-->
‘सुंदर’मधील सट्टेबाजीची ‘सेबी’ने चौकशी करावी

‘सुंदर’मधील सट्टेबाजीची ‘सेबी’ने चौकशी करावी

 ‘सुंदर’मधील सट्टेबाजीची ‘सेबी’ने चौकशी करावी
Published on 21 Nov-2011 ARTHPRAVA
प्रसाद केरकर , मुंबई
को णत्याही म्युच्युअल फंड योजनेच्या निव्वळ मालमत्ता मूल्यापेक्षा (ही योजना शेअर बाजारात नोंद असल्यास) त्याची बाजारातील किंमत थोडीफार जास्त किंवा कमी असते. किंबहुना तसेच असणे अपेक्षित असते. मात्र, युनिट ट्रस्टची योजना ‘सुंदर’चे मात्र उलटे झाले आहे. त्यांच्या निव्वळ मालमत्ता मूल्यापेक्षा त्यांची बाजारातील किंमत ही चार पटीने आश्चर्यकारक वाढली आहे. त्यामुळे यूटीआयच्या व्यवस्थापनासह सेबी आणि गुंतवणूकदार या सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. 
युनिट ट्रस्टची ‘सुंदर’ ही योजना निफ्टीवर आधारित ईटीएफ (एक्स्चेंज ट्रेड्रेड फंड) आहे. सध्या या योजनेचे निव्वळ मालमत्ता मूल्य 570 रुपये आहे, तर बाजारातील मूल्य 2000 रुपयांवर गेले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे 1 ऑक्टोबरपासून ‘सुंदर’चे बाजारातील मूल्य झपाट्याने वाढत होते. गेल्या दीड महिन्यात या फंडाचे बाजारमूल्य तब्बल 150 टक्क्यांनी वाढले. ईटीएफच्या योजनांची शेअर बाजारात नोंदणी केली जाते. ‘सुंदर’ हा अत्यंत उत्कृष्टरीत्या चालवला जाणारा ईटीएफ आहे, अशी त्याची ख्याती आहे. त्याचे दर्शनी मूल्य 100 रुपये असून त्याच्या पाचपटीपेक्षा जास्त त्याचे निव्वळ मालमत्ता मूल्य आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याचा निधी अतिशय छोटा म्हणजे एक कोटी रुपयांच्या आत आहे. याचे बाजारातील मूल्य तब्बल तीन हजार रुपयांवर गेले होते. हा अतिशय छोटा फंड असल्याने त्याचे शेअर बाजारात व्यवहारही फारच कमी होतात. त्यामुळे ‘सुंदर’मध्ये सट्टा कशासाठी सुरू आहे, असा प्रश्न अनेकांपुढे आ वासून उभा आहे. आता यावर तोडगा काढायचा म्हणून युनिट ट्रस्टने अन्य योजनांत याचे विलीनीकरण करण्याचा घाट घातला आहे, परंतु यातून फार काही साध्य होईल असे दिसत नाही. 
ईटीएफ हा एक गुंतवणूक फंड असून त्याच्या युनिट्सची नोंदणी शेअर बाजारात केलेली असते. यातील निधी हा समभाग, रोखे, कमॉडिटीजमध्ये गुंतवलेला असतो. फ्युचर्सच्या व्यवहारातही त्यांना सौदे करण्यास परवानगी असते. जुलै 2003 मध्ये या योजनेची विक्री केली त्या वेळी 388 कोटी रुपये यात जमा झाले होते, परंतु सुरुवातीच्या गुंतवणूकदारांनी यातील युनिट्सची नंतर झपाट्याने विक्री केली आणि यातील निधी झपाट्याने खाली घसरला. आता निव्वळ मालमत्ता मूल्याला याचे अन्य योजनेत विलीनीकरण करण्यात येणार असल्याने गुंतवणूकदारांचे नुकसानच होईल. त्यापेक्षा गुंतवणूकदार खुल्या बाजारात त्याची विक्री करणे पसंत करील. 
‘सेबी’ने या योजनेची सखोल चौकशी करून यात नेमके कोणी सट्टा करून ही किंमत चढवली हे तपासले पाहिजे. यात कोणी जर शेअर दलाल वा सट्टेबाज सहभागी असतील तर त्यांना शिक्षा केली पाहिजे. कारण बाजार घसरत असताना या योजनेच्या युनिट्सचे मूल्य एवढय़ा प्रमाणात वाढतेच कसे याचा छडा लावणे ‘सेबी’चे काम आहे. 
Prasadkerkar73@gmail.com 

0 Response to "‘सुंदर’मधील सट्टेबाजीची ‘सेबी’ने चौकशी करावी"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel