-->
भाजपा विरुध्द नाराजी

भाजपा विरुध्द नाराजी

बुधवार दि. 25 डिसेंबर 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
----------------------------------------------
भाजपा विरुध्द नाराजी
गेल्या तीन वर्षात केंद्रात सत्तेत असलेल्या व देश भगवा करु पाहाणार्‍या भारतीय जनता पक्षाने सातपैकी पाच राज्ये गमावली आहेत. केंद्रात भाजपाची पुन्हा सत्ता आली असली तरी त्यांना राज्यात विविध ठिकाणी आपली सत्ता काही टिकविता आलेली नाही. झारखंडचे सोमवारी आलेले निकाल पाहता भाजपाची घसरगुंडी सुरु झाली असून त्यांना भविष्यातही जनाधार गमवावा लागणार अशीच चिन्हे दिसत आहेत. नागरिकत्व कायदा, रामजन्मभूमी निकाल या पार्श्‍वभूमीवर झारखंडाची निवडणूक झाली होती. त्यामुळे या निकालांना फार महत्व होते. एकूणच महाराष्ट्र हे महत्वाचे राज्य गमावल्यावर भाजपाला राष्ट्रीय राजकारणात मोठा फटका सहन करावा लागत आहे. यावेळी झारखंडची निवडणूक भाजपाने प्रतिष्ठेची केली होती. नेहमीप्रमाणे पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचे झंझावती दौरे व त्यांच्यासोबत पैशाच्या थैल्या याचा मुक्त वापर येथे होता. नेहमीप्रमाणे चॅनेल्सही भाजपाच्या बाजूनेच प्रचार करीत होती. मात्र जनतेच्या मनातून भाजपाला धडा शिकवायचा होता. शेवटी भाजपाला तेथे सत्ता गमवावी लागली आहे. झारखंडमध्ये ऑल झारखंड स्टुडेंट्स युनियन पार्टी अर्थात आजसू सत्ताधारी पक्षातून बाहेर पडल्याचा मोठा फटका भाजपला बसला आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्ष झामुमो, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दला महाआघाडी करत एकत्रित आल्याने मतांची विभागणी टाळली गेली. त्यांनी भाजापाविरोधी जनमतेची मोट बांधली व विजयश्री खेचून आणली. भाजपसारखा आक्रमक प्रचार न करता घराघरात जाऊन प्रचार मोहिम कॉँगरेस-झामुमोने राबवली, त्याचे नेतृत्व हेमंत सोरेन यांनी केले. मे महिन्यात लोकसभा निवडणुकीत भाजपला राज्यात 51 टक्के मते पडली होती. याच्या बळावर भाजपा उड्या मारत होती, परंतु त्यांची सर्व गणिते चुकली. लोकसभेची मते त्यांना सात महिनेही टिकविता आली नाहीत. खरे तर भाजपने 54 विधानसभा मतदार संघांमध्ये पकड मजबूत केली होती. 35 विधानसभा जागांमध्ये भाजपची आघाडी 50 हजारांहून अधिक होती. यातील 16 विधानसभा जागांवर आघाडीचा फरक 90 हजारांपेक्षा जास्त होता. भाजपने राज्यातील 14 पैकी 11 लोकसभा जागा मिळवल्या होत्या. आजसूला यातील एक जागा मिळाली होती. त्यामुळेच, विधानसभा निवडणुकीत भाजपला परत सत्तेवर येण्याची मोठी आशा होती. मात्र नेमके उलटे झाले व विधानसभा निवडणुकीत भाजपची मतांची टक्केवारी 10 टक्क्यांनी घसरली. त्याचबरोबर कुर्मी-कोयरीसह अनेक मागासवर्गीय आणि दलितांची साथ असलेले आजसू पक्ष भाजपपासून वेगळे झाले. त्यामुळे भाजपची मतांची टक्केवारी आणखी 8 टक्क्यांनी घसरली आहे, शेवटी भाजपाचा मतांची टक्केवारीचा आकडा 33 वर घसरला. राज्यात मागासवर्ग बहुल 26 विधानसभा मतदार संघांमध्ये भाजपने सत्ता स्थापित केली होती. परंतु, आता याच भागांमध्ये पक्षाला सर्वात मोठे नुकसान झाले आहे. जमशेदपूर पूर्वमध्ये बेकायदेशीर 86 वस्त्या कायदेशीर करण्याचा प्रश्‍न इतका तापला की मुख्यमंत्री रघुवर दास यांच्या पायाखालची जणु जमीनच सरकली. आश्‍वासने देऊन सुद्धा ते या वस्तीच्या लोकांना न्याय देऊ शकले नाही. त्यामुळेच, भाजपमधून बंडखोरी करून अपक्ष लढणारे सरयू राय त्यांना वरचढ ठरले. जल-जंगल-जमीन या मु्द्यावर आदिवासी भाजप सरकारवर नाराज होते. राज्यामध्ये औद्योगिक प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात जमीनी सरकारी ताब्यात घेण्यात आल्या. याच जमीनींना आदिवासी कित्येक दशकांपासून आपल्या जमीनी मानत होते. छोटा नागपूर टेनेंसी अ‍ॅक्ट आणि संथाल परगणा टेनेंसी अ‍ॅक्टमध्ये सरकारने दुरुस्तीच्या हालचाली सुरू केल्या होत्या. आपल्या जमिनी उद्योगासाठी वापल्या जातील असा आदिवासींना समज होता. मोठ्या प्रमाणात विरोध झाल्यानंतर कायद्यात सुधारणा झाली नाही. तरीही आदिवासी सरकारवर नाराज झाले. अनुसूचित जमातींसाठी सुरक्षित 28 जागांमध्ये 20 झामुमो-काँग्रेसला मिळाल्या आहेत. भाजपला या ठिकाणी 5 जागांचे नुकसान झाले. झामुमो-काँग्रेस-राजद आघाडीची घोषणा आधीच करून जागा वाटप झाले आणि निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली. तर भाजप-आजसू युती निवडणुकीच्या घोषणेनंतर तुटली. आजसू गेली पाच वर्षे भाजपसोबत सत्तेवर होते. जागा वाटपावर झालेल्या वादानंतर आजसूने वेगळी चूल मांडण्याचा निर्णय घेतला होता. एवढेच नव्हे, तर भाजपने आपलेच माजी मंत्री सरयू राय यांना तिकीट नकारले आणि चक्क दुसर्‍या पक्षातून भाजपमध्ये आलेल्यांना तिकिटे देण्यात आली. दुसर्‍या पक्षातून आयात करण्याचा प्रयोग महाराष्ट्रात फसला असला तरीही त्यांनी झारखंडातही पुन्हा राबविला. अकेर त्यात त्यांना पूर्णपणे अपयश आलेच. भाजपच्या नेते मंडळींनी कार्पोरेट बॉम्बिंग स्टाइलमध्ये प्रचार केला. तर आघाडीच्या नेत्यांनी त्या उलट प्रचाराचा गनिमी कावा वापरुन अगदी तळा-गळाच्या समुदायांशी संवाद साधला. त्यांची ही व्यूहरचना यशस्वी ठरली.झारखंड हातातून गेल्याने आता देशातील केवळ पाच राज्यांमध्ये भाजपची सत्ता राहिली आहे. कॉँग्रेसला हद्द पार करणारा भाजपा आता सर्व राज्यातून हद्दपार होतो की काय अशी शंका येऊ लागली आहे.
------------------------------------------------------------

0 Response to "भाजपा विरुध्द नाराजी"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel