योध्दा संन्यासी!
मंगळवार दि. 24 सप्टेंबर 2019 च्या अंकासाठी अग्रलेख-
----------------------------------------------
योध्दा संन्यासी!
ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची आगामी साहित्य संमेलनाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे एक तपस्वी धर्मगुरू, प्रभावी वक्ता, प्रतिभाशाली लेखक, द्रष्टा समाजचिंतक व व्यासंगी संपादक असे बहुस्तरीय व्यक्तिमत्त्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लाभले आहे. सध्या धर्मांध शक्ती डोके वर काढीत असताना फादर दिब्रिटोसारखा सर्वधर्मसमभाव मानणार्या लेखकाची निवड या पदावर होण्याला विशेष महत्व आहे. फ्रान्सिस दिब्रिटो असे नाव असलेले हे व्यक्तिमत्त्व अस्सल मराठमोळे आहे. ते कॅथॉलिकपंथीय ख्रिस्ती धर्मगुरू आहेत. त्यांचा जन्म वसई येथील मराठी ख्रिस्ती कुटुंबात झाला. लेखक म्हणून त्यांनी मराठीत विविध विषयांवर लेखन केले असले तरी त्यांची खरी ओळख ही पर्यावणाचे रक्षणकर्ते, गुंडशाहीविरोधात आवाज उठविणारे कार्यकर्ते, सुजाण, सजग आणि सामाजिक भान असलेले व्यक्तिमत्त्व म्हणूनच आहे. ते धर्मगुरू आहेत, पण त्यांचा धर्म हा चर्चपुरता मर्यादित नाही. सुवार्ता या मासिकाचे ते संपादक म्हणून प्रदीर्घ काळ काम पाहिले. हे मासिक फक्त ख्रिस्ती समाजापुरते मर्यादित न राहता मराठी साहित्यातही या मासिकाने आपला स्वतंत्र ठसा उमटविला. हरित वसई संरक्षण समितीच्या माध्यमातून दिब्रिटो यांनी पर्यावरण जतन, संरक्षण आणि संवर्धनाची मोठी चळवळ उभी केली. वसईतील राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि गुन्हेगारीचे राजकारण याच्या विरोधातही त्यांनी पुढाकार घेतला आणि मोहीम राबविली. पुणे येथे 1992 मध्ये झालेल्या पंधराव्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. तेजाची पाऊले, संघर्ष यात्रा ख्रिस्तभूमीची- इस्रायल आणि परिसराचा संघर्षमय इतिहास, आनंदाचे अंतरंग- मदर तेरेसा, सृजनाचा मोहोर, ओअॅसिसच्या शोधात ही पुस्तके त्यांची गाजली आहेत. सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि धार्मिक अशा विविध प्रकारच्या उपक्रमांतून त्यांनी स्वत:ला समाजाशी जोडून घेऊन वेळोवेळी आपल्या समाजधर्माचेही पालन केले आहे. त्यांचा जसा ख्रिस्ती साहित्याचा अभ्यास आहे तसा तुकाराम, रामदास या मराठमोठ्या संतावरील मोठा अभ्यास आहे. माझी मराठीचे बोलु कौतुके ही ज्ञानदेवांची अमृतवाणी व भाषांमाजि साजिरी मराठिया अशा फादर स्टीफनच्या मराठी महतीचा प्रभाव; संत ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ-नामदेवांचा भक्तिवारसा, ख्रिस्ती तत्ववेत्ते संत अगस्तीन, संत तेरेजा आणि बायबलमधील वैश्विक जीवनमूल्यावर पोसलेले सांस्कृतिक संचित घेऊन त्यांच्यातील लेखक माणसातील देवत्वाचा शोध घेत ते आजवर लिहीत राहिले आहेत. निसर्गप्रेमी आणि निसर्गातील दृश्याकडे मानवी दृष्टिकोनातून पाहणारे लेखक म्हणून त्यांची ओळख आहे, या दृष्टिकोनातूनच ते निसर्ग वाचतात. सृजनाचा मळा, तेजाची पाऊले या पुस्तकांत त्यांनी सहाही ऋतुची शब्दचित्रे रंगवली आहेत. हे लेख वाचून पु. ल. देशपांडे ह्यांनी ह्या ललितलेखांना वसईच्या मळ्याचा गंध येतो, असे गौरवोद्गार काढले होते. फादर फ्रान्सिस दिब्रिटो तीन वर्षे युरोपात वास्तव्यास होते तेथे त्यांनी ग्रेगरोयीन विद्यापीठात धर्मशास्राची एम.ए. ही पदवी मिळवली. तेथील विद्यापीठात धर्मशास्त्राचे शिक्षण घेत असतानाच, विद्यापीठाबाहेर लोकांमध्ये मिसळून ते लोकजीवनाचा अभ्यासही करीत होते. युरोपमधील चर्चमध्ये ते चर्चची कार्यपद्धती शिकले, तर लोकांच्या संपर्कातून त्यांनी तेथील कौटुंबिक, सामाजिक जीवन अनुभवले. महत्त्वाचे म्हणजे हे सारे ते भारतीय सांस्कृतिक दृष्टिकोनातून पाहत होते, अनुभवत होते. एकीकडे संप्पन्नता, प्रगतीची अतिउंच शिखरे त्यांनी पहिली, तर दुसरीकडे लोकांच्या वैयक्तिक संपर्कातून युरोपच्या आत्म्याला झालेल्या जखमाही पाहिल्या. डळमळीत झालेला विवाहसंस्थेचा पाया, कोलमडलेली कुटुंबव्यवस्था, तरुण पिढीतील बेजबाबदारपणा, व्यसन आणि त्यातून निर्माण झालेल्या शारीरिक, मानसिक समस्याही त्यांनी पाहिल्या. त्याचबरोबर युरोपात नवसमाजनिर्मितीसाठी वेगेवेगळे प्रयोग होत होते, त्याची ओळख फादरांना झाली. फादरांचा विशेष लक्षवेधी ग्रंथ म्हणजे 1200 पानांचा द्विखंडात्मक, सचित्र ग्रंथ- सुबोध बायबल. सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि धार्मिक अशा विविध प्रकारच्या उपक्रमांतून स्वतःला त्यांनी समाजाशी, अन्य धर्मीयांशी जोडून घेतले आहे. भारतीय समाजमनाने विविध धर्म आणि तत्वज्ञान याचा पुरस्कार केला आहे. त्यानुसार आपली बहुविधता आणि धर्ममूल्ये जपणारे भारतीयत्व साकार झाले आहे. गेल्या तीन चार दशकांत जगभर आणि देशभर धर्मांध शक्ती डोके वर काढत आहे, करुणेसाठी कलाम असलेला धर्म कौर्याचे हत्यार होत असल्याची खंत त्यांनी आपल्या परिवर्तनासाठी धर्म या पुस्तकात व्यक्त केली आहे. भारताची एकात्मता, संवाद आणि मैत्रीच्या आधारवर टिकून राहील, असा त्यांना ठाम विश्वास आहे. त्यासाठी वेगवेगळ्या उपक्रमांतून संवादासाठी वेगवेगळे प्रयोग ते राबवित असतात. त्यांचे अनेक अन्यधर्मीय व्यक्ती, संस्था, संघटना यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्या संवादी उपक्रमांना त्यांना चांगला प्रतिसादही मिळतो. समाजासाठी काम करणार्या अनेक संस्था, व्यक्ती, चळवळी या सर्वांना फादरांनी नेहमीच आपला कृतिशील पाठिंबा, प्रोत्साहन दिले आहे. ईशसेवेतून जनसेवा करण्याचे जीवनध्येय निश्चित करून ते ख्रिस्ताचे कामकरी बनले. देव केवळ देवळात नसून देवळाबाहेरच्या लोकांमध्ये आहे, या विचाराने प्रेरित होऊन ते जनसमूहांमध्ये देवाचा शोध घेत राहिले. व्यापक समाजाभिमुख भूमिका घेऊन त्यांनी भक्तीला कृतीची जोड दिली. अशा या योध्दा संन्याशाच्या साहित्यातील सर्वोच्च निवडीबद्दल आमच्या शुभेच्छा.
--------------------------------------------------------

0 Response to "योध्दा संन्यासी!"
टिप्पणी पोस्ट करा