-->
डॉ. विजय मल्ल्यांच्या हवाई साम्राज्याला ‘बॅड वेदर’

डॉ. विजय मल्ल्यांच्या हवाई साम्राज्याला ‘बॅड वेदर’

 डॉ. विजय मल्ल्यांच्या हवाई साम्राज्याला ‘बॅड वेदर’
Published on 19 Nov-2011 PRATIMA
प्रतिनिधी, मुंबई
स ध्या दिवाळखोरीच्या उंबरठय़ावर असल्याने देशभर गाजत असलेल्या किंगफिशर एअरलाइन्सचे मालक डॉ. विजय मल्ल्या हे प्रकाशझोतात आहेत. उत्कृष्ट सेवेची ग्वाही देत सुरू केलेल्या किंगरफिशर या हवाईसेवेवर गैरव्यवस्थापनामुळे आता दिवाळखोरीची स्थिती आली आहे.
मद्यसम्राट म्हणून ओळखीचे असलेले हे उद्योगपती विजय मल्ल्या आहेत तरी कोण? विजय मल्ल्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असलेल्या यू. बी. समूहाचा विस्तार हा जगभर पसरलेला असून मद्यनिर्मिती, रियल इस्टेट, अभियांत्रिकी, आय.टी., बायोटेक्नॉलॉजी, हवाईसेवा या उद्योगात ते कार्यरत आहेत. वयाच्या 28 व्या वर्षी वडील विठ्ठल मल्ल्या यांच्या निधनानंतर यू. बी. समूहाची सूत्रे विजय मल्ल्यांकडे 1983 मध्ये आली. सध्या या समूहाची उलाढाल 4 अब्ज डॉलर असून बाजारातील समभागांचे मूल्य सुमारे 12 अब्ज डॉलर एवढे आहे. 
सुरुवातीच्या काळात यू. बी. समूहाचा व्याप केवळ मद्यनिर्मिती व्यवसायापुरताच र्मयादित होता, परंतु मल्ल्या यांच्याकडे समूहाची सूत्रे येताच त्यांनी विस्तार हाती घेतला. किंगफिशर बिअर हा ब्रँड त्यांनी जगात पोहोचवला. सर्व प्रकारच्या मद्यनिर्मितीत प्रवेश केला. आज या क्षेत्रातली ही जगातली सर्वात मोठी कंपनी ठरली. 
1988 मध्ये विजय मल्ल्या अनिवासी भारतीय झाले. यू. बी. समूह हा भारतातील पहिला बहुराष्ट्रीय समूह म्हणून उदयास आला. त्यांनी अन्य क्षेत्रांत पदार्पण करण्याचे ठरवले आणि याचाच एक भाग म्हणून बर्जर पेंट्स समूह ताब्यात घेतला. ही कंपनी ताब्यात घेतल्याने यू.बी. समूहाचा व्याप एका झटक्यात चारही खंडांत पोहोचला. पुढे 1996 म्हणजे त्यांनी पेंट विभाग विकला आणि भरपूर पैसा कमावला. 
1993 मध्ये त्यांनी अमेरिकेत सॉफ्टवेअर कंपनी स्थापन केली आणि त्याची नोंदणी नॅसडॅक शेअर बाजारात केली. त्यामुळे त्यांचा अमेरिकेतील बाजारपेठेतील प्रवेश सुकर झाला. यू. बी. समूहाने अन्य उद्योगात प्रवेश केला असला तरीही त्यांच्या दृष्टीने मद्यनिर्मिती हाच विभाग पैसे कमवून देणारा ठरला. देशातील त्यांचा यातील वाटा 50 टक्क्यांच्या वर आहे. या उद्योगाच्या विकासासाठी त्यांनी विदेशातील कंपन्या आपल्या ताब्यात घेतल्या. 2007 मध्ये त्यांनी व्हाइट अँड मकाई ही कंपनी ताब्यात घेऊन स्कॉच आणि व्होडकाच्या बाजारपेठेत प्रवेश केला. किंगफिशर हा बिअरचा त्यांचा ब्रँड तब्बल 50 देशांत विकला जातो. देशात त्यांच्या बिअरचा वाटा 60 टक्के आहे. 
अशा प्रकारे मद्यनिर्मितीत भरीव कामगिरी करीत असताना किंगफिशर या ब्रँडच्या नावाखाली यू. बी. समूहाने हवाई सेवा सुरू केली. ही सेवा सुरू केली त्या वेळी उत्कृष्ट सेवेचा वादा करण्यात आला होता. सरकारी कंपनी एअर इंडियाच्या निकृष्ट सेवेला कंटाळलेला ग्राहक किंगफिशरकडे जरूर आकर्षित झाला. मात्र, त्यांना ग्राहक सेवेचे हे व्रत काही शेवटपर्यंत पाळता आले नाही. किंगफिशर एअरलाइन्स ही हवाईसेवा यू. बी. समूहाचा एक भाग म्हणून सुरू करण्यात आली. पुढे त्यांनी लो कॉस्ट एअरलाइन्स एअर डेक्कन ही शेअर बाजारात नोंद असलेली कंपनी ताब्यात घेतल्यावर किंगफिशर त्यात विलीन करण्यात आली. किंगफिशरने आपला झपाट्याने विस्तार केला आणि सरकारी कंपनी इंडियन एअरलाइन्सलाही मागे टाकले, परंतु नंतर झपाट्याने वाढलेल्या इंधनाच्या किमती, विमानसेवा कंपन्यांत झालेली जीवघेणी स्पर्धा तसेच कंपनीतले गैरव्यवस्थापन यामुळे ही कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठय़ावर येऊन ठेपली. 
मल्ल्या यांना उद्योगाबरोबरच क्रीडा स्पर्धांमध्ये विशेष रस आहे. क्रिकेट व फॉर्म्युला वनची त्यांची टीम आहे. अशा या मद्यसम्राटाची किंगफिशर एअरलाइन्स ‘बॅड वेदर’मुळे हेलकावे खाऊ लागली आहे. 

0 Response to "डॉ. विजय मल्ल्यांच्या हवाई साम्राज्याला ‘बॅड वेदर’"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel