-->
ओलाचिंब महाराष्ट्र

ओलाचिंब महाराष्ट्र

संपादकीय पान शुक्रवार दि. २३ सप्टेंबर २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------- 
ओलाचिंब महाराष्ट्र
गेल्या आठवडयापासून कोसळणार्‍या पावसाने आपली गुरुवारी जोरदार इनिंग सुरू ठेवली. गुरुवारी तर जुलै महिन्यासारखा पाऊस कोसळत होता. सप्टेंबर अखेर जवळ आला तरीही परतीचा पाऊस जात नसल्याने जनता वैतागली आहे. गेली दोन वर्षे राज्यातील जनता दुष्काळाने होरपळलेली असताना यंदा चांगला झालेला पाऊस ही एक मोठी दिलासादायक बाब निश्‍चित ठरली आहे. मात्र आता हा पाऊस कधी थांबणार अशी स्थिती आहे. अन्यथा सध्या चांगली तरारलेली अनेक पिके या पावसात कुजण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता ओला दुष्काळ पडण्याची भीती व्यक्त होऊ शकेल. रायगड जिल्ह्यात गुरुवारी सरासरी  १०१.९४  मि.मि. पावसाची नोंद झाली आहे.अंबा नदीत १०.२० हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग झाल्याने नदीकाठच्या गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे तर अलिबाग रामराज मार्गे रोहा मार्गावरील भातसई गावातील दोन तालुक्यांना जोडणारा पूल खचल्याने अलिबाग-रोहा मार्गावरील वाहतूक चणेरामार्गे वळविण्यात आली. सावित्री, कुंडलिका या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली नसल्याचे आपत्कालीन विभागाकडून सांगण्यात आले. मात्र नागोठण्यातील अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नागोठणे शहराच्या एस.टी. स्थानक, कोळीवाडा मरीमंदिर परिसरात पाणी शिरले. त्यामुळे मध्यरात्री साखरझोपेत असलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी झाडांसह घरांचीही पडझड झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यात सखल भागात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. तर अनेक ठिकाणी झाडे पडण्याच्या तक्रारीही आल्या. या सर्वांची परिणती म्हणून शाळा, महाविद्यालये लवकर सोडण्यात आली होती. गेल्या २४ तासांत रायगड जिल्ह्यात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्याच्या दुरवस्थेमुळे खड्‌ड्यांमध्ये पाणी साचलेे. येत्या २४ तासांत मुंबई व कोकणपट्टीत पावसाचा जोर आणखीन वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान खात्याचे अंदाज खरे होतातच असे नाही. मात्र सध्याचे पावसाळी वातावरण आहे ते थांबेल असे दिसत नाही. रस्ते जलमय झाल्याने देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबापुरीत वाहतुकीचा पार बोजवारा उडाला होता. अंधेरी, बोरिवली, वसई, नालासोपारा, विरार व पालघर मध्येही पावसाचा जोर कायम आहे. मध्य भारतासह अरबी समुद्रातील वातावरणीय बदलामुळे मुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर वाढतच आहे. तसेच बंगालच्या उपसागरात दक्षिण ओडिशा, उत्तर आंध्र प्रदेशाजवळ समुद्रसपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर असलेल्या चक्राकार वार्‍यामुळे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले होते. तसेच उत्तर पाकिस्तान व लगतच्या जम्मू-काश्मीर भागात चक्राकार वार्‍याची स्थिती कायम होती. त्यामुळे, राज्यात पावसाची रिपरिप सुरू होती. कुलाबा वेधशाळेतून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई शहरात ६८.९ मिलीमीटर, पूर्व उपनगरात ६९.७३ मिलीमीटर आणि पश्चिम उपनगरात ८८.६५ मिलीमीटर पाऊस पडला. मुंबईप्रमाणे ही स्थिती राज्यातील बहुतांशी भागात कायम होती. राज्यातील आठवड्यापूर्वी पावसाचा जोर वाढण्यास अनुकूल हवामान तयार झाले होतेे. बुधवारपासून कोकण, मध्य महाराष्ट्रात अति जोरदार तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला होता. त्यानुसार, गेल्या २४ तासांमध्ये कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुंदुर्ग या जिल्ह्यात अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडला. गेल्या आठवड्यापासून राज्यात सर्वदूर पावसाने दणक्यात हजेरी लावली आहे. पाण्याची टंचाई असलेल्या मराठवाड्यासह रब्बीच्या जिल्ह्यांमध्ये दमदार पाऊस पडला. तर घाटमाथ्यावर झालेल्या पावसाने धरणांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली. अनेक नद्याही दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. मॉन्सूनची अनुपगड, बिकानेर आणि जैसलमेरपर्यंतची सीमा अद्यापही कायम असून, परतीचा प्रवास मंदावल्याने मान्सूनचा मुक्काम वाढला आहे. बंगालच्या उपसागरात ओडिशा, आंध्र प्रदेश आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत तर गुजरात आणि परिसरावरही ५.८ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वार्‍यांची स्थिती आहे. महाराष्ट्र, गुजरातच्या किनार्‍यासह कोकण, उत्तर महाराष्ट्रात ढगांची दाटी कायम आहे तर विदर्भ, आंध्र प्रदेशासह बंगालच्या उपसागरात ढग जमा झाले आहेत. कोकणात, येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्रात अति जोरदार, तर मराठवाड्यात आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मराठवाडयात गुरुवारी अनेक भागांत विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाने हजेरी लावली. मराठवाडयात सर्वत्र पाऊस होत असल्याने विष्णुपुरी बंधार्‍यात पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे बुधवारी बंधार्‍याचे दोन गेट उघडण्यात आले. एक गेट सकाळी बंद करण्यात आले तर एक गेट उघडे ठेवण्यात आले. बंधार्‍यात पाण्याची आवक सुरू असून तेवढेच पाणी गोदावरी नदीच्या पात्रात सोडले जात आहे. त्यामुळे गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी चांगलीच वाढली आहे. रहाटी, सोमेश्वर, जैतापूर परिसरात विजेच्या कडकडाटासह सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. नाळेश्वर, रहाटी येथे नदीला पूर आल्याने काही काळ या गावाचा संपर्क तुटला. अशी कोकणातील जवळजवळ प्रत्येक गावात स्थिती आहे. त्यामुळे एकीकडे तुफान पाऊस, रस्त्याची दयनिय अवस्था, नदी नाले दुथडी भरुन वाहात आहेत अशा स्थितीत लोकांचे जीवन अतिशय हालाखीचे झाले आहे. आज महाराष्ट्र ओलाचिंब भिजला ही सुखकारक गोष्ट असली तरीही आता पावसाला बस म्हणण्याची वेळ आली आहे. कारण नुकतेच आपण दुष्काळातून बाहेर आलो आहोत आता ओल्या दुष्काळाचे तरी सावट नको.
-----------------------------------------------------------------

0 Response to "ओलाचिंब महाराष्ट्र"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel