-->
वातावरणातील बदल काय दर्शवितात?

वातावरणातील बदल काय दर्शवितात?

दि. 19 मार्चच्या मोहोरसाठी चिंतन वातावरणातील बदल काय दर्शवितात? यंदा फेब्रुवारी महिन्यात आजवरच्या तापमानाचा उच्चांक नोंदविला गेला. हा एक स्थापन झालेला विक्रमच म्हणावा लागेल. त्याअगोदर सात मार्च रोजी मुंबईसह राज्यातील अनेक भागात विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस पडला. महाराष्ट्रात या पावसाने केळी, द्राक्ष व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले. हे सर्व काही अनपेक्षीतच असे होते. अर्थात गेल्या काही वर्षात अशा प्रकारे अवकाळी पाऊस पडणे, उन्हाळा कडक पडणे किंवा थंडीचे प्रमाण वाढणे ही बाब वारंवार घडत आहे. याचा जगाला असलेला धोका अजून कोणी गांभीर्याने घेतलेला नाही, ही सर्वात जास्त गंभीर बाब आहे. तापमान, पाऊस, आर्द्रता इ. च्या वैज्ञानिक नोंदी जगात अलिकडे म्हणजे शे-दिडशे वर्षांपासुन ठेवल्या जाऊ लागल्या. आता जो आकडा दिला जातो त्यापेक्षा प्रत्यक्ष अनुभवलेले तापमान ३ ते ५ डि. से ने जास्तच असते. या फेब्रुवारीत म्हणूनच ४० ते ४५ चा जाळ अनुभवला. आता जे घडत आहे ते शे-दिडशे वर्षांतील ऐतिहासिक नसून पृथ्वीच्या कोट्यावधी वर्षांच्या इतिहासातील हा अभूतपूर्व कालखंड आहे. मानवाने निसर्गाची जी हानी गेल्या काही वर्षात केली आहे त्याचेच हे पडसाद उमटत आहेत. मुंबई व देशातील मोठ्या महानगरातील वायुप्रदूषणाबाबत सतत बोलले जाते. माध्यमांतून वैज्ञानिक संस्थांची आकडेवारी फेकली जाते. मात्र शहरात रोज काही हजार टन कार्बन उत्सर्जन करणारे, मोटार हे सर्वात मुख्य कारण आहे ही गोष्ट लपवली जाते. शहरातील सुमारे ५० लाख मोटारींची वायुप्रदूषणात आणि त्यामुळेच विक्रमी तापमानात गुन्हेगारी स्वरूपाची भूमिका आहे. परंतु मोटारीचे प्राणघातक आकर्षण आणि तिला अर्थव्यवस्थेचे प्रतीक बनवल्यामुळे हा निखारा मुठीत लपवला जात आहे. आजपर्यंत आपण सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करुन लोकांना सुविधा देण्याचा व पर्यायाने प्रदूषण कमी करण्याचा विचार कधी केलाच नाही. उलट वाहन उद्योग वाढतोय त्यातून रोजगार निर्मीती होतेय यावर जास्त भर दिला गेला. हे सर्व गणितच चुकीचे होते, हे आता दिसतेय. त्याचबरोबर गेल्या काही वर्षात आपण सिमेंटच्या रस्त्ये भारण्याचा आपण सपाटा लावलाय. एकच रस्ता पुन्हा पुन्हा फोडला व बनवला जात आहे. यापूर्वी पदपथ अशा रितीने उखडुन पुन्हा बनवले जात होते आणि आता रस्ते. सीमेंच्या रस्त्याच्या उभारणीमुळे आपल्याकडे उष्णता वाढीस लागली आहे. परंतु हे रस्ते बांधले की किमान वीस वर्षे चिंता नाही असे लक्षात आपल्यावर आपण हा धोका स्वीकारु लागलो आहोत. परंतु जे रस्ते पूर्वी डांबरीकरणातून ब्रिटीशांच्या काळात बांधले गेले होते ते आजही उत्कृष्ट स्थितीत आहेत. मग सध्याचेच डंबरी रस्ते का खराब होतात असा सवाल आहे. सीमेंटच्या रस्त्यांची हजारो कोटी खर्चाची टूम कुणाचे खोके भरण्यासाठी आहे? यातुन मुंबईची चाळण केली जात आहे. नागरिक धूळ आणि इतर समस्यांमुळे हैराण झाले आहेत परिणामी छातीत प्रदूषण भरून घेऊन जीव मुठीत धरून नागरिक यंत्रवत जगत आहेत. प्रदूषणाची निर्मिती जेथून होते ते उत्पादन थांबवले पाहिजे. केवळ उर्जास्त्रोताबद्दल बोलून काही होणार नाही. उदा. पेट्रोल - डिझेल जाळण्याऐवजी मोटार वीजेवर नेली. आता त्यामुळे औष्णिक वीजनिर्मितीत अधिक कोळसा जाळला जाऊ लागला. पृथ्वीच्या वातावरणात जाणाऱ्या कार्बन डाय ऑक्साईड वायूपैकी सुमारे ७५ टक्के उत्सर्जनास वाहने कारणीत आहेत. मोटारींव्दारे वार्षिक ४००० कोटी टन उत्सर्जनापैकी ४० चार म्हणजे सुमारे १६०० कोटी टन कार्बन डाय ऑक्साईड वायूचे उत्सर्जन होते. एका मोटारीच्या निर्मितीस सुमारे १,५०,००० लिटर पाणी लागते. त्यावर उपाय म्हणजे मोटारीचा वापर कमी किंवा बंद करणे हा आहे. परंतु हे कुणाला आवडणार नाही, परंतु नागरिकांना हा कडू घोट घ्यावाच लागेल. हीच गोष्ट बांधकामाबाबत आहे. सायन- माहीम ते कुलाबा ही मूळ बेटांची मुंबई, भूकंपप्रवणतेच्या दृष्टीने अतिधोकादायक चौथ्या प्रवर्गात येते. भविष्यात इकडे कोणताही धोका होऊ शकतो. सीमेंट काँक्रीट बांधकामात मानवजातीची कबर खोदली जात आहे. एक टन काँक्रीट बनताना सुमारे एक टन कार्बन डाय ऑक्साईड वायू वातावरणात सोडला जातो आणि या प्रक्रियेत सुमारे २००० टन पाणी वापरले जाते. पृथ्वीच्या प्रदीर्घ तपस्येने घडलेली जीवसृष्टी व जडण- घडण मानवाच्या निर्जिव विकासात क्षणोक्षणी नष्ट होत आहे. सीमेंट, काँक्रीटसाठी चुनखडी, वाळू, दगड इ. साहित्यासाठी डोंगर, जंगल तोडले जाते. राडा, रोडा सागर खाड्यांमधे भरला जातो. यात जैव विविधतेचा व नदी झऱ्यांचा नाश होतो. सीमेंट निर्माणात दर वर्षी पृथ्वीच्या वातावरणात सुमारे ४०० कोटी टन कार्बन डाय ऑक्साईड वायूची भर पडते. मोटारीचा व सीमेंटीकरण काँक्रीटीकरण व टॉवर्स बांधणीशी संबंध आहे. विकासाच्या नावाने शहरांची सततची बांधकामे व ग्रामीण भागांचे शहरीकरण यामुळे पृथ्वीवरील लाखो चौरस किलोमीटर क्षेत्र काँक्रीटखाली येत आहे. भूपृष्ठाची रचना, भूजल वहन मोडले जात आहे. जीवसृष्टी व त्यातही मातीशी जोडलेले जीव, सुप्तावस्थेत जाणारे प्राणी गाडले जात आहेत. हे पृथ्वीची कबर बांधणे आहे. आपल्याला अस्तित्व देणाऱ्या पृथ्वीशी द्रोह आहे. याची किंमत मानवजातीचे उच्चाटन व मानवजातीची सामूहिक आत्महत्या आहे. प्रदूषणाचा विचार करताना हवा, पाणी व मातीच्या प्रदूषणाचा आणि मुंबई, लंडन, न्ययॉर्क असा वेगवेगळा विचार केला जातो, हे चूक आहे. पृथ्वी तुकड्यांत काम करत नाही. ती समग्रतेने काम करणारी एकसंघ सेंद्रीय कार्यपद्धती आहे. प्राणवायू, पाणी व अन्न हे पृथ्वीने सृजन केलेल्या सजीवांसाठी आहे. परंतु मानवाने निर्माण केलेल्या मोटार, विमान जहाजे, टीव्ही, फ्रीज, काँप्युटर इ. निर्जिव यंत्रांसाठी व वीज, सीमेंट, पोलाद, प्लास्टिक, फायबर अशा हजारो कृत्रिम उत्पादनांसाठी नाही, जी पृथ्वीवर अपरिवर्तनीय बदल व अक्षम्य हानी करतात. सुशिक्षित माणसे भ्रमात आहेत. भौतिक विकास हा शुद्ध मूर्खपणा आहे. याच विकासातून माणूस आपला घात करुन घेत आहे. सध्या होत असलेले वातावरणातील मोठे बदल हेच दर्शवितात.

0 Response to "वातावरणातील बदल काय दर्शवितात?"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel