-->
खुशाली शेतकरीराजाच्या चेहर्‍यावर..

खुशाली शेतकरीराजाच्या चेहर्‍यावर..

 खुशाली शेतकरीराजाच्या चेहर्‍यावर..
 Published on 04 Oct-2011 EDIT
वेधशाळेने व्यक्त केलेल्या अंदाजांना यंदाही चकवा देत पावसाने आपली चमकदार कामगिरी करून दाखवून आता नैर्ऋत्य भारतातून काढता पाय घेतला आहे. यंदा वेधशाळेने जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात पाऊस नेहमीच्या सरासरीपेक्षा पाच टक्के कमी असेल, असा अंदाज वर्तवला होता. मात्र हा अंदाज खोटा ठरवत असताना पाऊस सरासरीपेक्षा एक टक्का जास्त पडला आणि शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर खुशाली दिसू लागली. पाऊस यंदा दिवाळी करूनच परतीची वाट धरेल, असाही वेधशाळेचा एक अंदाज होता. हा अंदाजही खोटा ठरला आहे. यंदा पाऊस थोडा उशिरा सुरू झाल्याने चिंता वाटतच होती. पेरण्या उशिराही झाल्या होत्या. त्यानंतर मध्येच पावसाने दडी मारल्याने शेतकर्‍यांना चिंता वाटत होती. परंतु पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आणि पिके वाचली. पावसाळ्यातली चार महिन्यांची सरासरी पाहता पावसाने सर्वांना दिलासा दिला आहे. यंदा पावसाची सरासरी देशाच्या अनेक भागांत चांगली होती. कधी ही सरासरी भिन्न असली की काही भागात पावसाची कृपा होते, तर काही भागात अवकृपा. यंदा मात्र देशाच्या अनेक भागांत पावसाची सरासरी चांगली होती. त्यामुळे आता कापणीच्या तोंडावर सर्वत्र समाधानाचे चित्र आहे. आजवर वेधशाळेचे दहापैकी सात अंदाज चुकले असल्याने पावसाचा ‘मनमानी कारभार’ यंदाही अनेकांना घोर लावून होता. परंतु सरासरीपेक्षा जास्त पडून पावसाने वेधशाळेला पुन्हा एकदा खोटे ठरवले. वेधशाळेतील तज्ज्ञांसाठी पावसाचा अचूक अंदाज व्यक्त करणे हे पुढील काळात एक आव्हानच ठरणार आहे. वेधशाळेतील तज्ज्ञ पावसाच्या या ‘लहरीपणा’चाही अभ्यास करून आपल्या शास्त्रात वेळोवेळी बदल करत असतात आणि अंदाज जास्तीत जास्त कसा खरा ठरेल, यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतात. मात्र निसर्ग वेळोवेळी आपल्या विज्ञानाला आव्हान देत आला आहे. आपल्यासारख्या अवाढव्य देशात एका भागात दुष्काळ पडतो, त्या वेळी दुसर्‍या भागात पूर आलेला असतो. सध्याचेच उदाहरण द्यायचे झाल्यास, सध्या महाराष्ट्रात पाऊस परतीच्या वाटेवर असताना बिहारमध्ये पूर आला आहे, तर दिल्लीत अजूनही मुसळधार पाऊस पडत असतो. त्यामुळे पावसाची देशातली सरासरी पाहून, तसेच वेगवेगळ्या राज्यांतली परिस्थिती लक्षात घेऊन, आपल्याला त्याच्या संभाव्य परिणामांचा अंदाज घ्यावा लागतो. यंदा देशासह महाराष्ट्रातही पाऊस उत्तम झाल्याने बहुतांशी सर्व धरणे भरली आहेत. अलीकडच्या काळात अशी स्थिती फार कमी वर्षी आपल्याकडे होती. त्यामुळे चालू वर्षी अन्नधान्याचे विक्रमी पीक येण्याचे अंदाज व्यक्त होत आहेत. गेल्या सात वर्षांदरम्यान 2008 व 2009 या दोन वर्षांतच पाऊस सरासरीपेक्षा कमी पडल्याने अन्नधान्याच्या पिकाचे उत्पादन घसरले होते. मात्र त्यापुढील दोन वर्षे पावसाच्या कृपादृष्टीमुळे आपल्याकडे अन्नधान्याचे उत्पादन वाढले होते. मधली ही दोन वर्षे वगळता आपले अन्नधान्याचे उत्पादन सतत वाढतच गेले आहे. आता यंदाही ही स्थिती कायम असेल. त्यामुळे यंदाचा दसरा, दिवाळी सण शेतकर्‍यांसाठी उत्साहाचा असणार आहे. यंदा खरीप पीक अंदाजे 123.88 दशलक्ष टनांवर जाण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. देशातले सर्वात महत्त्वाचे पीक असलेल्या भाताचे उत्पादन विक्रमी म्हणजे 87 दशलक्ष टनांवर जाईल, असा अंदाज आहे. त्याच्या जोडीला कापूस, तेलबिया, ऊस यांचे उत्पादनही लक्षणीय असेल. त्यामुळे यंदा पीकपाणी उत्तमच असेल. बहुतांश सर्व धरणे, तलाव, बंधारे तुडुंब भरलेली असल्याने रब्बी पिकांची स्थितीही समाधानकारक असेल. देशातील महत्त्वाच्या 87 धरणांत गेल्या वर्षी असलेल्या पाण्याच्या साठय़ापेक्षा 118 टक्के जादा साठा आहे. पाण्याचा पुरेसा असलेला साठा व दोन्ही हंगामांत चांगले अन्नधान्याचे उत्पादन होण्याची शक्यता यामुळे महागाईला वेसण बसू शकेल. आपल्याकडे अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन होत असताना, जगात मात्र कोणत्या ना कोणत्या तरी नैसर्गिक आपत्तीमुळे उत्पादन कमी होत चालले आहे. चीनमध्ये भाताचे उत्पादन समाधानकारक नाही. ऑस्ट्रेलियातल्या आगीमुळे गव्हाचे उत्पादन घसरण्याची शक्यता आहे, तर अमेरिकेतील मक्याचे पीक यंदा गेल्या वर्षीपेक्षा कमीच असेल. अशा स्थितीत आपल्याकडे मुबलक अन्नधान्य पिकल्याने सर्वात मोठा फायदा होईल तो महागाईला वेसण घालण्यात. आपल्याकडील मोठय़ा लोकसंख्येचा विचार करता आपण स्वातंत्र्यानंतर हरितक्रांतीची बीजे रोवली आणि यातूनच देशातील जनतेला पुरेसे अन्न मिळेल असे नियोजन करणे शक्य होत आहे. अर्थातच अजून ते पूर्णत: साध्य झालेले नाही. हरितक्रांतीचे सकारात्मक परिणाम आपण अनुभवत असताना, आपल्याला भविष्याचाही विचार आतापासून करावा लागणार आहे. आता दोन वर्षे पुरेल एवढा अन्नधान्याचा राखीव साठा आपल्याकडे आहे. आपण केवळ देशाचीच नव्हे, तर इतर काही गरजू देशांचीही काही प्रमाणात भूक भागवू शकतो. त्याचप्रमाणे अजूनही लागवडीखाली मोठय़ा प्रमाणावर जागा आपल्या देशात उपलब्ध आहे. वाढती लोकसंख्या लक्षात घेता आपल्याला दुसर्‍या हरितक्रांतीची आवश्यकता आहे, असे काहींना वाटते. पावसाच्या लहरीपणाला आवर घालण्यासाठी आपल्याकडे काही उपाय नसला तरी जेव्हा पाऊस पडेल त्या वेळी त्याचा थेंबन्थेंब साठवून ठेवण्याची आपल्याकडे व्यवस्था हवी. तरच आपण आपल्याकडील सुमारे सव्वाशे कोटी लोकांची पोटे भरूशकतो. यंदा पावसाने दिलासा दिल्यामुळे शेतकर्‍याला व आम जनतेला दिलासा मिळाला आहे. परंतु हे समाधान निसर्गकृपेमुळे आहे. ते आपल्याला विज्ञान-तंत्रज्ञानाच्या मदतीने कायमस्वरूपी करायचे आहे.

0 Response to "खुशाली शेतकरीराजाच्या चेहर्‍यावर.."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel