-->
बाजारपेठेचे ऑनलाइन जागतिकीकरण

बाजारपेठेचे ऑनलाइन जागतिकीकरण

बाजारपेठेचे ऑनलाइन जागतिकीकरण
 Published on 01 Feb-2012 EDIT
 गेल्या दोन दशकांत आपल्याकडे प्रामुख्याने आर्थिक उदारीकरणाचे युग सुरू झाल्यापासून विविध प्रकारच्या बाजारपेठांमध्ये मोठे बदल घडत गेले. पारंपरिक खरेदीच्या संकल्पनांना शह देत शहरात मॉल संस्कृतीने मूळ धरल्याने ग्राहकांना एकाच जागी सर्व वस्तू माफक किमतीला उपलब्ध होऊ लागल्या. त्यापूर्वी आपल्याकडे खरेदीचे ब्रँडही मोजके होते. त्यामुळे ग्राहकांपुढे खरेदीचा र्मयादित पर्याय होता. आता मात्र देशी-विदेशी ब्रँडची एकच भाऊगर्दी ग्राहक राजापुढे झाली आणि त्याला खरेदीचा मोठा पर्याय खुला झाला. मग ती खरेदी साध्या शर्टाची असो की मोटारीची. जगातले ब्रँड आपल्या बाजारपेठेत येऊन थडकले. मॉलमुळे किराणा दुकानदार संपुष्टात येईल हा अंदाजही खोटा ठरला. किराणा दुकानदारांची संख्या कमी झालेली असली तरी शहरातही हा दुकानदार ग्राहकांच्या सेवेत आहेच. शहरी मध्यमवर्गीयांसाठी अगदी ‘विंडो शॉपिंग’ पासून प्रत्यक्ष खरेदी आणि चित्रपट पाहण्यासाठी मल्टिप्लेक्स या सगळ्यासाठीच मॉलची वारी हे एक उत्कृष्ट स्थळ ठरू लागले. प्रत्यक्ष खरेदीच्या या बाजारपेठेत अशा प्रकारे आमूलाग्र बदल होत असताना ऑनलाइन खरेदीची बाजारपेठही आता खुलू लागली आहे. सुरुवातीला दोन दशकांपूर्वी ऑनलाइन खरेदीकडे फारसा ग्राहक खेचला जाणार नाही असा अंदाज होता. कारण खरेदी करण्याची ज्यांची ‘मानसिकता’ असते, त्यांना ऑनलाइनमध्ये खरेदीत दुकानातील खरेदीचा ‘आनंद’ लुटता येणार नाही, असे त्यांचे म्हणणे होते. कारण आवडीनिवडीनुसार प्रत्यक्ष माल पाहून खरेदी करणे, किमतीत घासाघीस करणे हे ऑनलाइन खरेदीत शक्य नसते. परंतु हा अंदाजही आता खोटा ठरवून ऑनलाइनचा व्यवसाय गेल्या काही वर्षांत बहरू लागला आहे. देशात 2010 मध्ये असलेला एकूण ऑनलाइनचा 31 हजार कोटी रुपयांचा व्यवसाय आता 2011 मध्ये तब्बल 46 हजार कोटी रुपयांवर पोहोचला आहे. भविष्यात हा व्यवसाय आणखी झपाट्याने वाढेल असे अंदाजाचे पतंग बदवले जात आहेत. एखादा उद्योग वाढू लागला की त्या क्षेत्राविषयी गुलाबी चित्र रंगवण्यात सल्लागार कंपन्यांत नेहमीच चढाओढ लागते. असेच अंदाज ऑनलाइन व्यवसायाबाबत 2000 मध्ये बांधण्यात आले होते. ऑनलाइन बाजारपेठ हीच भविष्यातील खरेदीची एक मोठी बाजारपेठ असेल असे अंदाज बांधल्याने अनेकांनी यात आपले भविष्य अजमावण्यासाठी डॉट कॉम कंपन्या स्थापल्या. प्रत्येक वस्तू ऑनलाइन मिळण्याची व्यवस्था झाली. पण ग्राहक कुठे होता? डॉट कॉम कंपन्यांनी आपली दुकाने जरूर थाटली, पण त्याकडे ग्राहकांनी पूर्णपणे पाठ फिरवली. परिणामी डॉट कॉम कंपन्यांचा हा फुगा फुटला आणि या बहुतांश सगळ्याच कंपन्यांवर दिवाळे काढण्याची पाळी आली. अर्थात ही स्थिती केवळ आपल्याकडेच नव्हती तर जगात होती. डॉट कॉमचा हा फुगा फुटण्यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे मुळातच इंटरनेटचा वापर आपल्याकडे त्या वेळी र्मयादित होता. 2000 मध्ये आपल्याकडे इंटरनेटचा वापर महानगरांपुरताच होता आणि इंटरनेटचे ग्राहकही लाखात होते. त्या काळी इंटरनेटचा मासिक खर्चही जास्त होता. त्यामुळे इंटरनेट घरोघरी पोहोचले नव्हते तर त्याचा वापर कार्यालयांपुरताच र्मयादित होता. आता मात्र परिस्थिती झपाट्याने बदलली आहे. आता आपल्याकडे इंटरनेटचे ग्राहक दहा कोटींवर पोहोचले आहेत. तसेच इंटरनेटचा प्रसार आपल्या देशात सरासरी तीस टक्क्यांनी वाढत चालला आहे. ग्रामीण भागात इंटरनेटचा प्रसार कमी असला तरी शहरी भागात 17 टक्के लोकसंख्या इंटरनेटचा ग्राहक आहे. छोट्या व मध्यम आकारातील शहरांत आता इंटरनेटचा वापर झपाट्याने वाढत चालला आहे हे विशेष. त्यामुळेच ऑनलाइन खरेदीचा ओघ वाढत चालला आहे. डॉट कॉम कंपन्यांचा फुगा फुटल्यावर बी टू बी म्हणजे कंपन्यांचा परस्परातील ऑनलाइन खरेदी-विक्री व्यवहार हळूहळू मूळ धरू लागला होता. कंपन्यांना अशा प्रकारे व्यवहार करण्यात अनेक फायदे होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वेळेची बचत जशी यामुळे होत होती तशी किमतीत कपात होत असल्याने अनेक कंपन्यांनी हा मार्ग चोखाळला. मात्र प्रत्यक्ष ग्राहकाने ऑनलाइन खरेदी करण्याला वेग येऊ लागला तो गेल्या पाच वर्षात. यात प्रवासाच्या तिकिटांची खरेदी, पुस्तकांची खरेदी यांची ऑनलाइन खरेदी वाढली आहे. इंटरनेटचा प्रसार जसा होत जाईल तसा ऑनलाइन खरेदीकडे ग्राहक जास्त वळणार हे नक्की. डॉट कॉम कंपन्यांचा फुगा फुटल्यावर हा उद्योग संपला असे म्हणणारे आता खोटे ठरत आहेत. ऑनलाइन खरेदीत ग्राहकाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तो घरात किंवा कार्यालयात बसून आपली खरेदी काही क्षणांत करू शकतो. मुंबई, दिल्लीसारख्या महानगरांतील ग्राहकांना खरेदीत जाणारा वेळ यातून काही प्रमाणात वाचवता येईल. यातून प्रत्यक्ष खरेदीची बाजारपेठ संपुष्टात येईल असे म्हणणे चुकीचे ठरेल. कारण सध्या आपल्या देशातील बाजारपेठेचा आवाका पाहता त्यात ऑनलाइन खरेदीचा वाटा फार नगण्य आहे. उलट यातून आपली बाजारपेठ विस्तारतच जाणार आहे. पुस्तकांची ऑनलाइन खरेदी सुरू झाल्याने पुस्तक विक्रीची दुकाने बंद पडतील असे नाही. अमेरिकेत आता प्रत्यक्ष वृत्तपत्रे खरेदी करण्यापेक्षा ऑनलाइन खरेदी करण्याकडे कल वाढला आहे. मात्र वृत्तपत्राचा वाचक कमी झालेला नाही. फक्त त्याने आपले वृत्तपत्र वाचण्याचे तंत्र अधिक अत्याधुनिक केले आहे. ऑनलाइन खरेदीमुळे आपल्यासारख्या अवाढव्य देशात दूरवर पसरलेल्या ग्राहकाला अशा प्रकारे खरेदी करण्याची सुविधा एका क्लिकवर उपलब्ध झाली आहे. ऑनलाइन बाजारपेठेवर मक्तेदारी प्रस्थापित करण्याचे बड्या व्यापारी कंपन्यांचे कॉर्पाेरेट प्रयत्न चालू आहेत. पण याच इंटरनेटमुळे प्रत्येक कारागिराला आणि ग्राहकाला त्याच्या त्याच्या इच्छेनुसार वस्तू, पुस्तक, वृत्तपत्र वा कोणतीही सेवा प्राप्त करणे शक्य होत आहे. त्यामुळेच कॉर्पाेरेट मक्तेदारी प्रस्थापित होणे शक्य नाही. मोबाइल, अँड्रॉइड, आयपॅड इत्यादी नव्या सॉफ्टवेअर सायबर तंत्रज्ञानामुळे ऑनलाइन बाजारपेठ हीच नव्या युगाची ऐहिक ओळख असणार आहे. अर्थातच ऑनलाइन खरेदीमुळे बाजारपेठ संकुचित होणार नाही तर ती विस्तारत जाणार आहे. 

0 Response to "बाजारपेठेचे ऑनलाइन जागतिकीकरण"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel