-->
मुंबई बाजाराचे स्वागतार्ह पाऊल..

मुंबई बाजाराचे स्वागतार्ह पाऊल..



मुंबई बाजाराचे स्वागतार्ह पाऊल..

 Published on 03 Oct-2011Article in Arthaprava

प्रसाद केरकर,मुंबई
लहान व मध्यम आकारातील कंपन्यांना बाजारात आपल्या समभागांची नोंदणी करता यावी या हेतूने स्वतंत्र शेअर बाजार सुरू करण्याच्या प्रस्तावाला आता ‘सेबी’ने मंजुरी दिल्याने प्रदीर्घ काळ रखडलेला हा प्रकल्प आता मार्गी लागण्याची चिन्हे दिसत आहेत. येत्या दिवाळीच्या मुहूर्तावर मुंबई शेअर बाजार बहुदा आपल्याकडे हा स्वतंत्र विभाग कार्यरत करील, असे दिसते. मुंबई शेअर बाजारापाठोपाठ राष्ट्रीय शेअर बाजारही अशा प्रकारची सेवा सुरू करील. त्यामुळे लहान व मध्यम आकारातील अनेक कंपन्यांची फार मोठी सुविधा उपलब्ध होईल. आज आपल्याकडे देशात लाखोंच्या संख्येने लहान व मध्यम आकारातील कंपन्या आहेत. मोठय़ा संख्येने या कंपन्या रोजगार निर्मिती करून देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावीत असतात. सध्या मुंबई शेअर बाजारात नोंद असलेल्या सुमारे चार हजार कंपन्यांपैकी 70 टक्के कंपन्या एकेकाळी लहान व मध्यम आकारातल्याच होत्या. त्यामुळे आजच्या लहान व मध्यम आकारातल्या कंपन्यांपैकी बहुतांशी कंपन्या या भविष्यात मोठय़ा होणारच आहेत. सध्या सुमारे 30 हजार कोटी रुपयांची उलाढाल करणारी आय. टी. उद्योगातली देशातली दुसरी मोठी कंपनी इन्फोसिस ही केवळ 10 हजार रुपयांच्या भांडवलातून सुमारे 30 वर्षांपूर्वी स्थापन झाली होती. आजच्याएवढय़ा मोठय़ा कंपनीचा उगमही एक लघु उद्योगातली कंपनी म्हणून झाला होता हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. अर्थात प्रत्येक कंपनी ही काही इन्फोसिस होऊ शकणार नाही हे वास्तव मान्य केले तरी त्यांच्या वाढीला योग्य दिशा दिल्यास या कंपन्या आपली वृद्धी करू शकतात. लहान व मध्यम आकारातील कंपन्यांना सर्वात मोठी अडचण असते ती भांडवलाची. अनेकदा त्यांच्याकडे असलेल्या उत्पादनाला मागणी चांगली असते. मात्र, त्यांच्याकडे पुरेसे भांडवल उपलब्ध नसल्याने त्यांच्या विस्ताराला खीळ बसते. बरे, या कंपन्या प्रत्येक वेळी भांडवलासाठी बँकांचे दरवाजे ठोठावू शकत नाहीत. अनेकदा त्यांना बँकांचे कर्ज महागही पडते. पी. ई. फंड वा विविध प्रकारचे फंड अशा प्रकारच्या प्रकल्पांना वित्तसाहाय्य करू शकतात. मात्र, त्यांनाही भांडवल उपलब्ध करून देण्याबाबत र्मयादा असतात. असे फंड काही सर्वांना भांडवल उपलब्ध करून देऊ शकत नाहीत. अशा वेळी या कंपन्यांना भांडवल बाजारात आपले समभाग खुल्या विक्रीद्वारे विकण्याचा पर्याय खुला असतो. मात्र, सध्याच्या नियमावलींनुसार मोठय़ाच कंपन्या अशा प्रकारची विक्री करू शकतात. त्यामुळे लहान कंपन्यांना भांडवल उभारणीचा पर्यायही खुला राहत नाही. अशा प्रकारे भांडवल उपलब्ध न झाल्याने लहान व मध्यम आकारातील कंपन्यांच्या वृद्धीला खो बसतो. त्यामुळे अप्रत्यक्षरीत्या अर्थव्यवस्थेलाही चालना मिळत नाही. यावर पर्याय म्हणून लहान व मध्यम आकारातील कंपन्यांना समभाग विक्री करून त्यांच्या समभागांची नोंदणी शेअर बाजारात करता यावी यासाठी मुंबई शेअर बाजाराने अशा प्रकारच्या कंपन्यांच्या समभागांची विक्री करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याचा प्रस्ताव सेबीपुढे ठेवला होता. जगात अशा प्रकारची व्यवस्था लंडन, कॅनडा, हॉँगकॉँग, जपान, कोरिया, अमेरिकेतील नॅसडॅक शेअर बाजारात आहे. आपल्याकडेही सुमारे 15 वर्षांपूर्वी ‘ओटीसी’ हा शेअर बाजार स्थापून सुरुवात करण्यात आली होती; परंतु त्या काळी या बाजारात अनेक त्रुटी होत्या असे आढळले. परिणामी या बाजाराला काही काळाने गाशा गुंडाळावा लागला होता. आता मात्र विदेशातील अनुभव लक्षात घेऊन तसेच आजवरच्या आपल्या अनुभवातून शिकून नव्याने आखणी करण्यात आली आहे. सध्याच्या प्रस्तावानुसार, लहान व मध्यम आकारातल्या कंपन्यांनाही खुली समभाग विक्री करण्यास परवानगी देऊन त्यांची नोंदणी शेअर बाजाराच्या एका स्वतंत्र व्यासपीठावर करण्यात येणार आहे. पुढे या कंपन्या आकाराने मोठय़ा झाल्यावर त्यांना मुख्य शेअर बाजारात नोंदणी करण्याचा पर्याय खुला ठेवण्यात येणार आहे. गुंतवणूकदारांनाही झपाट्याने वाढणार्‍या कंपन्यांच्या समभागात लवकर सहभागी होण्याचा पर्याय यातून खुला होणार आहे. विदेशात अशा प्रकारचा प्रयोग चांगला सफल झाला आहे. यात कंपन्यांचे प्रवर्तक, गुंतवणूकदार या दोघांचाही फायदा होतो, असे आढळले आहे. आता आपल्याकडेही हा प्रयोग यशस्वी होईल, असे म्हणावयास काही हरकत नाही. 
prasadkerkar73@gmail.com 

0 Response to "मुंबई बाजाराचे स्वागतार्ह पाऊल.."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel