-->
गुंतवणुकीसाठी भारतच जगात उत्कृष्ट

गुंतवणुकीसाठी भारतच जगात उत्कृष्ट

गुंतवणुकीसाठी भारतच जगात उत्कृष्ट
 Published on 02 Feb-2012 EDIT PAGE ARTICLE
सध्या डावोस येथे सुरू असलेल्या ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या परिषदेत जागतिक पातळीवर भारत हाच देश गुंतवणुकीसाठी सर्वाधिक आकर्षक असल्याचा कौल मिळाला आहे.‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ची ही बैठक दरवर्षी डावोस येथे आयोजित केली जाते. अर्थतज्ज्ञ, वित्तीय सल्लागार, उद्योगपती व विविध सरकारी अधिकारी या जागतिक ‘आर्थिक कुंभमेळ्याला’ दरवर्षी आवर्जून उपस्थित राहतात. येथे विविध आर्थिक विषयांवर ऊहापोह केला जातो तसेच जागतिक पातळीवरील विविध प्रश्नांवर चर्चा केली जाते. त्यामुळे या परिषदेत व्यक्त होणार्‍या मतांना विशेष महत्त्व प्राप्त होते. या परिषदेत जगाने आपली आर्थिक वाटचाल कशी करावी याचा रोडमॅप तयार केला जातो. त्यामुळे यात व्यक्त होणार्‍या मतांकडे अनेक सरकारे टक लावून असतात. आपल्याकडे सुमारे दोन दशकांपूर्वी आर्थिक उदारीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आणि आपण विदेशी गुंतवणूक खेचण्याच्या स्पर्धेत ओढले गेलो. विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यात आपली सर्वात पहिली मोठी स्पर्धा चीनशी असते. खरे तर चीनने तब्बल दहा वर्षे आपल्या अगोदर आर्थिक उदारीकरणाची प्रक्रिया सुरू केली होती. उशिरा का होईना, भारत या स्पर्धेत उतरल्यावर चीनला आपल्याशी याबाबत स्पर्धा करावी लागली. अन्यथा तोपर्यंत चीनने अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांना आपल्या देशात गुंतवणूक करण्यासाठी वळवले होते. गुंतवणूकदारांचा विचार करता आशिया खंडात गुंतवणूक करताना चीन की भारत असा पर्याय उपलब्ध झाला. आता भारत यात सरस ठरला आहे. 
2011 मध्ये आशिया खंडात सर्वाधिक विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यात भारत यशस्वी ठरला. या काळात भारतात 50 अब्ज डॉलरहून जास्त थेट विदेशी गुंतवणूक झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ सुमारे 13 टक्के आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत भारतात 25 टक्क्यांनी प्रकल्पांची संख्या वाढली. तसेच गेल्या वर्षी 884 प्रकल्पांचे काम सुरू झाले. आपल्याकडे प्रत्यक्ष मंजुरी मिळाल्यानंतर प्रकल्पाचे काम सुरू होण्यास बराच विलंब लागतो अशी टीका केली जाते. परंतु एवढय़ा संख्येने प्रकल्पांचे काम सुरू झाल्याची ही आकडेवारी थक्क करणारी आहे. त्यामुळेच या परिषदेत बहुतांशी गुंतवणूकदारांनी म्हणजे 70 टक्के कंपन्यांनी भारतात गुंतवणूक करण्याबाबत विश्वास व्यक्त केला. त्याचबरोबर येथे केलेल्या एका पाहणीनुसार, 382 बहुराष्ट्रीय कंपन्यांनी भारतात विस्तार करण्याबाबत अनुकूलता दर्शवली आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की भविष्यातही गुंतवणुकीचा ओघ चालूच राहण्याची चिन्हे आहेत. भारताने हे कसे काय करून दाखवले, असा प्रश्न उपस्थित होईल. मात्र चीनच्या तुलनेत आपल्याकडे अनेक जमेच्या बाजू आहेत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आपल्याकडे लोकशाही आहे. त्यामुळे आपल्याकडे कायद्याची निश्चित चौकट आहे. चीनकडे या दोन्ही गोष्टींचा अभाव आहे. विदेशी गुंतवणूकदार याकडेच प्रामुख्याने आकर्षिला जातो. कारण गुंतवणूकदार कंपन्या या प्रामुख्याने विकसित देशातल्या असल्याने लोकशाहीला महत्त्व देतात. त्याच्या जोडीला आपल्याकडे इंग्रजीचा प्रभाव आहे. 
बहुतांश जनता इंग्रजी बोलते, लिहिते. तसेच आपल्याकडे प्रशिक्षित कर्मचारी वर्गापासून, कामगार ते अधिकारीवर्ग मोठय़ा संख्येने उपलब्ध आहे. हा कर्मचारी वर्ग जागतिक पातळीच्या दर्जाचा असला तरी त्याला मिळणारे वेतन कमी आहे. साधा कामगार तर जगातील वेतन लक्षात घेता अतिशय स्वस्तात उपलब्ध आहे. या जशा आपल्या जमेच्या बाजू आहेत तशा काही नकारात्मक बाजूही आहेत. यातील सर्वात पहिली बाब म्हणजे आपल्याकडे पायाभूत सुविधांचा असलेला अभाव. रस्ते, वीज या मूलभूत सुविधा पुरवण्यात आपण कमी पडतो. त्याचबरोबर आपल्याकडे पारदर्शकतेचा असलेला अभाव. त्यामुळे अनेकदा गुंतवणूकदार नाराज होतो. तसेच आपल्याकडे सरकारी धोरण गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचे असले तरी नोकरशाहीचा अजूनही पगडा आहे. त्यामुळे अनेकदा प्रकल्पांना विलंब होतो. तसेच सरकार विरोधी पक्षांना आपल्यासोबत घेऊन एकमत करण्यास कमी पडते. त्यामुळे अनेकदा निर्णय गुंडाळावे लागले आहेत. अगदी ताजे उदाहरण द्यावयाचे झाल्यास रिटेल उद्योगात 100 टक्के विदेशी गुंतवणुकीस परवानगी देण्याचा निर्णय सरकारने घेतला खरा; परंतु विरोधकांनी विरोध केल्याने त्यांना हा निर्णय बासनात गुंडाळावा लागला. पर्यावरणवाद्यांचा आजवर अनेक प्रकल्पांना विरोध झाल्याने त्याचे नकारात्मक पडसाद उमटत असतात. अशा घटना घडल्यावर विदेशी गुंतवणूकदार बिथरतो. मात्र या नकारात्मक घटनांकडे गुंतवणूकदाराने सध्या तरी दुर्लक्ष केलेले दिसते. त्यामुळेच विदेशी गुंतवणूकदाराची पावले भारताच्या दिशेने वळलेली आहेत.

0 Response to "गुंतवणुकीसाठी भारतच जगात उत्कृष्ट"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel