-->
खासगीकरणाचे सारस्वत पर्व

खासगीकरणाचे सारस्वत पर्व


खासगीकरणाचे सारस्वत पर्व 
Published on 18 Sep-2011 For Canvas
देशातील सहकारी क्षेत्रातल्या सर्वात मोठय़ा व नफ्यात असलेल्या सारस्वत सहकारी बँकेने आता खासगी बँकेत आपले रूपांतर करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. जवळपास गेली दोन वर्षे बँकेचे अध्यक्ष एकनाथ ठाकूर हे वेळोवेळी याविषयी सूतोवाच करीत होते. अर्थात अशा प्रकारे खासगी बँकेत एखाद्या सहकारी बँकेने आपल्याला परिवर्तीत करण्याची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वी सहकारी क्षेत्रात असलेल्या डेव्हलपमेंट क्रेडिट बँकेने आपले रूपांतर खासगी बँकेत केले आहे. त्यांना ही प्रक्रिया करण्यासाठी त्यावेळी सभासदांचा फार मोठा रोष ओढून घ्यावा लागला होता. सारस्वत बँकेच्या सध्याच्या संचालक मंडळालाही अशा प्रकारे ही बँँक परिवर्तीत करताना अनेक अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

1918 सालापासून पतपेढी म्हणून कार्यरत असणारी व 1933 मध्ये सहकारी क्षेत्रात बँक म्हणून कार्यरत असणार्‍या सारस्वत बँकेने 30 हजार कोटी रुपयांचा एकूण व्यवसायाचा टप्पा गाठला आहे. सध्या देशात असलेल्या एकूण बँकांमध्ये ग्रामीण सहकारी बँका 1721, राज्य सहकारी बँका 31, मध्यवर्ती सहकारी बँक 331 असे सहकारी बँकिंगचे जाळे आहे. त्यातील फारच मोजक्या सहकारी बँका नफ्यात आहेत. अर्थात, व्यावसायिक दृष्टिकोन ठेवला तर डबघाईला येण्याची शक्यता असलेल्या सहकारी क्षेत्रातही यशस्वी होता येते हे सारस्वत बँकेने दाखवून दिले आहे. बँकांसाठी सर्वसाधारणपणे ठेवी हा खर्च, तर उत्पन्न मिळवून देणारे क्षेत्र म्हणजे कर्ज असते. पण कर्ज वितरण वाढवायचे झाल्यास भांडवलही वाढवावे लागते. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, सहकारी बँकांना दशर्नी मूल्यांच्या आधारेच भांडवल विक्री करता येते. त्याउलट खासगी बँकांना भांडवल विक्री ही अधिमूल्य आकारून करता येते. एकूणच, देशातील बँकिंगचा विचार करता रिझर्व्ह बँक सहकारी बँकांना विविध पातळीवर दुय्यम वागणूक देते, ही वस्तुस्थिती आहे. यामुळे जो पर्यंत सहकारी क्षेत्रात छोट्या व मध्यम आकारातील बँक असते त्यावेळी ती सहजरित्या कार्य करू शकते. मात्र जेव्हा तिचा पसारा वाढतो तिच्या विस्तारावर अनेक र्मयादा येतात. अर्थात, या परिस्थितीला सहकार क्षेत्रही तितकेच कारणीभूत आहे. सहकार क्षेत्राला भ्रष्टाचाराची वाळवी लागली असल्याने रिझर्व्ह बँकेचा या क्षेत्रावर विश्वास राहिलेला नाही. दुसर्‍या बाजूला खासगी बँकांना ज्या प्रकारे विस्तार करण्यासाठी मुक्त परवाना आहे, तसा मुक्त परवाना सहकारी बँकांना नाही, हीसुद्धा एक वस्तुस्थिती आहे. 

देशातील बँकिंग उद्योग गेल्या दोन दशकात झपाट्याने विस्तारला आहे. आर्थिक उदारीकरणाचे युग सुरू झाल्यापासूनच खर्‍या अर्थाने खासगी बँकांचे युग सुरू झाले. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना यातून मोठी स्पर्धा निर्माण झाली. यातून त्यांना ग्राहकांना चांगली सेवा द्यावी लागली. परंतु स्वातंत्र्यानंतर सहा दशके ओलांडली असली तरी संपूर्ण देशात बँकिंग व्यवस्था पोहोचलेली नाही. अजूनही आपल्या देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी 50 टक्के लोकांनी बँक खाते उघडलेले नाही. त्यामुळे आता सरकारने ग्रामीण भागात बँंकिंग पोहोचण्यासाठी विशेष भर देण्याचे ठरविले आहे. याचाच एक भाग म्हणून दोन हजार लोकसंख्या असलेल्या छोट्या खेड्यातसुद्धा बँक सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळेच नव्याने परवाना दिल्या जाणार्‍या खासगी बँकांना आता प्रत्येक चार शाखांमागे एक शाखा ग्रामीण भागात उघडण्याची सक्ती करण्यात आली आहे. आपल्याकडे बँकिंग उद्योगासाठी जशी शहरात मोठी बाजारपेठ आहे तशी ग्रामीण भागातही मोठी संधी आहे. याच बाजारपेठेवर विदेशी बँकांचे लक्ष गेले आहे. सध्या 37 विदेशी बँका आपल्याकडे असून त्यात आता जगातील सर्वात मोठी बँक असलेल्या ‘आयसीबीसी’ची भर पडली आहे. आयसीबीसीच्या प्रवेशामुळे स्पर्धा अधिक तीव्र होणार आहे आणि त्याचा परिणाम भारतीय बँकिंग क्षेत्रावर होणार आहे. या पार्श्वभूमीवर सारस्वत बँकेने खासगी क्षेत्रात उतरण्याचा घेतलेला निर्णय धाडसी आाहेच, पण बँकेच्या क्षमतांची कसोटी पाहणाराही ठरणार आहे. या बँकेने सहकारी डबक्यातून बाहेर पडून व्यावसायिक यशाचे टोक गाठले तर भारतीय बँकिंग क्षेत्रासाठी ती नक्कीच एक प्रेरणादायी घटना ठरेल. prasadkerkar73@gmail.com 

0 Response to "खासगीकरणाचे सारस्वत पर्व"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel