-->
दीदींचे विश्वासू हेच क्वालिफिकेशन-मुकुल रॉय

दीदींचे विश्वासू हेच क्वालिफिकेशन-मुकुल रॉय

दीदींचे विश्वासू हेच क्वालिफिकेशन-मुकुल रॉय

 प्रसाद केरकर, मुंबई   (23/03/12) PRATIMA

 वाचकांना आठवत नसेलही, परंतु ममतादीदी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदी आरूढ झाल्यावर 11 जुलै 2011 रोजी त्यांच्या जागी रेल्वेमंत्रिपदी मुकुल रॉय यांची नियुक्ती झाली होती. रॉय यांचा शपथविधी झाल्यानंतर लगेचच आसाममध्ये गुवाहाटी-पुरी एक्स्प्रेसला झालेल्या अपघातस्थळाची पाहणी करण्यास जाण्याचे आदेश त्यांना पंतप्रधानांनी दिले. मात्र, पंतप्रधानांचा हा आदेश धुडकावून रॉय यांनी घटनास्थळी जाण्यास नकार दिला. याचा परिणाम असा झाला की, त्यांना दुस-याच दिवशी पंतप्रधानांनी मंत्रिमंडळातून डच्चू दिला आणि रॉय यांचे मंत्रिपद गेले. मात्र, आता पुन्हा एकदा त्यांच्याकडे रेल्वेमंत्रिपद चालून आले आहे. दुर्दैव असे की, बिचा-या पंतप्रधानांनाही त्यांना आता पुन्हा एकदा रेल्वेमंत्री म्हणून स्वीकारावे लागले आहे. त्यांची या रेल्वेमंत्रिपदी नियुक्ती होण्यामागे एकमेव कारण आहे ते म्हणजे ममतादीदींचे एक विश्वासू म्हणून ओळखले जातात. दिनेश त्रिवेदींनी दीदींचे न ऐकता रेल्वेची भाडेवाढ केल्याने आता नवीन रेल्वेमंत्री आपल्या पूर्णपणे विश्वासातलाच असावा याची खबरदारी दीदींनी घेतल्याने मुकुल रॉय यांना पुन्हा एकदा रेल्वेमंत्रिपदाची लॉटरी लागली. दुर्दैव असे की, आता पुन्हा त्यांचा शपथविधी झाल्यावर लगेचच उत्तर प्रदेशात रेल्वेचा एक भीषण अपघात झाला.   
 मुकुल रॉय हे काही सुरुवातीपासून राजकारणी नव्हते. मात्र, ममतादीदींनी तृणमूल कॉँग्रेसची स्थापना केल्यापासून ते त्यांच्यासमवेत आहेनत. त्यापूर्वी ते कोणत्याही पक्षात नव्हते. मात्र, ते समाजकारणात सक्रिय होते. ममतादीदींनी सिंगूर व नंदीग्रामचा लढा सुरू केला त्यात रॉय हे आघाडीवर होते. खरे तर तिथूनच त्यांचा अनेकांना परिचय झाला. 17 एप्रिल 1954 मध्ये नॉर्थ 24 परगणा जिल्ह्यात कंचरपारा येथे जन्मलेल्या मुकुल यांचे शालेय शिक्षणही तेथेच झाले. शालेय अभ्यासापेक्षा त्यांचा जास्त ओढा नाटकात कामे करण्यात तसेच आंतरशालेय विविध स्पर्धांत सहभागी होण्याकडे जास्त होता. त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर महाविद्यालयात त्यांनी प्रवेश केला खरा, परंतु त्यांचे अभ्यासात काही लक्ष लागत नव्हते. बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी बी. एस्सी.ला प्रवेश घेतला. मात्र, त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण न करताच अर्धवट मध्येच सोडले. साहित्य, मोफत शालेय शिक्षण, नागरी संरक्षण या क्षेत्रात कामे करण्यास सुरुवात केली. 1980 मध्ये त्यांचा विवाह झाला. कृष्णा रॉय या त्यांच्या पत्नीदेखील त्यांच्याबरोबर समाजकार्यात सक्रिय आहेत. आंतरशालेय विज्ञान प्रदर्शने भरवण्यात मुकुल रॉय यांनी पश्चिम बंगालमध्ये प्रथम सुरुवात केली. राजकारण हा त्यांचा काही पिंड नव्हता, परंतु ममतादीदींचा त्यांच्यावर प्रभाव पडला आणि ते राजकारणात ओढले गेले. युनायटेड बँक ऑफ इंडिया या सरकारी बँकेच्या संचालकपदी ते सामाजिक कार्यकर्ते म्हणून 2002 ते 2005 होते. राज्यसभेवर त्यांची नियुक्ती एप्रिल 2006 मध्ये झाली. त्याच वर्षी गृहमंत्रालयाच्या सल्लागार समितीवर त्यांची नियुक्ती झाली. फुटबॉलचे चाहते असलेले मुकुल रॉय हे आता रेल्वेचा कारभार कसा हाकतात ते पाहायचे.  
prasadkerkar73@gmail.com

0 Response to "दीदींचे विश्वासू हेच क्वालिफिकेशन-मुकुल रॉय"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel