-->
कर्जबुडव्यांना जीवदान

कर्जबुडव्यांना जीवदान

कर्जबुडव्यांना जीवदान एकीकडे कष्टकरी जनतेला सध्या कोरोनामुळे दोन वेळचे जेवणही मिळणे मुष्किल झालेले असताना कर्जबुडव्या मेहूल चोक्सी, विजय मल्या, नीरव मोदी, रामदेव बाबा यांच्यासारख्यांची 68 हजार कोटी रुपयांची कर्जे रिझर्व्ह बँकेने माफ
केली आहेत, ही बातमी म्हणजे सध्याचे नरेंद्र मोदी यांचे सरकार किती भांडवलदारधार्जिणे आहे याचा उत्तम नमुना आहे. यातील मेहूल चोक्सी, निरव मोदी, विजय मल्या हे कर्जबुडवे तर देशातून पळून गेले आहेत. त्यांना मुसक्या आवळून विदेशातून पकडून आणून जेलची खला खायला द्यायच्या एवजी मोदी सरकारने त्यांची कर्जे माफ करण्याची कृती केली आहे. मोदी सरकारने आजवर जनतेला भूलविणाऱ्या घोषणा एकीकडे करवयाच्या व दुसरीकडे मात्र त्याच्या विरोधात कृती करावयाची हे आता काही नवीन राहिलेले नाही. 2014 साली ज्यावेळी मोदी सरकार प्रथम सत्तेत आले त्यावेळी त्यांनी कॉँग्रेसमधील भ्रष्टाचार व काळा पैसा यांचे मोठे भांडवल केले होते. त्यावेळी सत्तेत आल्यानंतर लगेचच विदेशातील काळा पैसा शोधून काढून तो जनतेत वाटून देण्याची अनोखी घोषणा केली होती. पैसा वाटायचे तर सोडाच विदेशातून एकही काळा रुपया परत आणण्यात त्यांना यश आलेले नाही. असे असताना देशातील जनतेच्याचे पैशावर व्यवसाय करणाऱ्या व तोच पैसा परदेशात घेऊन जाऊन पलायन करणाऱ्यांचाही मोदी सरकारने आता माफ केले आहे. यातून सत्ताधाऱ्यांचे खरे रुप जनतेपुढे आले आहे. आता सरकारने थेट नव्हे तर रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून ही कर्जे माफ करुन आपण स्वत: नामानिराळे असल्याचा मोठा भास निर्माण केला आहे. खरे तर या विषयीचा एक प्रश्न कॉँग्रेसचे खासदार राहूल गांधी यांनी लोकसभेत विचारला होता. मात्र सरकारने त्यांना काहीच उत्तर दिले नव्हते. आता शेवटी माहिती अधिकार कार्यकर्ते साकेत गोखले यांनी थेट रिझर्व्ह बँकेकडेच प्रश्न पाठवून याविषयी चौकशी केली होती. त्यांना पाठविलेल्या उत्तरात हे वास्तव उघड झाले आहे. रिझर्व्ह बँकेने त्यांना दिलेल्या उत्तरात 50 जणांची यादी जाहीर करुन 68 हजार 603 कोटी रुपयांची कर्जे माफ केल्याची कबुली दिली आहे. आता उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, सर्वाधिक कर्जमाफी मेहूल चोक्सीचीच आहे. त्याचे 5 हजार 492 कोटी रुपयांचे कर्ज माफ झाले आहे. त्याच्या अन्य दोन कंपन्यांचीही कर्जे सरकारने उदारहस्ते माफ केली आहेत. सध्या हा चोक्सी भारतातून पळाला असून त्याने अँटिगाचे नागरिकत्व स्वीकारले आहे. तर त्याचा पुतण्या नीरव मोदी हा देखील फरार असून लंडनमध्ये वास्तव्याला आहे. त्याशिवाय संदीप झुनझुनवाला याची 4 हजार 314 कोटी रुपये, जतिन मेहता याची 4 हजार 76 कोटी रुपयांची कर्जे माफ झाली आहेत. हे सर्व ई.डीच्या रडावर आहेत. असे असतानाही त्यांची कर्जे माफ होणे हे एक मोठे आश्चर्यच आहे. देशप्रेमाच्या नेहमीच गप्पा करणारे व 2014 सालच्या निवडणुकीत काळ्या पैशाच्या विरोधात मोहिम उघडणाऱ्या रामदेव बाबांच्या कंपनीच्या 2 हजार 212 कोटी रुपयांच्या कर्जालाही उदार मनाने माफी देण्यात आली आहे. रुची सोया ही कंपनी रामदेव बाबांच्या मालकीच्या कंपनीने ताब्यात घेतली होती. अर्थातच या कंपनीच्या कर्जाचीही जबाबदारी ताब्यात घेणाऱ्या रामदेव बाबांच्या कंपनीवर येते. मात्र बाबांनी राष्ट्राच्या हितासाठी ही कर्जे स्वत न फेडता त्याची जबाबदारी राष्ट्रावर टाकली व कर्जे माफ करुन घेतली. लंडनमध्ये सध्या वास्तव्यास असलेला किंगफिशरचा मालक विजय मल्या याचे एक कंपनीवरचे सुमारे दीड हजार कोटी रुपयांचे कर्जही माफ झाले आहे. एकूण 50 जणांच्या यादीतील सहा उद्योग हे देशातील हिरे व सोन्यांच्या दागिन्यांच्या व्यापाऱ्यांचे आहेत. तर अन्य कंपन्या या आय.टी. उर्जा, औषधे या उद्योगातील आहेत. रिझर्व्ह बँकेने ही कर्जे टेक्निकली राईट ऑफ केल्याचा उल्लेख केला आहे. याचा अर्थ जी कर्जे प्रदीर्घ काळ वसुल होत नाहीत, व ज्यांची वसुल होण्याची शक्यता मावळलेली असते अशी कर्जे टेक्निकली राईट ऑफ म्हणजेच माफ केली जातात. याचा अर्थ स्पष्ट आहे की, या कर्जाची वसुली होणारच नाही अशी कर्जे बँकांच्या बॅलन्स शीटमद्ये दाखविली जात नाहीत, मात्र बँका बसुलीसाठी प्रयत्न करतात. आजवरचा असा अनुभव आहे की, अशा प्रकारची राईट ऑफ केलेली कर्जे जेमतेम 20 टक्केच वसूल होतात. त्यामुळे ही राईट ऑफ हा तांत्रिक मुद्दा आहे. ही कर्जे माफच झालेली असतात. शेवटी सरकारवर उपकार म्हणून यातील काही रक्कम म्हणून फेडली जाते. अशा प्रकारे कर्जे माफ करणे हा जनतेच्या पैशाचा अपव्ययच आहे. जनता कराच्या रुपाने सरकारच्या तिजोरीत पैसा भरते तो जनतेचा पैसा आहे व त्याच विनिमय अशा प्रकारे करण्याचे टाळले पाहिजे. कारण यात जनतेची व बँक ठेवीधारकांचीही ही फसवणूक आहे. गेल्या काही महिन्यात पंजाब अँड महाराष्ट्र बँक, यस बँकेसारखी प्रकरणे ताजी असताना सरकारने यातील ठेवीधारकांना टांगत ठेवले आहे मात्र कर्जदारांची कर्जे मात्र मुक्तहस्ताने माफ केली आहेत. आता सरकारने मल्या, निरव मोदी, चोक्सी यांनी भारतात आणण्याचे नाटकही बंद करावे. त्यांना तेथेच राहू द्यावे. कारण आता त्यांची कर्जेच फेडली गेली आहेत तर त्यांना परत घेऊन आणून करायचे काय?

0 Response to "कर्जबुडव्यांना जीवदान"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel