-->
संपादकीय पान बुधवार दि. ५ फेब्रुवारी २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
---------------------------------------
दक्षिणेतील राजकीय स्फोट
-------------------------------
तामीळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या अण्णा द्रवीड मुनेत्र कळघम या पक्षाने भारतीय कम्युनिस्ट पक्षाशी अनपेक्षितरित्या आगामी लोकसभा निवडणुकांसाठी आघाडी करण्याचा निर्णय घेतला. त्यापाठोपाठ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जनरल सेक्रेटरी प्रकाश करात यांची त्यांनी भेट घेतली. अनपेक्षित अशा या दक्षिणेतील या स्फोटामुळे देशपातळीवर मोठे राजकीय स्फोट होण्याची शक्यता आहे. मात्र सध्या प्रसारमाध्यमांना फक्त मोदी पुराणच आळवायचे असल्याने त्यांना या नव्या आघाडीचे महत्व पटलेले नाही, हे आपल्याकडील माध्यमांच्या राजकीय अपरिपक्वतेचे उत्तम उदाहरण ठरावे. जयललीता व भारतीय कम्युनिस्ट पक्षात जो समझोता झाला आहे त्यामुळे देशाच्या राजकारणाची दिशा बदलण्याची चिन्हे आहेत. कारण जयललिता या अलिकडेपर्यंत भाजपाच्या गोटात होत्या आणि त्यांना नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावे असे वाटत होते. परंतु गेल्या सहा महिन्यांपासून त्यांनी मोदी यांच्याबाबत मौन पाळले होते. जयललीता आणि त्यांचा पक्ष आपल्याबरोबर आहे असे समजून भाजपांनी त्यांच्या वाट्याचे ३० ते ३५ खासदार आपल्या गटात आहेत असे मानले होते आणि भाजपाप्रणित सर्व आघाडीची गणिते मांडली होती. मात्र भाजपाची आता गणिते चुकणार आहेत. भाजपा समर्थक म्हणतील जयललीता भाजपाबरोबर नाहीत म्हणजे फारसा काही फरक पडणार नाही. परंतु असे समजणे मूर्खपणाचे ठरेल. भाजपा जेवढी दिल्ली काबीज केल्याची जी हवा तयार करीत आहे ती पूर्णपणे पोकळ आहे. कारण त्यांना आपल्याबरोबर एक-एक खासदार सत्ता मिळविण्यासाठी जोडावा लागणार आहे. दक्षिणेत त्यांना एकही जागा मिळणार नाही. जयललिता हाच त्यांचा मोठा आधार होता. केरळात भाजपाने कधीच मूळ धरलेले नाही. तेथे एकदा डावे किंवा कॉँग्रेसप्रणित अशा आघाड्या सत्तेवर आलटून पालटून सत्तेत येत असतात. भाजपाला दक्षिणेत चंचूप्रवेश फक्त मिळाला होता तो कर्नाटकात. मात्र तिथेही येडूयुरोप्पा यांच्या भ्रष्टाचारी राजवटीमुळे तेथील सत्ता गमवावी लागली. आता त्याच येडूयुरोप्पा यांना भाजपाने पुन्हा पक्षात घेतले आहे. त्यामुळे भ्रष्टाचार्‍यांचे समर्थन करणारा पक्ष अशी प्रतिमा भाजपाची व नरेंद्र मोदी यांची झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर जयललीता यांनी भाजपाची साथ सोडण्याला फार महत्व आहे. तामीळनाडूतील जनता ही देखील नेहमीच जयललीता किंवा करुणानिधी यांच्या मागे अलटून पालटून राहिली आहे. तेथे भाजपा वा कॉँग्रेस ही नाममात्र आहे. कम्युनिस्टांचे काही निवडक ठिकाणी बालेकिल्ले आहेत. आता त्यांच्या बरोबर जयललीता असल्याने या बालेकिल्ल्यांना बळकटी येईल. त्याहून सर्वात महत्वाचा मूद्दा म्हणजे, जयललीतांच्या या अनपेक्षित आगमनामुळे तिसरी आघाडी मजबूत होण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. गेले काही दिवस तिसरी आघाडी निष्प्रभ झाल्याचे अनेक राजकीय पंडित भाष्य करीत होते. मात्र त्यांचे हे भाष्य खोटे ठरु लागणार आहे. कारण जयललीता यांच्या प्रवेशाने तिसर्‍या आघाडीच्या बांधणीला वेग येणार हे नक्की. सध्या या आघाडीच्या सोबत असलेल्या ११ विविध पक्षांकडे ९२ खासदार आहेत. जनता दल(संयुक्त), बिजू जनता दल, जनता दल(एस.) हे या आघाडीत पहिल्यापासून आहेतच. जयललीता यांनी आपली पंतप्रधानपदाची सुप्त इच्छा कधी व्यक्त केलेली नाही. त्या मोदींसारखी देशातील जनतेची माथी भडकाविणारी भाषणे करीत फिरत नाहीत. परंतु आता त्या पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत सावधपणे उतरल्या आहेत. त्यामुळे बिगर कॉँग्रेसी, बिगर भाजपा आघाडी मजबूत होण्याचा मार्ग खुला झाला आहे. नरेंद्र मोदी यांना आपण प्रसारमाध्यमांच्या जोरावर व जनतेची माथी भडकाविणारी भाषणे करुन सत्तेवर येऊ असे जे स्वप्न उराशी बाळगले आहे ते आता भंग पावण्यास मदत होईल. त्याबरोबर आम आदमी पक्ष हा देखील कॉँग्रेस व भाजपाच्या विरोधात उभा ठाकल्याने त्याचा फटका या दोन पक्षांना बसणे हे ओघात आलेच. गेल्या दहा वर्षात कॉँग्रेस पक्षाने कोणतेही जनतेची ठोस कामे केलेली नसल्याने जनता कॉँग्रेस व त्यांच्या आघाडीतील पक्षांच्या जबरदस्त विरोधात आहे. त्यामुळे यावेळी जनमताचा मोठा रेटा कॉँग्रेस विरोधात जाणार आहे. अलीकडेच झालेल्या चार राज्यातल्या निवडणुकात त्याचे प्रतिबिंब उमटले आहे. अशा वेळी आपल्याला सत्तेची संधी मिळेल असे भाजपाला वाटू लागले आहे. नरेंद्र मोदी यांनी आपल्याला दिल्लीत सत्तास्थानी बसता यावे यासाठी मोठ्या प्रमाणात थैल्या रिकाम्या करुन भांडवली राजकाराणाचा रंग दाखविण्यास सुरुवात केली आहे. परंतु केवळ पैशाच्या व प्रसारमाध्यमांच्या जोरावर निवडणुका जिंकता येत नाहीत हे मोदी यांनी लक्षात घ्यावे. जनतेने अनेकदा आपल्याकडे मत पेट्यातून क्रांती करुन दाखविली आहे. यातूनच अनेकदा धनशक्तीचा पराभव आणि जनशक्तीचा विजय झाला आहे. अशाच घटना आपल्या लोकशाहीच्या सकारात्मक बाजू दाखवितात. २००९ साली जर भाजपाने चांगले काम केले होते तर खरे तर त्यांच्याच नेतृत्वाखालील आघाडी पुन्हा सत्तेत यायला पाहिजे होती. म्हणजे कॉँग्रेस व भाजपा हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. अशा स्थितीत तिसर्‍या आघाडीला चांगले दिवस येण्याची चिन्हे आहेत. जयललीता या मुरलेल्या राजकारणी आहेत. तामीळनाडूचे लोकप्रिय नेते एम.जी.रामचंद्रम यांच्या हाताखाली त्यांनी राजकारणाचे धडे घेतले आहेत. त्यांना पंतप्रधान होण्याची मोदींसारखी घाई नाही. परंतु कासवाच्या गतीने त्यांची पंतप्रधानपदाच्या दिशेने पावले पडत आहेत. यातूनच तिसरी आघाडी मजबूत होण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
---------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel