
अखेर राजकारणच जिंकले
0२ मेच्या मोहोरसाठी चिंतन
अखेर राजकारणच जिंकले
आजचा हा लेख वाचकांच्या हातात पडेपर्यंत पाच राज्यातील निवडणुकीच्या निकालास सुरुवात झाली असेल. यात कोण जिंकणार? केंद्रात सत्तास्थानी असलेला भाजपा किती राज्यात मुसंडी मारणार? केरळातील डावी आघाडी आपली सत्ता राखण्यात यश मिळवेल का? पश्चिम बंगालमध्ये ममतादीदी आपली सत्ता टिकवतील का? तामीळनाडूमध्ये कोण सत्तेवर येणार? आसाममध्ये कोण विजेता ठरेल? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे काही तासात मिळतील. त्याविषयी आता अंदाज वर्तविण्यात काहीच अर्थ नाही. संपूर्ण देश कोरोनाच्या संकटात असाताना तेथे लक्ष केंद्रीत करण्याएवजी आपल्या सरकारने राजकारण महत्वाचे ठरविले आणि हट्टापायी पाच राज्यातील विधानसभेच्या निवडणुका घेतल्याच. अर्थात या निवडणुका सहा महिने किंवा एक वर्ष पुढे ढकलल्या असत्या तर काही मोठे आभाळ कोसळले नसते. परंतु तसे करण्याचा विचारही सरकारच्या मनाला शिवला नाही. कारण सत्ता मिळविण्याचा हव्यास भाजपला आहे. त्यांनी सत्ता जरुर मिळवावी, शेवटी राजकारण हे सत्ता मिळविण्यासाठीच असते, जो सत्ता कमवितो तो सध्याच्या राजकारणात यशस्वी पक्ष ठरतो, परंतु लोकांचे जीव धोक्यात टाकून अशी सत्ता मिळविण्यात काय अर्थ? कोरोनाची दुसरी लाट वाढण्यास व देशभर पसरण्यास आता या निवडणुका व कुंभमेळा कारणीभूत ठरला आहे. त्यामुळे या निवडणुकीचा निकाल कोणत्याही पक्षाच्या बाजूने लागला तरी यात आपल्याकडील राजकारणच जिंकले आहे असेच म्हणावे लागले. राजकारण प्रत्येक पक्षाने करावे, मात्र देशातील वातावरण गढूळ असताना ते करणे पूर्णपणे चुकीचे आहे. पंतप्रधान व गृहमंत्र्यांसारखी जबाबदार व्यक्ती हे कोरोनाच्या लाटेतही लाखोंच्या सभा घेतात, पंतप्रधान जाहीर सभेत भाषण करताना मास्कही वापरत नाहीत, याला बेजबाबदारपणा म्हणावयाचा नाही तर काय? गंमतीचा भाग म्हणजे स्वायत्त असलेला निवडणूक आयोगही आंधळी पट्टी डोळ्यावर घालून वावरत आहे. अखेर त्यांना न्यायालयाने चपराक दिली हे बरेच झाले. कॉँग्रसेचे नेते राहूल गांधी यांनी आपल्या पश्चिम बंगालमधील जाहीर सभा व रॅली वाढता कोरोना लक्षात घेता रद्द केल्या व एक संवेदनाक्षम राजकारणी कसा असू शकतो याचे उत्तम उदाहरण घालून दिले. परंतु त्यांच्या या कृत्याचे स्वागत करण्याएवजी त्यांच्या सभेला गर्दी होतेच कुठे? त्यांना ऐकायला येतोच कोण? असे वक्तव्य भाजपाच्या नेत्यांनी करुन राजकारण किती असंवेदनाक्षील झाले आहे याचा परिपाठ घालून दिला. देशात स्मशानात प्रेते जाळायला वेटिंगवर आहेत, रुग्णालयात पुरेसे बेड नाहीत, बेड आहेत तिकडे ऑक्सीजन उपलब्ध नाहीत व माणसे किड्यामुंगीसमान मरत आहेत, अशा स्थितीत देशातील जनतेला दिलासा देण्याएवजी त्यांना राजकारणात गुंगवून ठेवण्याची किमया देशातील या दोन नेत्यांनी करुन दाखविली आहे. याहून असंवेदना कोणती असू शकते? आपल्याकडील माध्यमे या बाबींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत, परंतु जगातील वृत्तपत्रांनी पंतप्रधानांची तर छी, थू केली आहे. आपल्यासारख्या देशाला सध्या राजकारण नको आहे, सध्या गरज आहे ती लोकांचे प्राण वाचविण्याची...लोकांना चांगली आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्याची. परंतु ते राहील दूर, लोकांना निवडणुकीच्या रिंगणात गुंगवून ठेवण्यात आले. सध्याचे केंद्र सरकार एवढे करुन थांबले नाही तर कुंभमेळ्याला परवानगी देऊन पंधला लाख लोकांना तेथे आमंत्रित केले गेले. जगात कोणत्याही मेळाव्याला, सभांना बंदी असताना आपल्याकडे मात्र हिंदूंचा मेळावा भरतो आणि तेथे पंधरा लाख लोक उपस्थित राहातात. सर्वात दुर्भाग्याची बाब म्हणजे, उत्तरखंडाचे मुख्यमंत्री आम्हाला मॉँ गंगेचा आशिर्वाद आहे व आम्हाला काही होणार नाही अशा आशावाद व्यक्त करुन या कुंभमेळ्याचे समर्थन करतात. अशा प्रकारे कोरोना भर जोमात असताना या कुंभमेळ्याला परवानगी द्यायची गरजच काय होती असा सवाल सर्वसामान्यांना पडेल. परंतु यामागेही राजकारणच आहे. हिंदुत्वाचे राजकारण. हिंदुंच्या या उत्सवाला आम्ही परवानगी ही देणारच, कॉँग्रेसच्या राज्यात असे होत नव्हते, असे जनतेला भाजपाला सांगावयाचे होते व हिंदुंची मते आपल्याकडे खेचायची होती. शेवटी सध्याच्या काळात राजकारणच वरचढ ठरले आहे. यात मात्र जनतेचा नाहक बळी जात आहेत. कुंभमेळ्यातून परतलेले हे नागरिक हे करोनाचे वाहक आहेत व तेच देशभर कोरोना पसरविणार आहेत, हा अंदाज अखेर खरा ठरला आहे. शेवटी नाईलाजास्तव पंतप्रधानांना प्रतिकात्मक कार्यक्रम करा, असे सांगावे लागले. परंतु तोपर्यंत वेळ निघून गेली होती. निवडणुकांचे राजकारण व हिंदुत्वाचे राजकारण देशाला अखेर खड्यात घालत आहे. यंदाचा कुंभमेळा साजरा झाला नसता तर हिंदुत्व काही संपले असे झाले नसते. परंतु भाजपाची तसे करण्याची हिंमत झाली नाही. कारण त्यांचे सर्व राजकारण हे हिंदुत्वाच्या पायावर उभे आहे. पूर्वी कॉँग्रेस मुस्लिमांच्या मतांचे धृवीकरण करुन जिंकून येत असे, आता भाजपा हिंदूंच्या मतांचे केंद्रीकरण करुन जिंकून येत आहे. शेवटी राजकारण ज्यावेळी धर्माधिष्ठीत होते त्यावेळी त्या देशाची अधोगती सुरु होते. भाजपाच्या या राजकारणातून आज देशात हिंदू-मुस्लिम दुही निर्माण झाली आहे. कधी नव्हे तेवढी दुफळी या दोन समाजात निर्माण झाली आहे. यातून माणूस आपली माणूसकी हरवून बसला आहे, हे सर्वात दुर्दैव आहे. मध्यप्रदेशात कोरोनाच्या काळात हिंदूनी ज्या आपल्या नातेवाईकांवर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला तेथे मुस्लिम समाजातील तरुणांनी पुढे येऊन हिंदू रितीरिवाजानुसार अंत्यसंस्कार करणे, ही आपल्या समाजातील काळोखी वातावरणातील एक सोनेरी किनार आहे. परंतु केवळ धर्माचे राजकारण करणाऱ्यांना यातील सोनरी किनार समजणार नाही. सध्या आपल्याकडे धर्माधिष्ठीत राजकारणच जिंकते आहे... आता पाच राज्यातील निकाल याच धर्तीवर लागतो की काही वेगळे पहावयास मिळते ते पाहू...
0 Response to "अखेर राजकारणच जिंकले"
टिप्पणी पोस्ट करा