-->
भारत माता की जय....

भारत माता की जय....

रविवार दि. २० मार्च २०१६ च्या मोहोरसाठी लेख --
-------------------------------------------
भारत माता की जय....
-------------------------------------
एन्ट्रो- विधानसभा निवडणुकात यश मिळवायचे असल्यास हिंदू-मुस्लीम दुही तीव्र करणे, हाच एक उपाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे आहे आणि म्हणूनच राष्ट्रभक्ती वा राष्ट्रविरोधी हा खेळ सुरू केला आहे. या खेळाची पहिली रंगीत तालिम जेे.एन.यू.मध्ये झाली. आता पाच राज्यांच्या निमित्ताने ही खेळ या राज्यात खेळली जाणार आहे. तर एम.आय.एम.ला देखील आपले अस्तित्व टिकविण्याची धडपड करायची आहे. हैद्रराबादमध्ये जीथे त्यांचा जन्म झाला तेथील नगरपालिका त्यांच्या ताब्यातून गेली आहे. आपण देशव्यापी पक्ष आहोत असे त्यांना भासवायचे आहे त्यामुळे संपूर्ण देशात त्यांना पाय रोवण्यासाठी मुस्लिम मते आपल्याबाजूने एकवटावी लागणार आहेत. त्यासाठी त्यांची ही सर्व धडपड आहे...
----------------------------------------
भारत माता की जय... असे कोणाही भारतीयाच्या तोंडात उत्सर्त्फतपणे यावे असेच उद्दगार आहेत. प्रत्येक जण याचा अभिमानाने उल्लेख करतो. खासदार जावेद अख्तर यांनी नुकत्याच आपल्या राज्यसभेतील निवृत्तीच्या भाषणात याचा वारंवार उल्लेख करुन असे न म्हणणार्‍यांना एक प्रकारे धडाच दिला आहे. परंतु अख्तर यांचे हे भाषण पूर्णपणे न ऐकता अर्धवटच सांगितले जात आहे. कारण त्यांनी हिंदू-मुस्लिम यांच्यातील दोन्ही धर्मांध शक्तींचा निषेध केला आहे. आज नेमके हेच घडत आहे. आपल्याकडे धर्मांध शक्ती एवढ्या मोठ्या प्रमाणावर डोके वर काढीत आहेत की, त्यांना मतांचे राजकारण करुन धार्मिक धुव्रीकरण करुन निवडणुका जिंकायच्या आहेत. सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन या दोन्ही धर्माचे राजकारण करणार्‍या संघटना परस्परविरोधी उभ्या ठाकल्या आहेत. निमित्त आहे ते भारत माता की जयचा जयघोष करण्यावरुन. एम.आय.एम.च्या ओवेसी यांनी तर माझ्या मानेवर तलवार ठेवली तरी मी भारत माता की जय बोलणार नाही असे म्हणून या आगीत आणखी तेल ओतले. याचे पडसाद राज्यविधानसभेत उमटले. परिणामी विधानसभेच्या कामकाजाला बुधवारी धर्मयुद्धाचेच स्वरूप आले. भाजपच्या आमदारांनी एमआयएम आमदारांच्या आसनासमोरच घोषणाबाजी करत गोंधळ घातला. या गोंधळात पठाण यांना अधिवेशनाचा कालावधी संपेपर्यंत निलंबित करण्यात आले. राज्य सरकारने स्मारकांवर खर्च करण्याऐवजी हा निधी रुग्णालये उभारण्यासाठी वापरावा, अशी सूचना एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी करताच सत्ताधारी युतीच्या सदस्यांनी त्यास आक्षेप घेतला. भारतमाता की जय म्हणण्यास नकार देणार्‍यांकडून नेत्यांच्या स्मारकाला विरोध केला जात असल्याचा मुद्दा भाजपचे आमदार राम कदम यांनी उपस्थित केला. त्यावरून सभागृहात गोंधळ सुरू झाला. भारतमाता की जय म्हणण्याची घटनेमध्ये तरतूद नाही याकडे एमआयएमचे दुसरे आमदार वारिस पठाण यांनी लक्ष वेधले. पठाण यांच्या वक्तव्यावरून गदारोळ वाढत गेला. पठाण यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांनी सुरू केली. गोंधळामुळे कामकाज तहकूब करण्यात आले असता भाजपचे आशीष शेलार, मेधा कुलकर्णी आदी सदस्यांनी जलील आणि पठाण यांच्या आसनासमोर उभे राहून भारतमाता की जय अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. थोडयाच वेळात भाजपच्या अन्य आमदारांनी या दोन्ही आमदारांना घेरले. वातावरण कमालीचे तापले असताना एमआयएमच्या दोन्ही सदस्यांनी संयम बाळगल्याने पुढील अनर्थ टळला. या दोघांकडून काही प्रतिक्रिया व्यक्त केली गेली असती तर सभागृहात हाणामारीच झाली असती. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, भास्कर जाधव यांनी भाजप आमदारांना आवरण्याचा प्रयत्न केला. ओवेसी यांच्या जहाल वक्तव्याने सारा अल्पसंख्याक समाज लक्ष्य होऊ नये, अशी अपेक्षा कॉंग्रेसचे अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केली. त्यानंतर अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली भारतमातेबद्दल अनादर व्यक्त केल्याबद्दल वारिस पठाण यांचे सदस्यत्व अधिवेशनाचा कालावधी संपेपर्यंत निलंबित करण्यात यावे, असा ठराव संसदीय कार्य राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी मांडला आणि सभागृहाने तो मंजूर केला. भारत माता की जय म्हणण्यास घटनेने सांगितलेले नाही वा देशप्रेम व्यक्त करण्याची हा एकमेव निकष नाही ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. परंतु भारत माता की जय म्हटल्याने आपले काही नुकसानही होत नाही. मात्र धर्मांधतेचे खूळ डोक्यात घेतलेल्यावर सकारात्मक बाबी काही दिसतच नाहीत. भाजपा सत्तेत आल्यापासून सर्वधर्मसमभाव कसा मोडीत काढता येईल त्याची पध्दतशीरररित्या आखणी केली जात आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात जीना जी भूमिका मांडत तीच भूमीका आज ओवेसी मांडताना दिसत आहेत. तर सेक्युलर म्हणवणारी कॉँग्रेसही आज या घटनांकडे हतबल होऊन पाहाताना दिसत आहे. मध्यंतरी सिनेमागृतही अशीच घटना घडली होती. देशातील एकूणच वातावरण गढूळ करायचे आणि सेक्युलरपणा किती बोगस आहे हे दाखवून देण्याचा संघाचा डाव आहे. परंतु याच सेक्युलरवादाच्या आधारावर आपण देशात एकजूट टिकवून आहोत. केवळ हिंदुत्वाचे राजकारण करुन आपला देश एकसंघ राहू शकत नाही. आज आपल्या शेजारचे नेपाळ, बांगलादेश हे धर्माच्या आधारावर असलेले देश सेक्युलर होत आहेत आणि आपल्याकडे हिंदुत्वाचे राजकारण पेटवून सेक्युलर राजकारण संपविले जात आहे. आता आपल्याकडे आगामी पाच राज्यात निवडणुका येऊ घातल्या आहेत. यातील तीन राज्यात मुस्लिम मते ही महत्वाची ठरणार आहेत. त्यामुळे ओवेसींना मुस्लिम मतांचे धुव्रीकरण करण्याची आवश्यकता वाटत आहे तर दुसर्‍या बाजूला संघालाही मुस्लिम मते एकवटल्यास त्याल उत्तर म्हणून हिंदुंची मते एकगठ्ठा भाजपाला पडावयास हवी आहेत. यासाठीच सध्या भडकाभडकावीची भाषा सुरु आहे. पुढील वर्षी होणार्‍या उत्तरप्रदेशाच्या निवडणुकांमध्ये तर या राजकारणाचा उच्चांक गाठला जाईल. मोदी सरकार सत्तेवर येऊन दोन वर्षे पुरी होत आलेली असताना अच्छे दिन काही अजून जनतेला अनुभवायला मिळालेले नाहीत. महागाई, दुष्काळ या प्रश्‍नांनी तर जनता आता होरपळते आहे. देशातील जनतेच्या जीव्हाळ्याच्या प्रश्‍नांची सोडवणूक करण्यास मोदी सरकारला अपयश आले आहे. अशा वेळी राज्यातील विधानसभा निवडणुकात यश मिळवायचे असल्यास हिंदू-मुस्लीम दुही तीव्र करणे, हाच एक उपाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे आहे आणि म्हणूनच राष्ट्रभक्ती वा राष्ट्रविरोधी हा खेळ सुरू केला आहे. या खेळाची पहिली रंगीत तालिम जेे.एन.यू.मध्ये झाली. आता पाच राज्यांच्या निमित्ताने ही खेळ या राज्यात खेळली जाणार आहे. जर भारतमाता की जय हा राष्ट्रभक्तीचा निकष ठरवत असेल, तर आम्ही भारतीय राज्यघटना प्रमाण मानत असूनही, आम्हाला राष्ट्रविरोधी ठरवून पाकला जा, असे सांगितले जात असेल, तर आम्ही ते सहन करणार नाही, ही भूमिका असदुद्दिन ओवेसी घेत आहेत. त्यांच्यावर संघाचे व भाजपाचे नेते तुटून पडत आहेत. त्याला तेवढ्याच आवेशाने ओवेसी व इतर उत्तरे देत आहेत. ओवेसी यांचा सारा प्रयत्न संघाचा बागुलबुवा दाखवून मुस्लिमांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा आहे व हा प्रयत्न म्हणजे मुस्लीम जमातवादाचा आम्ही सांगत आहोत तोच धोका प्रत्यक्षात येत असल्याचा पुरावा आहे. एम.आय.एम.ला देखील आपले अस्तित्व टिकविण्याची धडपड करायची आहे. हैद्रराबादमध्ये जीथे त्यांचा जन्म झाला तेथील नगरपालिका त्यांच्या ताब्यातून गेली आहे. आपण देशव्यापी पक्ष आहोत असे त्यांना भासवायचे आहे त्यामुळे संपूर्ण देशात त्यांना पाय रोवण्यासाठी मुस्लिम मते आपल्याबाजूने एकवटावी लागणार आहेत. त्यासाठी त्यांची ही सर्व धडपड आहे.
---------------------------------------------------------------

0 Response to "भारत माता की जय...."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel