सरकारच्या नाकर्तेपणामुळे वादाच्या भोवर्यात नायर
सरकारच्या नाकर्तेपणामुळे वादाच्या भोवर्यात नायर
Published on 04 Feb-2012 PRATIMA
Published on 04 Feb-2012 PRATIMA
प्रसाद केरकर, मुंबई |
| देशाची सर्वात महत्त्वाची अंतराळ संशोधन संस्था ‘इस्रो’चे माजी अध्यक्ष प्रा. जी. माधवन नायर हे सरकारच्या नाकर्तेपणामुळे विनाकारण वादाच्या भोवर्यात अडकले आहेत. नामवंत अंतराळ संशोधक व एक सज्जन माणूस म्हणून नायर यांच्यावर सरकारने गरज नसताना शरसंधान साधले. सरकारने वादग्रस्त ठरलेल्या अँँट्रिक्स-देवास करारावरून नायर व त्यांच्या तीन सहकार्यांना कोणतेही सरकारी पद स्वीकारण्यास मनाई करण्यात आली तसेच नायर यांची प्राध्यपकपदावरून हकालपट्टीही करण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘इस्रो’मध्ये कार्यरत असलेल्या मल्याळी विरुद्ध तामिळ संशोधकांच्या लॉबीतून हे प्रकरण उद्भवल्याचीही चर्चा आहे. यामागचे राजकारण काहीही असले तरी नायर यांच्यासारख्या नामवंत शास्त्रज्ञाची अवहेलना सरकारी पातळीवर झाली हे काही देशाला शोभा देणारे निश्चितच नाही. यातून सरकारची इज्जत वेशीला टांगली गेली. नायर यांचा जन्म 31 ऑक्टोबर 1943 रोजी केरळातील थिरुअनंतपुरमजवळील नेय्यतीकरना येथे झाला. त्यांचे सुरुवातीला शालेय शिक्षण याच गावात झाले. त्यानंतर उच्च शालेय शिक्षण कन्याकुमारी जिल्ह्यात झाले. केरळ विद्यापीठाशी संलग्न असलेल्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून त्यांनी 1966 मध्ये अभियांत्रिकीत बी. एस्सी. केले. त्यांनी इलेक्ट्रिकल व कम्युनिकेशन अभियांत्रिकी या विषयात विशेष प्रावीण्य मिळविले होते. पदवी संपादन केल्यावर ते मुंबईत भाभा अँटोमिक रिसर्च सेंटरमध्ये प्रशिक्षिणार्थी म्हणून दाखल झाले. तेथे काही काळ काम केल्यावर संशोधक वृत्तीचे असलेल्या नायर यांचा प्रामुख्याने ओढा अंतराळ संशोधनाकडे होता. त्यामुळे त्यांनी 1967 मध्ये अंतराळ संशोधनाच्या केंद्रात जाण्याचे ठरविले. त्यांचा हा निर्णय अचूक होता. कारण यात त्यांचे उत्कृष्ट करिअर झाले आणि इस्रो या अंतराळ संशोधन केंद्राच्या प्रमुखपदापर्यंत पोहोचले. उपग्रह प्रक्षेपण व्हेइकल्सच्या निर्मितीत त्यांनी मोलाची कामगिरी केली आहे. त्यांच्या या क्षेत्रातील संशोधनामुळे आपला देश यात स्वयंपूर्ण झाला. अंतराळ संशोधनात तसेच उपग्रह निर्मिती यात त्यांनी व त्यांच्या नेतृत्त्वाखाली संशोधकांच्या टीमने मोलाचे संशोधन केले आहे. त्यांच्या या संशोधनामुळेच भारत या क्षेत्रात जगात आघाडीवर आला. एक प्रकल्प संचालक म्हणून भारतीय उपग्रह प्रक्षेपण करणारे पीएसएलव्ही हे त्यांच्या संशोधनाचे फळ आहे. इस्त्रोचे संचालक व विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे प्रमुख म्हणून त्यांनी जीएसएलव्ही हे विकसित केले. जीएसएलव्हीचे इंजिन विकसित करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. आपल्याकडील जनतेला अंतराळ संशोधनाचा कसा फायदा होईल व त्यादृष्टीने संशोधन करण्याचा त्यांचा नेहमीच दृष्टिकोन राहिला आहे. इस्रोचे नेतृत्त्व त्यांच्याकडे असलेल्या काळात देशाने अंतराळ संशोधनाचे विविध 27 प्रकल्प पूर्णत्वाला नेले. देशाला गरजेच्या असलेल्या अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर आम जनतेला होण्यासाठी त्यांच्या कारकीर्दीत अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले आणि ते त्यांनी यशस्वी करून दाखविले. त्यांच्याच अध्यक्षपदाच्या काळात देशाने चांद्रयान मोहीम राबविली. त्यांनी देशातील दूरसंचार जाळे मजबूत होण्यासाठी अनेक उपग्रह अंतराळात सोडले. त्याचबरोबर त्यांनी इस्रोचे अध्यक्ष म्हणून भारत अंतराळात कोणते संशोधन करू शकतो याची पुढील काळासाठी एक आखणी तयार करून ठेवली. देशाने विकसित केलेले अंतराळ संशोधन सर्वसामान्य जनतेच्या कामी कसे येईल हे त्यांनी पाहिले. 2003 ते 2009 या काळात ते इस्रोचे अध्यक्ष होते. त्यापूर्वी 1999 ते 2003 या काळात ते विक्रम साराभाई अंतराळ संशोधन केंद्राचे ते संचालक होते. 2010 मध्ये सरकारने त्यांची नियुक्ती सेंटर फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंटच्या अध्यक्षपदी केली. अंतराळ संशोधनात भारत सरकारच्या वतीने त्यांनी अनेकदा अन्य देशांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली आणि त्यात भारताचे यशस्वी नेतृत्व केले. फ्रान्स, रशिया, ब्राझील, इस्रायल या देशांशी त्यांनी केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून यशस्वी चर्चा केली. नायर यांच्या संशोधन कार्यातील ही अजोड कामगिरी लक्षात घेऊन सरकारी तसेच निमसकारी पातळीवरचे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. 1998 मध्ये सरकारने त्यांना पद्मभूषण व 2009 मध्ये पद्मविभूषण हे सन्मान देऊन गौरविले. याशिवाय त्यांना देशातील अनेक नामवंत पुरस्कार मिळाले. अशा या महान शास्त्रज्ञाला पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री व्ही. नारायणस्वामी यांनी बेजबाबदारपणे फतवा काढून अतिशय अपमानास्पद वागणूक दिली आहे. त्यामुळे एकूणच सर्वच संशोधकांमध्ये नाराजीचा सूर उमटणे स्वाभाविक होते. prasadkerkar73@gmail.com |


0 Response to "सरकारच्या नाकर्तेपणामुळे वादाच्या भोवर्यात नायर"
टिप्पणी पोस्ट करा