-->
जनक्षोभाचा विजय

जनक्षोभाचा विजय

शनिवार दि. 07 डिसेंबर 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
----------------------------------------------
जनक्षोभाचा विजय
हैद्राबाद येथील एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिला जाळून मारल्याप्रकरणी ताब्यात असलेले चार नराधम पोलीस एन्काउंटरमध्ये मारले गेल्याने सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे. ही घटना घडल्यापासून या आरोपींच्या विरोधात जनक्षोभ उफाळून येत होता. या आरापींना फाशी ग्यावी तसेच त्यांना खुल्या जागेत फाशी द्यावी अशा प्रकारे जनतेतून मागण्या येत होत्या. अर्थात लोकांचा या घटनेमागे असलेला रोषच याव्दारे व्यक्त होत होता. आपण कितीही घृणास्पद कृत्य केलेला आरोपी असला तरीही त्याला फाशी अशा प्रकारे देऊ शकत नाही कारण आपला कायदा त्याला संमती देत नाही. पोलिसांनी मात्र एन्काऊंटर करुन या गुन्हेगारांना यदमासाला पाठविले आहे. पळून जाण्याचा प्रयत्नात असताना पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते ठार झाले, अशी पोलिसांनी माहिती दिली आहे. विशेष म्हणजे, पीडितेवर ज्या ठिकाणी बलात्कार झाला होता, तिथेच ही कारवाई करण्यात आली. याबाबत आता उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. आम जनतेने मात्र पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत केले आहे. आरोपींच्या एन्काउंटरनंतर स्थानिक नागरिकांनी पोलिसांवर केला फुलांचा वर्षाव केला, ही घटना फारच बोलकी आहे. 
ज्या क्रूरतेने या तरुणीचा बळी घेतला गेला ते पाहता तिच्या कुटुंबीयांचे दु:ख कधीच कमी होणार नाही. पण या एन्काऊंटरमुळे देशातील इतर मुलींच्या मनातील भीती नक्कीच कमी होईल व अशा प्रकारच्या गुन्हे करणार्‍यांच्या मनात थोडीफार का होईना मनात चपराक बसण्यास मदत होऊ शकेल. हैदराबाद बलात्कार व हत्या प्रकरणातील आरोपींचे पोलिसांनी केलेले एन्काउंटर अयोग्य व कायद्याला धरून नव्हते, असे स्पष्ट मत ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले आहे. झटपट न्याय मिळाल्यानंतर आनंद होणे स्वाभाविक आहे. पण तसा न्याय चंबळचे दरोडेखोरही द्यायचे. पण शेवटी ते दरोडेखोरच होते, असेही निकम यांनी सांगितले. निकम यांनी कायद्याच्या दृष्टीकोनात व्यक्त केलेले मत काही चुकीचे नाही. परतुं कधी कधी कायदा बाजुला सारुन पोलिसांना कायदा हाती घेऊन अशा प्रकारचे नराधम संंपवावे लागतात. अर्थात हे निकम यांना पटणारे नाही, मात्र सर्वसामान्य जनतेला पटणारे आहे. कारण आपल्याकडे कायद्याच्या प्रक्रियेतून जाऊन न्याय मिळविणे हे फार अवघड होते. त्यासाठी बराच पैसा व कालावधी खर्च होतो. प्रत्यक्षात आरोपिंना शिक्षा होण्यास एक तपही लागते. त्यापेक्षा अशा प्रकारे एन्काऊंटर करुन न्याय देणे सोपे असते. एन्काउंटरसारख्या प्रकरणांनी लोकांना आनंद होतो कारण न्याय लवकर मिळत नाही. ही न्यायदानाची प्रक्रिया वेगवान व्हावी यासाठी सरकार व संबंधित यंत्रणांनी प्रयत्न केले पाहिजेत. अनेक वर्षे खटले चालून शेवटी आरोपी सुटतात अशीही आपल्याकडे परिस्थिती आहे. त्यामुळे न्यायदानाच्या प्रक्रियेबद्दल सरकारने अंतर्मुख होऊन विचार करणे आवश्यक आहे. बलात्काराच्या घटना ज्या आपल्याकडे होतात ते पाहता आपण स्त्रीला किती हिनतेने पाहते हेच स्पष्ट होते. संधी मिळताच माणसातला पशू कसा जागा होतो याची ती उदाहरणे वाटतात. अनेकदा बलात्काराचे गुन्हे परिचितांकडूनच घडतात किंवा आधीच्या सौहार्दाचे पुढे विसंवादात रूपांतर होते त्यातूनही अनेकदा अशी प्रकरणे घडतात. गेल्या काही वर्षात कायद्यात बदल करण्यात आले आहेत. बलात्काराच्या घटनांमध्ये महिलांना न्याय मिळावा यासाठी त्यांना कायद्यानेच झुकते माप दिले आहे. परंतु काही अपवादात्मक स्थितीत या कायद्याचे महिलाच पुरुषांना अडकविण्यासाठी वापर करतात अशाही घटना घडल्या आहेत. त्यासंबंधी काही अपवाद झालहीे आहेत. अर्थात प्रत्येक घटना ही वेगळी असते. काही मोजक्याच महिलांना या कायद्याचा गैरवापर केला असेल तर त्याचा संपूर्ण महिलांकडे त्या नजरेने पाहणे चुकीचे ठरते. मनात दडून असलेली वासना, परिणामाची तमा न बाळगता फणा काढून समोर येते आणि केलेले कुकर्म दडविण्यासाठी हत्या करण्यापर्यंतचा अविचार करते, तेव्हा तो आपल्या राजकीय आणि सामाजिक दोन्ही व्यवस्थांचा पराभव असतो. अशी प्रकरणे घडल्यावर पोलिस यंत्रणा कधीही सहानुभूतीने वागत नाही, याचा प्रत्यय हैदराबादमध्ये पुन्हा आला. प्रत्येक महिलेस पोलिस संरक्षण देऊ शकत नाहीत. परंतु महिला या सुरक्षित शंभर टक्के असल्या पाहिजेत. त्यासाठी समस्त महिलांकडे पाहाण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे. महिलांकडे केवळ एक भोग वस्तू म्हणून पाहिल्यास अशा गुन्हे घडतात. त्यासाठी महिलांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे. हैद्राबादमधील बलात्काराच्या दुर्दैवी घटनेनंतर आता गुन्हेगारांचे एन्काऊंटर झाल्याने लगेचच महिला सुरक्षित झाल्या असे मात्र नव्हे. या घटनेने गुन्हेगारांमध्ये काही प्रमाणात जरब बसण्यास निश्‍चितच मदत होईल. परंतु यातून पोलिसांनी कायदा आपल्या हातात घेतला हा चुकीचा संदेशही गेला आहे. या गुन्हेगारांना कायद्याने न्याय दिला पाहिजे होता, हे देखील तेवढेच खरे आहे. या घटनेने जनक्षोभाचा विजय झाला आहे.
-----------------------------------------------------------------

0 Response to "जनक्षोभाचा विजय"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel