्सच्या यादीत झाला आहे. ओ.पी. जिंदाल या उद्योगपींच्या त्या पत्नी. जिंदाल यांचे 2005 मध्ये हेलिकॉप्टरच्या अपघातात निधन झाल्यावर जिंदाल समूहाची सर्व सूत्रे त्यांच्याकडे आली. 60 वर्षीय सावित्री जिंदाल या जिंदाल समूहाच्या आता अध्यक्षा आहेत. 
20 मार्च 1950 मध्ये आसाममध्ये जन्मलेल्या सावित्रीबाईंचे लग्न जिंदाल यांच्याशी झाल्यावर त्या हरियाणातील हिस्सार येथे राहावयास आल्या. त्यांचे शिक्षण पदवीपर्यंत झालेले असले तरी मारवाडी घरातील एक महिला म्हणून त्यांनी आपला संसार सुरू केला. त्यांना एकूण दहा मुले झाली. पृथ्वीराज, सज्जन, रतन, नवीन यांच्यासह अन्य सहा मुले त्यांना झाली. सध्या त्यांची चार मुले विविध कंपन्यांचा कारभार पाहत असतात. पतीच्या निधनापर्यंत त्या संसारात सक्रिय होत्या. आपले पती उद्योगधंदा करतात याची त्यांना कल्पना होती. अर्थात ते आपल्या व्यवसायातून किती पैसा कमावतात याची त्यांना तोपर्यंत काही कल्पनाही नव्हती. एक गृहिणी म्हणून त्या आयुष्य जगल्या. मात्र, पती ओ. पी. जिंदाल यांच्या निधनानंतर त्यांच्याकडे सुमारे 14 अब्ज डॉलरची उलाढाल असलेल्या जिंदाल समूहाची सर्व सूत्रे आली. यामुळे त्यांचे जीवनमानच बदलून गेले. एक घरगुती महिला ही भूमिका बदलून त्यांना एका उद्योगपतीच्या भूमिकेत जावे लागले. अर्थात ही नवीन भूमिका त्यांनी यशस्विरीत्या वठवली आहे. एवढी र्शीमंती असली तरी त्या अतिशय साधेपणाने आपले जीवन जगतात. साधी कॉटनची साडी त्या नेसतात. देशातील सर्वात र्शीमंत महिला म्हणून त्यांचा गौरव झालेला असला तरी त्याची त्यांना कधीच घमेंड वाटत नाही. जिंदाल समूह हा प्रामुख्याने वीजनिर्मिती व पोलाद उत्पादनात कार्यरत आहे. सावित्री जिंदाल या हरियाणा विधानसभेच्या सदस्या आहेत. काही काळ त्यांनी हरियाणाच्या वीजमंत्री म्हणूनही काम पाहिले होते. सावित्रीबाईंनी आपल्या समूहाची सूत्रे स्वीकारल्यापासून गेल्या पाच वर्षांत समूहाची उलाढाल तिपटीने वाढली आहे. त्या ज्या हिस्सार विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात त्याच ठिकाणी पाच दशकांपूर्वी त्यांच्या पतीने छोटासा कारखाना सुरू करून आपल्या उद्योजकतेची मुहूर्तमेढ रोवली होती. सावित्री जिंदाल या समूहाच्या अध्यक्षा असल्या तरी कंपन्यांचे कामकाज त्यांनी आपल्या चार मुलांना वाटून दिले आहे. ही मुले या कंपन्यांचे दैनंदिन कामकाज पाहतात. त्यातील नवीन जिंदाल हे कॉँग्रेसचे खासदार आहेत. सावित्रीबाई आपल्या उद्योगात जशा लक्ष घालत असतात तसेच त्यांनी आठवड्यातील तीन दिवस आपल्या मतदारसंघासाठी राखीव ठेवले आहेत. या तीन दिवसांत त्या नागरिकांना भेटतात व त्यांच्या समस्या जाणून घेऊन सोडवण्याचा प्रयत्न करतात. ओ. पी. जिंदाल यांनी हयात असतानाच आपल्या उद्योगांची वाटणी मुलांमध्ये करून दिली होती. मात्र, त्यांनी दिल्लीतील आपले घर सर्वांसाठी ठेवले आहे. आजही जिंदाल कुटुंब हे तेथे एकत्र राहते. या सर्व कुटुंबाला एकत्र बांधून ठेवण्याचे काम सावित्रीबाई अतिशय उत्तमरीत्या करतात. फोर्ब्सच्या यादीत समाविष्ट झालेल्या त्या पहिला भारतीय महिला ठरल्या. त्यांचा या यादीत पाचवा क्रमांक लागतो. उद्योजक, राजकारणी व गृहिणी अशा सर्व भूमिका आपल्या देशातील या सर्वात र्शीमंत महिला सावित्रीबाई जिंदाल वठवत आहेत. 
Prasadkerkar73@gmail.com 

0 Response to "सावित्री जिंदाल : देशातील सर्वात र्शीमंत महिला"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel