-->
जोशीमठचा इशारा

जोशीमठचा इशारा

दि. 15 जानेवारीच्या मोहोरसाठी चिंतन
जोशीमठचा इशारा उत्तराखंडातील जोशीमठ या छोट्याश्या शहरात संपूर्ण देशाला हादरा देणारी व भविष्यात साधानगिरीचा इशारा देणारी घटना घडली आहे. येथील घरांना ११ जानेवारी रोजी तडे गेले. काही ठिकाणी लहान तडे होते तर काही ठिकाणी मोठे होते. सध्या तरी प्रशासनाने एकूण दीडशेहून जास्त कुटुंबांना सुरक्षिततेची उपयोजना म्हणून दुसरीकडे हलविले आहे. मात्र हे संपूर्ण शहर व आजूबाजूचा सर्व परिसर सध्या दहशतीच्या वातावरणात आहे. आज जोशीमठात झाले ते नजिकच्या काळात या परिसरातील शेजारच्या शहरात-गावात कधीही होऊ शकते. त्यामुळे येथील नागरिक जीव मुठीत घेऊन सध्या आपले आयुष्य जगत आहेत. उत्तराखंडातील चमोली जिल्ह्यातील जोशीमठ हे ६१०७ फूट उंचावरील एक छोटेसे शहर आहे. जेमतेम २३ हजार लोकवस्तीचे हे शहर असले तरी येथे पर्यटक, भक्तगण, लष्कराचे जवान यांचा मोठा वावर असतो. या शहरात हॉटेल्स, रिसॉर्ट, बाजारपेठा याची धूम असते. पर्यटकांची रेलचेल असते. लष्कराचे जवान व इंडो-तिबेटियन सीमा पोलिस यांचाही वावर असतो. त्यामुळे हे केवळ पर्यटन स्थळच नाही तर सुरक्षिततेचेही एक महत्वाचे केंद्र आहे. १९६२ सालच्या चीनच्या युध्दानंतर जोशीमठ हे शहर प्रामुख्याने लष्कराच्या दृष्टीकोनातून महत्वाचे ठरु लागले कारण चीन सीमेवरुन जाणाऱ्या गावांसाठी याच गावातून रस्ता जातो. त्याचबरोबर हिंदूंच्या बद्रीनाथ, शिखांच्या हेमकुंड साहिब या धार्मिक स्थळांसाठी हे गाव प्रवेशव्दार समजले जाते. युनोस्कोने येथील व्हॅली ऑफ फ्लॉवर्सला जागतिक हेरिटेज दर्जा दिला आहे. त्यामुळे जोशीमठ या शहराला विविध अंगांनी महत्व प्राप्त झाले आहे. गेल्या चार-पाच दशकात त्यामुळे येथील हालचाली वाढू लागल्या. त्यामुळेच येथे झालेली अनेक बांधकामे, अर्थातच नियमबाह्य बांधकामे हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. येथील जमीनीला व घरांना तडे जाण्याचे प्रकार २०२१ साली सर्वात प्रथम सुरु झाला आणि आता तर परिस्थिती भीषण म्हणण्यासारखी झाली आहे. मुळात हे शहर भूकंपप्रवण क्षेत्रात म्हणजे पाचव्या झोनमध्ये मोडते. हे गाव काही शतकांपूर्वी पूर्वी झालेल्या भूसखलानंतरच्या दगडांवर काही प्रमाणात वसवले गेले आहे. येथील हवामान देखील टोकाचे असते. पावसाळ्यात येथे तुफान पाऊस कोसळतो तर थंडीत मरणाची थंडी पडते. उत्तराखंड डिझास्टर मॅनेजमेंटच्या एका अहवालानुसार, ऑक्टोबर २०२१ च्या पावसाळ्यात इकडे एवढा जबरदस्त पाऊस पडला होता की, २४ तासात १९० मीमी पाऊस कोसळला होता. यात अनेक ठिकाणी भूस्खलन झाले होते. त्यानंतर खरे तर सरकराला जाग येमे अपेक्षीत होते, परंतु तसे काही झाले नाही. १९७६ साली एका सरकारी समितीने येथील अनधिकृत बांधकामांसंबंधी इशारा दिला होता, परंतु त्याकडे कोणी लक्ष दिले नव्हते. साठीच्या दशकात येथे धरणे बांधू नये असा इशारा दिला असताना येथे लहान व मध्यम आकाराची शंभर धरणे बांधण्यात आली आहेत. येथील वृक्षतोड होऊ नये यासाठी चिपको आंदोलन ८०च्या दशकात झाल होते, परंतु काही काळाने याकडेही कुणी लक्ष देईनात व हे प्रश्न गंभीर होत गेले. विविध समित्यांनी येथे काय होऊ शकते याचे जे इशारे दिले होते, तेच नेमके आता प्रतिबिंबित होत आहे. त्यामुळे आजवर विविध समित्यांनी दिलेले इशारे न पाळल्याने किंवा शासकीय पातळीवर याचे गांभीर्य न घेतल्याने जोशीमठची आजची अवस्था निर्माण झाली आहे. येथील जनता येथे उभारल्या जाणाऱ्या एन.टी.पी.सी.च्या जलविद्युत प्रकल्पाला दोष देते. येथे हा प्रकल्प उभारणे चुकीचे होते, परंतु केवळ हेच कारण या घटनेमागे कारणीभूत नाही तर गेल्या चार दशकातील आपणच केलेल्या अनेक चुका कराणीभूत आहेत. निसर्गाच्या समतोलाचे भान न ठेवता विकास जर केला तर त्याचे काय परिणाम होतात हे आपण आता या निमित्ताने पाहतच आहोत. येथे काही काळापूर्वी जोशीमठ बचाव समिती स्थापन झाली होती आणि त्यांनी सुचविलेल्या अनेक सूचना सरकराने कधी लक्षातच घेतल्या नाहीत. येथून जाणारा सहा किमी लांबीचा चार धामचा बायपास रस्ताही अनेक टीकांचा धनी झाला आहे. या रस्त्यासाठी सरकारने येथील डोंगर, दऱ्या कापण्यास परवानगी दिली. या रस्त्यामुळे येथील पर्यटन वाढेल व परिणामी येथील उत्पन्न वाढेल असे गणित मांडले गेले तरीही येथील पर्यावरणच धोक्यात आले आहे. ८२५ किमी लांबींच्या चार धाम यात्रा रस्ता प्रकल्प हा नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. कारण हा रस्ता करताना पर्यावरणीय बाबींचा विचार करण्यात आला नाही. या रस्त्याच्या उभारणीत अनेक झाडांची कत्तल करण्यात आली व अनेक डोंगरांनाही छाटण्यात आले आहे. याला अनेकांनी आक्षेप घेतले होते, परंतु त्याकडे पूर्णत दुर्लक्ष करण्यात आले. आता निसर्ग आपला राग जोशीमठातून व्यक्त करीत आहे असे म्हटल्यास काही वावगे ठरणार नाही. आज जोशीमठ येथे झाले आहे परंतु आपल्याकडे पर्यावरणाच्या समतोलाचा विचार न करता विकास साधला गेल्याने अशा घटना देशाच्या बऱ्याच भागात होऊ शकतात. अगदी देशाचे आर्थिक केंद्र असलेली मुंबई देखील असाच एका उंबरठ्यावर उभी आहे. एका अभ्यासानुसार मुंबईसह किनारपट्टीवरील अनेक शहरे, गावांमध्ये येत्या तीन दशकांनतर पाणी शिरण्याचा धोका आहे. समुद्राची पाण्याची पातळी धीमेगतीने वाढत चालली आहेच. परंतु हा धोका गंभीरतेने आत्तापासून घेतल्यास ही किनारपट्टी वाचविता येऊ शकेल. परंतु जोशीमठकडे दुर्लक्ष झाले आहे तसेच याचे झाले आहे.

0 Response to "जोशीमठचा इशारा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel