आजपर्यंत विविध उत्पादनांच्या प्रमोशनसाठी ब्रँड अँम्बेसेडर म्हणून कलाकारांना नियुक्त केले जात होते. आता मात्र पहिल्यांदाच नामवंत लेखक चेतन भगत यांची नियुक्ती चिनी कंपनी हुवाई टेक्नॉलॉजिसने आपल्या उत्पादनांच्या प्रमोशनसाठी ब्रँड अँम्बेसेडर म्हणून केली आहे.चिनी कंपनी स्मार्ट फोन, टॅबलेटस्ची निर्मिती करते. चेतन भगत हे तरुणांचे आयकॉन आहेत आणि त्यांनी नामवंत पुस्तके लिहून आपले नाव या क्षेत्रात कमविले असल्याने तरुणांना आमच्या उत्पादनांकडे आकर्षित करण्यासाठी आम्ही चेतन भगत यांची या पदी नियुक्ती केली असे कंपनीने जाहीर केले आहे. या बदल्यात त्यांना किती मोबदला दिला जाणार आहे ते प्रसिद्ध झाले नसले तरी सुमारे एक कोटी रुपये त्यांना सहा महिन्यांसाठी दिले जाणार असल्याची चर्चा आहे. चेतन भगत यांना पैसे किती देणार हा मुद्दा गौण असला तरी एका लेखकाची ब्रँड अँम्बेसेडरपदी नियुक्ती होण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि हा त्यांचा मोठा सन्मान ठरावा. 22 एप्रिल 1974 रोजी जन्मलेले चेतन भगत हे उत्कृष्ट लेखक जसे आहेत तसेच ते एक फर्डे वक्तेही आहेत. एका मध्यमवर्गीय पंजाबी कुटुंबात जन्मलेल्या चेतनचे वडील लष्करात होते व आई सरकारी नोकरीत होती. चेतनचे बहुतांशी शिक्षण दिल्लीतच झाले. लहानपणापासूनच ते हुशार होते. आय.आय.टी. दिल्लीतून त्यांनी मॅकेनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केल्यावर आय.आय.एम. अहमदाबाद मधून व्यवस्थापनातील उच्च पदवी घेतली. तेथे त्यांचा उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून सन्मानही झाला होता. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी 11 वर्षे इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून हॉँगकॉँगमध्ये नोकरी केली. सुरुवातीपासून त्यांना लिखाणाची आवड होतीच. लिखाणाचा हा छंद पूर्ण करण्यासाठी म्हणून त्यांनी परदेश सोडले आणि मुंबईत येऊन स्थायिक झाले. मुंबईत येण्यापूर्वी त्यांची दोन पुस्तके प्रकाशित झाली होती. आजवर त्यांची चार पुस्तके प्रकाशित झाली असून विशेष म्हणजे ही चारही पुस्तके गाजली. तर दोन पुस्तकांवर सिनेमे निघाले. थ्री इडियटस् हा आमिरखानचा गाजलेला चित्रपट त्यांच्याच कादंबरीवर बेतला आहे. हा चित्रपट रिलीज झाल्यावर त्यांना यात योग्य क्रेडिट न दिल्याबद्दल वाद उफाळून आला होता. यात त्यांना चांगलीच प्रसिद्धी मिळाली आणि आणखीनच ते प्रसिद्धीच्या झोतात आले.पुस्तकांप्रमाणे त्यांची अनेक भाषणे गाजली आहेत. तसेच काही वृत्तपत्रांत त्यांचे स्तंभ नियमित प्रकाशित होतात. चेतन भगत यांना आजवर अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. यात यंग अँचिव्हर पुरस्कार (2004), टाइम मॅगझिनचा पुरस्कार (2010) यांचा समावेश आहे. आय.आय.एम.मध्ये शिकत असताना त्यांचे अनुक्षा सूर्यनारायणन या मैत्रिणीशी प्रेम झाले आणि त्यांचे रूपांतर विवाहात झाले. चेतन भगत यांचा प्रवास खूप मजेशीर आहे. त्यांचे शिक्षण झाले अभियांत्रिकीत परंतु त्यांनी त्यात कधीच आपले करिअर केले नाही. त्यांनी आपले करिअर केले वित्तीय क्षेत्रात आणि त्यानंतर लेखक म्हणून ते परिचित झाले. त्यांची ब्रँड अँम्बेसेडर म्हणून नियुक्त केलेली कंपनी हुवाई टेक्नॉलॉजिस ही टेलिकॉम उद्योगातली जगातली दुसरी मोठी कंपनी आहे. त्यांची गेल्या वर्षाची एकूण उलाढाल 28 अब्ज डॉलर म्हणजे भारतीय रुपयात 1.27 लाख कोटी रुपये एवढी आहे. तर या कंपनीची भारतातील उलाढाल 49 कोटी डॉलर होती. या कंपनीने भारतात डाटा कार्ड, सेट टॉप बॉक्स, सी.डी.एम.ए. व जी.एस.एम. फिचर फोन व स्मार्ट फोन्स बाजारात आणले आहेत. पुढच्या तीन वर्षात या कंपनीने महत्त्वाकांक्षी विस्तार हाती घेतला असून आपली उत्पादने लोकप्रिय करण्यासाठी चेतन भगत यांची नियुक्ती केली आहे. चेतन भगत यांचा हा मोठा सन्मानच ठरावा.
0 Response to "चेतन भगत: ब्रँड अँम्बेसेडर होणारा पहिला लेखक"
0 Response to "चेतन भगत: ब्रँड अँम्बेसेडर होणारा पहिला लेखक"
टिप्पणी पोस्ट करा